जबाबदारी पतंगरावांची !



 

 सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला राज्याच्या इतर भागांमध्ये लक्षणीय यश मिळाले असले तरी सांगली जिल्हा वगळता दक्षिण महाराष्ट्रात फारसा थारा मिळालेला नाही. विधान परिषद सदस्य चंद्रकांत पाटील यांच्याकडे सहकार खाते देऊन दक्षिण महाराष्ट्रात भाजपचा पाया विस्तारण्याची जबाबदारी सोपवलेली दिसते. सत्ता गमावल्यामुळे सैरभैर झालेले काँग्रेस-राष्ट्रवादीचे विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसचे तिसऱ्या-चौथ्या फळीतील कार्यकर्तेही आता भाजपची वाट धरतील. ज्यांचा राज्याच्या राजकारणावर फारसा परिणाम होणार नसला तरी स्थानिक स्वराज्य संस्था आणि सहकारी संस्थांच्या राजकारणाच्यादृष्टिने उपयोग होऊ शकतो. पक्षाचा पाया मजबूत करण्यासाठी या सत्ताच अधिक महत्त्वाच्या ठरतात.
राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यात भारतीय जनता पक्षाला बिनशर्त पाठिंबा दिल्यामुळे त्या पक्षाचे राज्यपातळीवरील नेते सत्तेच्या सावलीत राहतील, मात्र त्यांच्या स्थानिक कार्यकर्त्यांना कुत्रेही विचारणार नाही. ना धड सत्तेत ना विरोधात अशा अवस्थेत त्यांना राजकीय अस्तित्वासाठी कुठलातरी एक पर्याय निवडावा लागेल. ज्यांना सत्तेचे लाभ किंवा संरक्षण हवे असेल ते भाजपकडे सरकतील. भाजपशी कधीच जमू शकणार नाही, अशी धारणा असलेले कार्यकर्ते काँग्रेसचा पर्याय निवडतील. माजी मंत्री जयंत पाटील आणि आर. आर. पाटील यांनीही भविष्यात काँग्रेसचा पर्याय निवडला तर आश्चर्य वाटायला नको. राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने नेमका भाजपशी काय करार केलाय याचा अंदाज येत नसल्यामुळेच सर्वजण शांतपणे परिस्थितीचा अंदाज घेत आहेत. कोल्हापूरचे धनंजय महाडिक, साताऱ्याचे उदयनराजे भोसले आणि माढ्याचे विजयसिंह मोहिते-पाटील हे तिन्ही खासदारही भविष्यात भाजपच्या छावणीत दाखल झाले तर आश्चर्य वाटणार नाही. शरद पवार यांच्या मध्यस्थीने भाजपशी व्यवहार करण्यापेक्षा थेट व्यवहार करण्याला ते प्राधान्य देतील आणि तेच त्यांच्या सोयीचे ठरेल. धनंजय महाडिक यांनी आपल्या चुलतभावाला भाजपकडून विधानसभेवर निवडून आणून स्वतःसाठी वाट तयार केली आहे. रणजितसिंह मोहिते-पाटील यांनाही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपल्याला भवितव्य नसल्याचे लक्षात आले आहे आणि मुलाच्या भवितव्याचा विचार करूनच विजयसिंह मोहिते-पाटील यांना निर्णय घ्यावा लागेल. उदयनराजे तर पक्ष मानतच नसल्यामुळे त्यांचाही प्रश्न नाही.
या सगळ्या पार्श्वभूमीवर दक्षिण महाराष्ट्रात काँग्रेसला पक्षबांधणीसाठी परिस्थिती अनुकूल आहे. मात्र त्यासाठी खमके नेतृत्व हवे आणि त्या नेतृत्वाला केंद्रीय पातळीवरून अधिकार मिळायला हवेत. प्राप्त परिस्थितीमध्ये पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे आणि पतंगराव कदम हे तीन बडे नेते दक्षिण महाराष्ट्रात आहेत. पैकी सुशीलकुमार शिंदे केंद्रात आणि त्यानंतर थेट सोलापूर शहरातच लक्ष घालतात. अधे-मधे कुठे पाहात नाहीत. त्यामुळे त्यांचा फारसा उपयोग होणार नाही. पृथ्वीराज चव्हाणही दिल्ली आणि कराड याव्यतिरिक्त कुठे लक्ष देत नाहीत. कोल्हापूरचे सतेज पाटील वगळता त्यांना फारसे कुणी समर्थकही नाही. पक्षसंघटना बांधण्यासाठी तालुका पातळीवरील नेत्यांशी संपर्क नसलेल्या व्हाइट कॉलर नेत्यांचा उपयोग नाही. त्यामुळे स्वाभाविकपणे पतंगराव कदम हाच एकमेव पर्याय उरतो आणि प्राप्त परिस्थितीत तेच काँग्रेस पक्षाची घडी बसवू शकतात. सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांशी त्यांचा दीर्घ संपर्क आहे. सोलापूर जिल्हाही त्यांच्यासाठी नवा नाही. पतंगरावांच्याच भाषेत बोलायचे तर चारही जिल्ह्यातील स्थानिक नेते-कार्यकर्त्यांची सगळी अंडी-पिल्ली त्यांना माहीत आहेत. मोठ्या पडझडीनंतर पक्षबांधणी करताना खबरदारी घ्यावी लागणार आहे. उदाहरण घ्यायचे तर आमदार महादेवराव महाडिक यांना घेऊन कोल्हापुरात काँग्रेसची बांधणी करता येणार नाही, हे पतंगरावांना माहीत आहे. किमान कोल्हापूर, सांगली, सोलापूरमध्ये ते चांगली बांधणी करू शकतील. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांना बळ देऊ शकतील. साताऱ्यामध्ये ते फारसे काही करू शकणार नाहीत कारण तिथे पृथ्वीराज चव्हाण आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा अडसर असेल. विलासकाका उंडाळकरांचे काय करायचे, हाही प्रश्न निर्माण होईल. तिथल्या कारस्थानी राजकारणात शक्ती घालवण्यापेक्षा तीन जिल्ह्यांत लक्ष घातले तरी खूप काही साध्य करता येईल. साताऱ्याची जबाबदारी पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर सोपवून त्यांचीही परीक्षा घेता येईल.
दक्षिण महाराष्ट्रातील एकूण ३७ जागांपैकी २००९च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडे बंडखोरांसह १८ जागा होत्या, त्या यावेळी १३ पर्यंत घसरल्या आहेत. काँग्रेसकडे सात जागा होत्या, त्यातील एक जागा कमी झाली आहे. भाजपच्या दोन जागा वाढून आठ झाल्या आहेत. त्यामध्ये भाजपने अन्य पक्षांतून घेतलेल्या शिवाजीराव नाईक (शिराळा), विलासराव जगताप (जत) आणि अमल महाडिक (कोल्हापूर दक्षिण) अशा तिघांचा समावेश आहे. शिवसेनेच्या सहा जागा वाढून त्या नऊ झाल्या आहेत. त्यातल्या सहा फक्त कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत.
ग्रामीण भागात तळागाळापर्यंत काँग्रेसचे कार्यकर्त्यांचे जाळे आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेवर काँग्रेसचे वर्चस्व आहे, ते टिकवून ठेवण्यासाठी व्यूहरचना आखावी लागेल. सांगली, सातारा, सोलापूर जिल्हा परिषदांवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असली तरी तिथे काँग्रेसचेही लक्षणीय संख्याबळ आहे. भविष्यात तिथली सत्ता मिळवण्याच्यादृष्टिने तयारी करावी लागेल. राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला पाठिंबा देऊन स्वतःची ओळख नष्ट केली आहे. आतापर्यंत मुस्लिम मतदार काँग्रेसबरोबरच राष्ट्रवादीच्या पाठीमागेही होता, आता तो राष्ट्रवादीपासून पूर्णपणे फारकत घेऊन काँग्रेसकडे येईल. धर्मनिरपेक्ष पर्याय म्हणून राष्ट्रवादीसोबत असलेले अन्य समाजघटकही काँग्रेसकडे वळतील. राजू शेट्टी यांनी भ्रमनिरास केलेल्या मतदारांना पु्न्हा काँग्रेसकडे वळवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. स्थानिक पातळीवर भाजप-राष्ट्रवादी एक झाले तरीही काँग्रेसकडे मजबूत समर्थन असेल. फक्त ते संघटित करणारे नेतृत्व हवे आहे. आजघडीला ती क्षमत फक्त पतंगराव कदम यांच्याकडेच आहे. दक्षिण महाराष्ट्राच्या बालेकिल्ल्यात मजबूत बांधणी करून राज्याच्या मोहिमेवर निघणे काँग्रेससाठी फायद्याचे ठरेल !

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट

एका ‘सुपारी’ची डायरी

फिनिक्सच्या राखेतून उठला मोर