नक्षत्रबनाची धोंडेवाडी
साता-याजवळील धोंडेवाडी हे छोटेसे गाव महात्मा
गांधीजींच्या कल्पनेतल्या ग्रामस्वराज्याचे आदर्श उदाहरण म्हणून ओळखले जाते.
श्रमदानातून ग्रामविकासाबरोबरच बचतगटाच्या माध्यमातून लोकांचे जीवनमान
उंचावण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असतात. लोकसहभागातून विकसित गावाचे मॉडेल
म्हणून धोंडेवाडीने आपली ओळख निर्माण केली आहे.

गांधीजी म्हणायचे की कुणी एका तरुणाने मनावर घेऊन गावाची
सेवा केली पाहिजे. गावातच सर्व बाबींची सोडवणूक झाली पाहिजे. आणि हे काम व्यक्तिगत
पातळीवरच व्हायला पाहिजे. संस्था आली की ते काम तात्पुरते किंवा तकलादू होते.
गांधीजींच्या याच विचारांवर निष्ठा ठेवून डॉ. माणिक शेडगे यांनी धोंडेवाडीच्या
विकासासाठी वाहून घेतले.
नक्षत्रबन हा गावातील एक अनोखा उपक्रम आहे. एकूण 27 नक्षत्रे आहेत. प्रत्येक राशीचे आणि नक्षत्राचे वेगळे झाड असते, असे मानले जाते. ज्या नक्षत्रात जन्म झाला, त्या
नक्षत्राच्या झाडाखाली माणसाला मन:शांती लाभते, अशी पिढ्यानपिढ्या
चालत आलेली समजूत आहे. राशी, नक्षत्र आणि नक्षत्रांचे झाड या
सगळ्या गोष्टी आजच्या काळात कालबाह्य वाटू शकतात. परंतु जुन्या समजुतीचा आधार घेऊन
त्यांना काळाशी सुसंगत नवे संदर्भ जोडून काही विधायक प्रयत्न करता येऊ शकतात. डॉ.
माणिक शेडगे यांनी त्या समजुतीचा आधार घेऊन भुंड्या टेकडीवर नक्षत्रबन फुलवले.
कोणत्याही गावाजवळची टेकडी म्हणजे दगड काढण्यासाठी,
खाणकामासाठी हक्काचे ठिकाण असते. हे ओळखून टेकडीला पहारीचा स्पर्श होण्याआधीच
त्यांनी तिथे नक्षत्रबनाची संकल्पना मांडली. त्यांच्या या संकल्पनेला ग्रामस्थांनी
सकारात्मक प्रतिसाद दिला. अशी संकल्पना काही दिवसांत किंवा महिन्यात साकार होऊ शकत
नाही. त्यासाठी काही वर्षे जावी लागतात. धोंडेवाडीच्या ग्रामस्थांनी पाच वर्षात
तीनशे दुर्मीळ झाडे लावून टेकडी पर्यावरणदृष्टय़ा विकसित केली. ही टेकडी आता
दत्तटेकडी म्हणून ओळखली जाते. टेकडी नुसती विकसित करून ग्रामस्थ थांबले नाहीत तर
तिचा नित्य उपयोगही होऊ लागला. गावक-यांच्या सगळ्या बैठका नक्षत्रबनात होतात.
त्यामुळे धोंडेवाडी हे परिसरातील पर्यावरणाचे केंद्र बनले आहे. वृक्षारोपण किंवा
टेकड्या विकसित करण्यासंदर्भात मार्गदर्शन घेण्यासाठा आजुबाजूच्या गावातले लोक
धोंडेवाडीला येतात.
रवींद्रनाथ टागोरांनी अशी एक संकल्पना मांडली आहे की, यात्रा, उत्सवाच्या काळात लोकांना जे काही सांगितले
जाते, ते लोक लक्षात ठेवतात. हीच गोष्ट ध्यानात घेऊन लोकांच्या
प्रबोधनासाठी यात्रेचा उपयोग करून घेण्यात आला. गावात गोकुळाष्टमीचा उत्सव
पारंपारिकरित्या साजरा केला जातो. यादिवशी गो महोत्सव म्हणजे गायींचे प्रदर्शन
भरवले जाऊ लागले. चांगल्या गायींचे क्रमांक काढून गायींचे चांगले संगोपन करणा-या
शेतक-यांना सन्मानपत्रे देऊन सत्कार केला जाऊ लागला. प्रत्येक कुटुंब लोकराज्य
मासिकाचे वर्गणीदार असलेल्या गावाला ‘लोकराज्य ग्राम’ म्हटले जाते. राज्यात अशी अनेक गावे आहेत, परंतु
धोंडेवाडी राज्यातील पहिले ‘महिला लोकराज्य ग्राम’ आहे. इथल्या सगळ्या महिला लोकराज्यच्या वर्गणीदार झाल्या. महिला
सबलीकरणाच्या बाबतीतही धोंडेवाडी आघाडीवर आहे. सर्व महिला बचतगटाच्या सदस्य आहेत.
गावात सात बचतगट आहेत. पैकी तीन गट स्वतंत्र उद्योग चालवतात, एक बचतगट दूध डेअरी, एक रास्त धान्य दुकान चालवतो.
निर्मलग्राम बनलेल्या धोंडेवाडीला ग्रामस्वच्छता तसेच तंटामुक्तीचा विशेष पुरस्कार
मिळाला आहे, त्यामध्येही महिला बचत गटांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. गावातील वीस कुटुंबे सामुदायिक शेती करतात.
सामुदायिकरित्या आले लागवड हेही गावाचे वैशिष्ट्य आहे.
ज्ञानयात्री विवेकानंद वाचनालय सुरू करून हे ग्रंथालय
आणि शाळेचे विद्यार्थी जोडून घेतले आहेत, जेणेकरून मुलांना वाचनाची सवय लागावी.
वाचायला लागल्यामुळे छोट्याशा गावात अनेक मुलांमधून वक्ते तयार झाले आहेत.
धोंडेवाडीचं आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे सगळा गाव पूर्वापार
शाकाहारी आणि व्यसनमुक्तही आहे. गावात कृष्णभक्तांची आणि दत्तभक्तांची संख्या खूप
आहे. पूर्वी गावात गवळ्यांची संख्या अधिक होती. शाळीग्राम पूजनाची परंपरा
असल्यामुळे मांसाहार वर्ज्य असावा, असे सांगण्यात येते. पिढ्यानपिढ्या
चालत आलेली परंपरा गावात आजही विनातक्रार पाळली जाते. येथील नव्या पिढीनेही अगदी
हसतमुख या शाकाहारी परंपरेचा स्वीकार केला आहे. नव्याने नांदायला आलेली सून असो
अथवा या गावातून इतरत्र नांदायला गेलेल्या मुली असोत, सगळेच
शाकाहाराचे पालन करतात. मांसाहार वर्ज्य असल्यामुळे गावात शेळी किंवा कोंबडी
पालनही केले जात नाही. गायी पाळण्याची परंपरा असून सुमारे पन्नासहून अधिक कुटुंबे
गोपालन करतात. सेंद्रीय शेती करण्याकडेही गावक-यांचा कल आहे. डॉ. माणिक शेडगे यांनी गावाच्या विकासासाठी
वाहून घेतले असून त्यांच्याच पुढाकाराने गावात नवनव्या योजना राबवल्या जातात.
कोणतीही सरकारी योजना राबवण्यामध्ये धोंडेवाडी अग्रेसर असते. गावाची एकीही
अभूतपूर्व असून ग्रामपंचायत निवड बिनविरोध होते.
पाचशेहून अधिक लोकसंख्या असलेले धोंडेवाडी गाव सातारा
तालुक्यात आहे. विधानसभा मतदार संघ पुनर्रचनेनंतर या गावाचा समावेश कराड उत्तर
विधानसभा मतदार संघात झाला. निर्मलग्राम चळवळ जोर धरू लागल्यानंतर ग्रामस्थांनी
यात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. मात्र शौचालय बांधण्यासाठी सरकारी अनुदान
घ्यायचे नाही असे ठरवले. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेतून कर्ज काढून ७५ शौचालयांचे
बांधकाम करण्यात आले. २००६ मध्येच गाव निर्मल बनले आहे. ज्या कुटुंबांकडे
शौचालयासाठी जागा नव्हती, त्यांना सार्वजनिक जागा उपलब्ध करून देण्यात आली. सर्व
शौचालये शोषखड्ड्याची म्हणजे पर्यावरणपूरक आहेत.
पेशाने डॉक्टर असले तरी डॉ. माणिक शेडगे वैद्यकीय
व्यवसाय करीत नाहीत. श्रमप्रतिष्ठेवर विश्वास असल्यामुळे शेतीच करतात. त्यांनी
सामाजिक कार्यालाच वाहून घेतले आहे, परंतु नुसते समाजकार्य
म्हणजे शुद्ध सेवा होत नाही, अशी धारणा असल्यामुळेच त्यांनी
उदरनिर्वाहासाठी शेतीचा पर्याय निवडला आहे. सरकारी योजनांचा लाभ घेऊन गावाने विकास
साधला असला तरी तो स्पर्धेपुरता मर्यादित नाही. शाश्वत विकासाची संकल्पना त्यामागे
आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा