वाघ, माणूस आणि संशोधक


बेळगावजवळच्या खानापूर परिसरात जवळजवळ सव्वा महिना एका नरभक्षक वाघामुळे हलकल्लोळ माजला होता. वाघाला गोळ्या घालून ठार मारल्यानंतर परिसर भीतीच्या छायेतून मुक्त झाला. खरेतर खानापूर परिसराला वाघाचे तसे अप्रूप नाही. बेळगाव वनविभागांतर्गत असलेल्या खानापूर तालुक्यातील जंगलांत सहा ते सात वाघ आहेत. तालुक्यातील नागरगाळी, लोंढा, भीमगड व कणकुंबी या वनक्षेत्रातच वाघांचे अस्तित्व आहे. सन २०११-१२ मध्ये भीमगडला अभयारण्याचा दर्जा मिळाला. त्यामुळे भीमगड वेगळे वनक्षेत्र बनले. अभयारण्याचे कायदे लागू झाल्याने या वनक्षेत्राला संरक्षण लाभले. परिणामी वाघांची संख्या वाढू लागली.
बेळगावपासून ४५ किलोमीटर अंतरावर असलेल्या भीमगडच्या जंगलात १९ नोव्हेंबरला वनखात्याने एक नरभक्षक वाघ सोडला. या वाघाने चिकमंगळूर येथे एका महिलेचा बळी घेतला होता. त्यानंतर त्याला बेशुद्ध करून पकडण्यात आले होते. तिथून दांडेलीच्या जंगलात सोडण्यासाठी नेले, मात्र स्थानिक लोकांनी तीव्र विरोध केल्यामुळे वनखात्याचे लोक वाघाला घेऊन खानापूरच्या भीमगड जंगलात आले. स्थानिक लोकांना कल्पना न देताच वाघ जंगलात सोडण्यात आला. ही वार्ता कळताच परिसरातील लोकांनी वन अधिकाऱ्यांची वाहने अडवून जाब विचारला. गावापासून १०० मीटरच्या अंतरावर नरभक्षक वाघाला सोडण्यात आल्याने लोक संतप्त झाले. वाघाला पुन्हा बंदिस्त करून इतरत्र हलविण्याची मागणी त्यांनी केली. वाघाला लवकरात लवकर पकडण्याची मागणी होऊ लागली. गावाजवळच सोडलेल्या नरभक्षक वाघामुळे परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले. नागरी वस्तीच्या आसपास वाघाचे दर्शन होऊ लागले. काही पाळीव प्राण्यांवर वाघाने हल्ले केले. अफवाही पसरू लागल्या. गेल्या आठवड्यात शेतात मळणी करीत असलेल्या अंजली हणबर नामक महिलेवर हल्ला करून वाघाने तिला ओढून नेण्याची घटना घडल्यानंतर मात्र जनक्षोभ उसळला. परिणामी वनविभागाने वाघाला ठार करण्याचा निर्णय घेतला. वाघ, वनखाते आणि जंगलाच्या परिसरात राहणारे लोक एवढ्यापुरते हे नाट्य मर्यादित असल्याचे चित्र होते. परंतु याचा चौथा कोन खूप गंभीर स्वरूपाचा होता. हा चौथा कोन होता एका वन्यजीव संशोधकाचा. नरभक्षक वाघाला एखाद्या प्राणिसंग्रहालयातही ठेवता आले असते. परंतु वनखात्यातील वरिष्ठांशी संबंधित वन्यजीव अभ्यासकाला नरभक्षक वाघावर संशोधन करण्याची खुमखुमी होती. त्यासाठी त्याने वाघाला कॉलर आयडी लावून तो जंगलात सोडण्याचा हट्ट धरला. दांडेली परिसरातील लोकांनी विरोध केल्यानंतर वाघाला गुपचूपपणे भीमगडच्या जंगलात सोडण्यात आले. परंतु बभ्रा झालाच. वाघाच्या हल्ल्यात एका महिलेचा बळी गेलाच, परंतु त्या वाघाचाही बळी गेला. सारासार विचार न करता घेतलेला एखादा निर्णय किती धोकादायक ठरू शकतो, हाच धडा या घटनेतून मिळतो.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट

एका ‘सुपारी’ची डायरी

फिनिक्सच्या राखेतून उठला मोर