ग्रेस : व्याकुळतेचा विलक्षण अनुभव

पंचवीस वर्षापूर्वी रणरणत्या दुपारी तापलेल्या डांबरी सडकेवर ग्रेस यांची कविता पहिल्यांदा भेटली. कवितेचा दंश नुकताच झाला होता , जे लिहित होतो ती कविता होती किंवा नाही हेही समजत नव्हतं. कोल्हापूरला कॉलेजला होतो. एप्रिल महिना असावा. सूर्य आग ओकत होता. रस्त्यावरचं डांबरही वितळून त्याचे छोटे छोटे बुडबुडे येत होते. पावलांचे ठसे त्यावर ठसठशीतपणे उमटत होते. केशवराव भोसले नाटय़गृहाजवळ देवल क्लबच्या जुन्या इमारतीसमोर रस्त्यावर एक मळकट कागद पडला होता. कुतूहल म्हणून तो उचलला तर त्यावर ‘ गाव ’ नावाची कविता होती - आभाळ जिथे घन गर्जे/ते गांव मनाशी निजले /अंधार भिजे धारांनी/घर एक शिवेवर पडले.. अन् पाणवठय़ाच्या पाशी/खचलेला एकट वाडा/मोकाट कुणाचा तेथे/कधिं हिंडत असतो घोडा.. झाडांतून दाट वडाच्या/कावळा कधीतरि उडतो/पारावर पडला साधू/ हलकेच कुशीवर वळतो.. गावांतिल लोक शहाणे/कौलांवर जीव पसरती/पाऊस परतण्याआधी/क्षितिजेंच धुळीने मळती.. - तसल्या उन्हात रस्त्याच्या मधोमध उभ्याउभ्याच कविता वाचून संपवली , तेव्हा पाय उचलता येईना. पाहिलं तर रस्त्यावरच्या डांबरात पायातलं स्लीपर रुतून बसलं होतं. ते तु...