यशवंतराव आणि शरदराव, पृथ्वीराज, देवेंद्र....

अभिवादन करायला येणाऱ्या पृथ्वीराज
चव्हाणांना पाहून यशवंतरावांना मागच्यावेळची गंमत आठवली. म्हणजे बारा मार्चची.
असाच सायरन वाजवत गाड्यांचा ताफा आला होता. कार्यकर्त्यांचीही गर्दी होती.
पृथ्वीराज एका हाताने पुष्पचक्र वाहात होते आणि दुसऱ्या हाताने कानाला मोबाइल
लावलेला. तो प्रसंग आठवला. आज गाड्यांचा ताफा नव्हता. चेहऱ्यावर सत्तेचा उल्हास
नव्हता. अभिवादन करून डोळे मिटताच यशवंतराव त्यांना म्हणाले, ‘ महाराष्ट्र
काँग्रेसची गलितगात्र अवस्था तुमच्याच नेतृत्वाखाली झाली. का झाली याचा विचार
केलात का ? महाराष्ट्र
काँग्रेसची शक्ती ही असंख्य कार्यकर्त्यांची शक्ती आहे आणि त्यांना शक्ती देण्याचं
काम आपलं आहे, हेच तुम्ही समजून घेतले नाही. हे कार्यकर्ते चळवळीत वाढले. शेकडो
गावांतून ते विखुरले आहेत. काँग्रेसबरोबर ते सातत्याने उभे राहिले आहेत.
महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाने सरकारमार्फत आणि इतरही क्षेत्रांत, पुढाकार घेऊन नागरी-ग्रामीण जीवनांत नवीन आशा, उत्साह
निर्माण केला. समाजातल्या सर्व वर्गांतले, जाती-जमातींचे,
सर्व धर्मांतील लोक त्यात आहेत. शेतकरी आहेत, कामगार
आहेत, मध्यमवर्गीय आहेत. खेड्यांतील आहेत आणि शहरांतले आहेत.
सदा सर्वकाळ जागरूक न राहिल्याने कामात काही अपुरेपणा निर्माण झाला असेलही,
परंतु या सर्वांतून निर्माण झालेली शक्ती ही महाराष्ट्र
काँग्रेसमध्ये संमीलित झाली आहे. ही शक्ती आणखी वाढवण्याची गरज होती. तुम्ही
त्याकडे साफ दुर्लक्ष केलेत.’
पृथ्वीराज चव्हाण मागे फिरता
फिरता यशवंतराव बोलले, ‘पृथ्वीराज, तुम्ही दिल्लीतून परत आलात तेव्हा महाराष्ट्र
कुठं होता, हेच तुम्हाला माहीत नव्हतं. त्यामुळं चार वर्षात तुम्ही तो कुठं नेऊन
ठेवलाय हे कळणार नाही. आपल्या जिल्ह्यात वाईला विश्वकोश मंडळाच्या पडक्या वाड्यात
कधी डोकावला असतात तरी महाराष्ट्र कळला असता...’
उदास मनाने पृथ्वीराज चव्हाण मागे
फिरले तेवढ्यात गाड्यांच्या सायरनचा आवाज आणि लोकांच्या गलबल्याने प्रीतिसंगमावरील
वातावरण बदलून गेले. हुरहूर होती, उत्कंठा होती ती याचीच. नवे राज्यकर्ते
प्रीतिसंगमावर येतील का ? अर्थात कुणाच्या येण्या- न येण्याने आपल्याला काय फरक
पडणार आहे ? पण आतून जी अस्वस्थता येते ती रोखता नाही येत.
देवेंद्र फडणवीस यांनी
पुष्पचक्र वाहिले. अभिवादन केले. यशवंतरावांना त्यातले मनस्वीपण जाणवले.
‘शासनाचा दर्जा आणि उंची दिवसेंदिवस वाढवायला हवी. राज्यकारभार
हाकण्यासाठी दिवसेंदिवस नवी तडफदार तरुण मंडळी पुढे येत आहेत. त्यांच्या आशाआकांक्षा-महत्त्वाकांक्षा
ध्यानी घेतल्या जाणे जरूर आहे.’ यशवंतरावांचे मनातल्या मनात चिंतन सुरू होते.
देवेंद्र फडणवीस यांनी
नमस्कारासाठी डोळे मिटताच यशवंतराव म्हणाले, ‘राज्य कोणत्या
पक्षाचे आहे, कोण चालवितो, यापेक्षा ते कसे चालविले जाते,
याला फार महत्त्व आहे.राज्यकर्त्यांनी दुहेरी दळणवळण आणि दुसऱ्याचा
दृष्टिकोन समजावून घेण्याची गरज विसरता कामा नये. सूडबुद्धी न बाळगता दृष्टिकोन
समतोल व वृत्ती शांत ठेवायला हवी.’
‘महाराष्ट्रात, राजकारण हे
जातीयवादापासून अलिप्त राहावे, यासाठी मी मनस्वी कष्ट घेतले
आहेत. महाराष्ट्रात असताना माझ्या कर्तेपणाच्या दिवसांत आणि नंतरही मी त्यासाठी
पराकाष्ठेचे प्रयत्न केले. मनातून स्वतः मी कधी जातीयवादी भावनेला बळी पडलो नाही.
समाजात एकजिनसीपणा आणण्याचेच ध्येय मी निरंतर बाळगले. तरीही अनेकदा माझ्यावर जातीयवादाचा
आरोप झाला. तुमच्यावरही तो होईल. विचलित होऊ नका. बहुजन समाजाचे दाखले दिले जातील. पण 'बहुजन' हा शब्द मी 'मासेस्' या
अर्थाने वापरतो. बहुसंख्य समाज म्हणजे अमुक एका जातीचा समाज, असा त्याचा अर्थ नव्हे. परंतु महाराष्ट्रासारख्या प्रांतात बहुजन समाज या
शब्दाला एक विशिष्ट, मर्यादित अर्थ प्राप्त करून दिला गेला
आहे. काही विचारवंतांना या शब्दांतून तसा मर्यादित अर्थ काढण्याची खोड आहे,
एवढेच फार तर त्या संदर्भात मी म्हणू शकेन. परंतु मी स्वतः तरी 'बहुजन' शब्दाचा अर्थ 'मासेस्'
असाच केला आहे. तुम्हीही त्याअर्थाने बहुजनांचे हित डोळ्यासमोर
ठेऊनच कारभार करा..’
यशवंतरावांनी देवेंद्र फडणवीस यांना मनभरून आशीर्वाद
दिला.
दरवर्षीप्रमाणे शरद पवारही आले. त्यांच्याकडे पाहून
यशवंतराव गालातल्या गालात हसले. त्यांच्याशी मोजकेच बोलले, ‘शरद, सॉरी शरदराव... तुम्ही स्वतः कुठे होता आणि स्वतःला कुठे नेऊन ठेवले
आहे हे प्रामाणिकपणे तपासून पाहा. महाराष्ट्राचं नंतर पाहता येईल...’
आणखीही खूप लोक येऊन
गेले. सायंकाळ झाली. पक्षी घरट्याकडं परतू लागले. गार वारा सुटला.
कृष्णा-कोयनेच्या संगमाकडं पाहून यशवंतरावांना विचारांची तंद्री लागली....संगम जिथे कुठे झालेला
असेल, ते ठिकाण
आपल्याला आवडते. रम्य वाटते. स्फूर्ती देणारे, जीवनाचा एक
वेगळाच अर्थ सांगणारे असे भासू लागते. दोन नद्या एकात एक मिसळतात, तेव्हा दोन शक्तींचे मीलन झाल्याचे ते दर्शन असते. दोघी एक होऊन, एकरूप, एकजीव होऊन पुढे जातात आणि हजारोंचे जीवन संपन्न
करीत असतात. माणसामाणसांचे असे मीलन होईल, विचारांचा संगम होईल
आणि माणसे एकजीव बनून कर्तृत्व करतील, तर सारेच सुखाने
नांदतील, त्यांचे जीवन संपन्न बनेल, राग,
द्वेष, स्पर्धा, शत्रुत्व
त्या संगमात मिसळून-विरघळून जाईल आणि विशुद्ध जीवनाचा स्रोतच पुढे जात राहील...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा