जिथे वाघांची हद्द सुरू होते…
गेल्या काही वर्षांत ‘वाघ वाचवा’ ची साद सातत्याने घातली जातेय. माणसांच्या रोजच्या जगण्याशी संबंधित अनेक प्रश्न रोज सतावत असताना वाघांना जरा जास्तीच महत्त्व दिले जातेय, अशी ओरडही केली जात होती. वाघांनी माणूस मारल्यापेक्षा अनेकांचे बळी घेणारा एखादा नरभक्षक वाघ गावकऱ्यांनी मारला तर त्यासंदर्भातील बातम्यांना अधिक महत्त्व दिले जात असल्याचे अनेकांना पसंत पडत नव्हते. अर्थात त्याचे कारण वेगळे होते. वाघांची संख्या झपाट्याने कमी होत असल्याचे वन्यप्राणी गणनेमध्ये लक्षात येत होते आणि अशाच गतीने वाघांची संख्या कमी होऊ लागली तर पृथ्वीतलावरून वाघ नष्ट होतील, अशी भीती व्यक्त केली जात होती. प्राण्यांची एखादी प्रजाती नष्ट होणे गंभीर असतेच, परंतु त्याहीपलीकडे त्या प्राण्याच्या अस्तित्वाचा आशय पोहोचवण्याची गरज असते. परंतु तो पोहोचवण्यात सर्वसंबंधित घटक कमी पडत होते. वाघ वाचवले आणि वाढवले पाहिजेत, परंतु ते का याचे नीट स्पष्टीकरण दिले जात नव्हते. आजसुद्धा वाघ वाचवण्याची गरज का आहे, याबाबतही आवश्यक ती जाणीवजागृती करण्याची गरज आहे. वाघांसंदर्भात अभ्यास करणारी मंडळी ही भूमिका मांडत असली तरी ती नीट पोहोच