गोविंदराव पानसरे : कष्टकऱ्यांच्या चळवळीचा आधारस्तंभ
महाराष्ट्राच्या राजकीय वाटचालीत कोल्हापूरचे नेतृत्व फारसे ठळकपणे दिसत नाही. रत्नाप्पा कुंभार, बाळासाहेब देसाई एवढीच नावे चटकन लक्षात येतात. सत्तेच्या राजकारणात कोल्हापूर पिछाडीवर असले तरी प्रबोधनाच्या चळवळीसाठी मात्र कोल्हापूरने सातत्याने महाराष्ट्राला नेतृत्व दिले. राजर्षी शाहू महाराज, भाई माधवराव बागल, कॉम्रेड संतराम पाटील, कॉम्रेड यशवंत चव्हाण, प्रा. एन. डी. पाटील, कॉम्रेड गोविंदराव पानसरे, राजू शेट्टी या नावांवर नजर टाकली तरी प्रबोधनाच्या चळवळीसाठी, कष्टकऱ्यांच्या लढाईसाठी कोल्हापूरने महाराष्ट्राला काय दिले आहे, याची कल्पना येते. कोल्हापूरच्या राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टने गोविंदराव पानसरे यांना शाहू पुरस्कार जाहीर करून महाराष्ट्रातील चळवळींचा आधारस्तंभ बनलेल्या व्यक्तिमत्त्वाचा गौरव केला आहे.
वयाची अमृतमहोत्सवी वाटचाल केलेल्या गोविंदराव पानसरे यांच्या आयुष्यातील सहा दशके कोल्हापुरात गेली. अहमदनगर जिल्ह्यातील कोल्हार हे त्यांचे गाव. कोल्हार ते कोल्हापूर असा त्यांचा विलक्षण प्रवास आहे. शेतकरी कुटुंबात जन्मलेले गोविंदराव पंधराव्या वर्षी पत्की गुरुजींच्याबरोबर अंगावरच्या कपडय़ानिशी कोल्हापूरला आले. सुरुवातीच्या काळात कधी बिंदू चौकात कम्युनिस्ट पुस्तकांची विक्री करणाऱ्या दुकानात तर कधी फुले आणि आंबेडकरांच्या पुतळ्याच्या पुतळ्याखाली झोपून त्यांनी रात्री काढल्या. पुढे प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिग हाऊसमध्ये प्रवेश मिळाला आणि त्यांची शिक्षणाची गाडी रुळावर आली. शिक्षण घेत असतानाच अनेक लढे आणि चळवळींमध्ये त्यांनी भाग घेतला.
सोपे बोलणे आणि सोपे लिहिणे हे पानसरे यांचे वैशिष्टय़ आहे. कामगारांपुढे बोलताना कधी ते चीन, रशियाच्या बाता मारीत नाहीत. कितीही अवघड विषय असला तरी त्यांना समजेल अशा भाषेत त्यांच्याशी संवाद साधतच मांडणी करतात. कार्यकर्त्यांपुढे बोलताना मात्र काही जागा मुद्दाम रिकाम्या ठेवण्याची त्यांची हातोटी विलक्षण आहे. त्याबद्दल ते म्हणतात, कार्यकर्त्यांना प्रश्न पडले पाहिजेत, त्यांनी प्रश्न विचारले पाहिजेत, त्यासाठी अशा काही जागा मुद्दाम रिकाम्या ठेवायच्या असतात. जागतिकीकरणाचे वारे वाहू लागल्यानंतर यासंदर्भातील एकूण चर्चेमध्ये त्यांनी खाऊजा धोरणहा नवा शब्द दिला. खाऊजाम्हणजे खासगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण.
बाबरी मशिद पाडल्यानंतर सगळीकडे धार्मिक तेढ वाढू लागली, तेव्हा पानसरे यांच्या पुढाकाराने कोल्हापुरात स्थापन झालेल्या आम्ही भारतीयलोकआंदोलनाने राजर्षी शाहूंच्या नगरीतील सलोखा टिकवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. करवीर पीठाच्या शंकराचार्यानी भारतीय घटनेचा अवमान करणारे विधान केले त्यावेळी किंवा वरुणतीर्थ मैदानात शेकडो किलो धान्य आणि तेल तुपाची नासाडी करुन यज्ञाचे आयोजन करण्यात आले, त्यावेळी पानसरे यांनी पुढाकार घेऊन सर्वपक्षीय चळवळ उभारली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर राजकीय दुकानदारी आणि धार्मिक विद्वेष पसरवण्याचे उद्योग जोरदारपणे सुरू झाले, तेव्हा पानसरे यांच्यासारख्या लोकशिक्षकाने ते मूकपणे पाहणे शक्य नव्हते. जातीयवादी राजकारण करणाऱ्या शिवसेना आणि तत्सम पक्ष-संघटनांच्या विरोधात त्यांनी अनेक सभांमधून तोफा डागल्या आहेत. परंतु पानसरे तेवढय़ावरच थांबले नाहीत. शिवाजी महाराजांच्यावर त्यांनी एक छोटेखानी पुस्तिका लिहिली. शिवाजी कोण होता ?’ या नावाची. अवघ्या  पानांची ही पुस्तिका शिवरायांनी सामान्य माणसांसाठी केलेले कार्य सोप्या भाषेत उलगडून दाखवते. या पुस्तिकेच्या दीडेक लाख प्रती तरी आतार्पयत विकल्या गेल्या असतील. या पुस्तिकेसंदर्भात एक गंमतीशीर घटनाही घडली होती. पुस्तक न वाचता केवळ नावावरून गोंधळ घालणाऱ्यांची आपल्याकडे कमतरता नाही. तसेच या पुस्तकाबाबत घडले. नावामध्ये शिवाजी महाराजांना एकेरी संबोधण्यामागे पानसरे यांची काहीएक भूमिका आहे. परंतु त्यावरून कुणीतरी कथित शिवप्रेमींने पोलिसांमध्ये तक्रार केली आणि पोलिस अधिकाऱ्यांनीही या पुस्तिकेच्या प्रती जप्त करून आपल्या अगाध ज्ञानाचे दर्शन घडवले होते.
एकदा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांनी शिवाजी विद्यापीठात आंदोलन करताना कुलगुरूंच्यासमोर जरा जास्तीच आगाऊपणा केला होता. त्याविरोधात कोल्हापूर शहरात तीव्र प्रतिक्रिया उमटत होत्या आणि अर्थात त्याला राजकीय रंग होता. पानसरे यांच्यासारख्या डाव्या पक्षाच्या नेत्यासाठी तर अभाविपवर टीका करण्याची ही मोठी संधी होती. परंतु आयुष्यभर रस्त्यावरच्या लढाया करणाऱ्या पानसरे यांनी राजकीय भूमिका बाजूला ठेवून वेगळी भूमिका घेतली. ते म्हणाले होते, ‘आंदोलनाच्या जोशात कधीतरी असे घडून जाते. ते विसरून जायचे असते. मीही मागे एकदा तर्कतीर्थाच्या गळ्यात मेलेला साप घातला होता. माझी ती कृती चुकीची होती, हे आता माझ्याही लक्षात येते, परंतु त्या त्या वेळी असे काहीतरी घडून जाते.
राजर्षी शाहूंच्या नगरीत आयुष्य व्यतीत करणारे पानसरे शाहूंच्या विचारांचे पाईक आणि कृतीशील अनुयायी आहेत. पानसरे म्हणजे नेमके कुणापैकी, याचे कोडे अनेकांना उलगडत नाही. जाती-पातींच्या पलीकडे जाऊन ते रस्त्यावरच्या माणसांसाठी. कष्टकऱ्यांसाठी लढाया करतात. मराठा समाजातला माणूस असे काही करणे शक्य नाही, त्यामुळे ते दलित असावेत, असे छातीठोकपणे सांगणारे कमी नाहीत. शाहू महाराजांनी आपल्या बहिणीचा होळकरांच्या कुटुंबात विवाह करून आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन दिले. आजच्या काळात शेजारच्या घरी शिवाजी जन्माला यावा, अशी मानसिकता असताना पानसरे यांनी आपल्या दोन्ही मुलींचे आंतरजातीय विवाह स्वीकारले.
डाव्या चळवळीतले नेते म्हणजे सदैव चिंताक्रांत चेहरा आणि एकूण व्यवहारातील रुक्षपणाच अधिकतर दिसतो. परंतु पानसरे त्याला अपवाद आहेत. जगण्यातले आनंदाचे क्षण छानपैकी साजरे करावेत, अशी धारणा असलेले ते कम्युनिस्ट आहेत. चळवळीला एकारलेपण येऊ नये, तिला सांस्कृतिक जोड द्यायला पाहिजे, या धारणेतून त्यांनी श्रमिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध उपक्रम सुरू केले. अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन हा असाच एक उपक्रम. तो सुरू करतानाही त्यांचा निश्चित असा एक विचार होता. अण्णाभाऊ साठे यांच्यासारख्या शाहिराला, साहित्यिकाला एका जातीपुरते मर्यादित केले जाते, हे पाहिल्यानंतर त्यांनी अण्णाभाऊंच्या नावाने जागर सुरू केला. साहित्य संमेलन सुरू करण्याच्या खूप आधीपासून अण्णाभाऊंच्या जयंतीनिमित्त शाहिरी पोवाडय़ांची स्पर्धा सुरू केली. त्यानिमित्ताने अठरापगड जातीच्या शाहिरांना अण्णाभाऊ साठे या शाहिराची नव्याने ओळख करून दिली. स्वत: अनेक चांगल्या गोष्टी उभ्या केल्याच, परंतु जिथे जिथे काही चांगले उभे राहतेय, तिथे तिथे पानसरे समर्थनासाठी उभे राहतात. आणि जिथे काही चुकीचे घडतेय त्याविरोधातही ठामपणे उभे राहताना त्यांनी कधी परिणामांची तमा बाळगली नाही.
पानसरे यांची वाटचाल पाहिली, की एक खंत सतत वाटत राहते, ती म्हणजे त्यांच्यासारख्या नेत्याला विधिमंडळात जाण्याची संधी मिळाली नाही. कोल्हापूरमधून त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. त्यासाठी चांगली तयारीही केली होती. परंतु त्यामध्ये त्यांना यश आले नाही. पानसरे यांचा पक्ष असा की, विधानपरिषदेसाठी कोणत्याही पातळीवरचे संख्याबळ त्यांच्याबाजूने कधीच नव्हते. पानसरे विधिमंडळात गेले नाहीत, त्यामुळे पानसरे यांचे काही नुकसान झाले असे वाटत नाही. नुकसान झालेच असेल तर ते विधिमंडळाचे झाले, असे म्हणता येईल. पानसरे यांच्यासारखा कष्टकऱ्यांचा नेता, प्रभावी वक्ता विधिमंडळात गेला असता तर कष्टकऱ्यांचे अनेक प्रश्न त्यांनी धसास लावले असतेच, परंतु त्याचबरोबर त्यांच्यासोबत विधिमंडळात काम करणाऱ्या सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींचेही शिक्षण झाले असते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट

फिनिक्सच्या राखेतून उठला मोर

सरोजिनीताईंची चटका लावणारी एक्झिट