डाव्यांचे नवे रक्तचरित्र



एकाला गोळी घातली, दुसऱ्याला भोसकले आणि तिसऱ्याला मरेर्पयत मारले..हे कुठल्या सिनेमाच्या कथेतले वर्णन नव्हे किंवा एखाद्या सुपारी किलरने खासगी बैठकीत मारलेली बढाईही नव्हे. केरळमध्ये मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याने जाहीर सभेत ही कबुली दिली आहे. मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी -मध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या कशा हत्या केल्या, याचे वर्णन माकपचे एक ज्येष्ठ नेते एम. एम. मणी यांनी केरळमधील मुवत्तुपुझा येथील जाहीर सभेत केले. त्यामुळे केरळसह संपूर्ण देशभर खळबळ उडाली असून भारतीय कम्युनिस्ट पक्षानेही याबाबत माकप नेतृत्वाकडे खुलाशाची मागणी केली आहे. जाहीर सभेत मणी म्हणाले की, पक्षाला किंवा मार्क्‍सवादी विचारधारेला विरोध करणाऱ्यांची यादीच आम्ही बनवली होती,  पासून अशा  कार्यकर्त्यांच्या हत्या करण्यात आल्या. बेबी अँचेरी यांना नोव्हेंबर  मध्ये गोळी घालून ठार केले. जानेवारी  मध्ये मुल्लनचिरा मथाई यांना बेदम मारहाण करून ठार केले, तर जून  मध्ये मुत्तुकड नानप्पन यांना भोसकून मारले.
वीस वर्षापूर्वीच्या या घटनांना आता उजाळा मिळाला असला तरी केरळमधील डाव्यांची लालक्रांती अद्याप थांबलेली नाही. गेल्या चार महिन्यांत झालेल्या दोन हत्यांमुळे हे सत्र अद्याप सुरूच असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यातील एक हत्या तर अगदी अलीकडची आहे. क्रांतिकारी मार्क्‍सवादी पक्षाचे नेते टी. पी. चं्रशेखरन यांची या महिन्याच्या सुरुवातीला निर्घृण हत्या करण्यात आली. चार मे रोजी चं्रशेखरन एकटेच मोटारसायकलवरून निघाले असताना मोटारीतून आलेल्या अज्ञातांनी त्यांच्यावर गावठी बॉम्ब फेकला आणि त्यानंतर तीक्ष्ण हत्यारांनी वार करून त्याची हत्या करण्यात आली. चं्रशेखरन यांनी एसएफआय च्या माध्यमातून राजकीय कारकीर्द सुरू केली होती. नंतरच्या काळात मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पूर्णवेळ कार्यकर्ते म्हणून त्यांनी काम केले. पक्षाचे ज्येष्ठ नेते व्ही. एस. अच्युतानंदन यांचे समर्थक म्हणून ते पक्षात ओळखले जात होते. काही वर्षापूर्वी पक्षांतर्गत मतभेदांमुळे पक्षत्याग करून त्यांनी  मध्ये क्रांतिकारी मार्क्‍सवादी पक्षाची स्थापना केली होती.
चं्रशेखरन यांच्या हत्येच्या आधी अडीच महिने म्हणजे फेब्रूवारीच्या वीस तारखेला कन्नूर जिल्ह्यात मुस्लिम स्टुडंट्स फ्रंटचा कार्यकर्ता अब्दुल शकूर याची भोसकून हत्या करण्यात आली होती. या दोन्ही हत्यांमध्ये माकपच्या कार्यकर्त्यांचा हात असल्याचे उघड झाले असून पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. टी. पी. चं्रशेखरन यांच्या हत्याप्रकरणात मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांची नावे आल्यानंतर व्ही. एस. अच्युतानंदन यांनी विरोधी पक्षनेतेपद सोडण्याची धमकी दिली आहे. दरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांच्या हत्यांची जाहीर कबुली देणाऱ्या एम. एम. मणी यांच्याविरोधात खुनाचा आणि कटकारस्थानाचा गुन्हा नोंदवण्यात आला असून त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.
या सगळ्या प्रकारांमुळे भाकप आणि माकप या दोन्ही पक्षांमध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते ए. बी. बर्धन यांनी या संदर्भात म्हटले आहे की, एम. एम. मणी यांनी केलेले वक्तव्य धक्कादायक आहे. याप्रकरणी माकपने स्पष्टीकरण देण्याबरोबरच पक्ष पातळीवर आवश्यक ती कारवाई करण्याचीही मागणी केली बर्धन यांनी केली आहे. माकपचे सरचिटणीस प्रकाश करात यांनी मणी यांच्या वक्तव्याशी संपूर्णपणे असहमती दर्शवली असून यासंदर्भात योग्य ती कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. पक्षाच्या राज्यशाखेकडून अहवाल मागवला असून त्यानंतर चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी म्हटले आहे.
अयोध्येतील बाबरी मशीदीच्या पतनानंतर देशाच्या राजकारणात धर्मनिरपेक्ष आणि जातीयवादी असे दोन तट पडले. त्यातून पूर्वाश्रमीचे अनेक काँग्रेसविरोधक पक्षही काँग्रेससोबत आले. धर्मनिरपेक्षतेच्या मुद्दय़ावरच कम्युनिस्टांनी काँग्रेस आघाडीची सोबत केली, ती अगदी अणुकरारावरून फारकत घेण्यार्पयत. पश्चिम बंगालमध्ये डाव्यांनी दीर्घकाळ राज्य केले, परंतु तिथे त्यांच्या जनाधाराला हिंसेची आणि दमनशाहीची जोड होती, याच्या अनेक कहाण्या नंतरच्या काळात पुढे आल्या आहेत. मात्र डाव्यांच्यासंदर्भात विचार करताना या आणि अशा प्रकारच्या कहाण्या दुर्लक्षितच करण्यात आल्या. धर्मनिरपेक्ष राजकारणाचा प्रवाह बळकट व्हावा, हेच त्यामागचे प्रमुख सूत्र होते. ज्योती बसू, हरकिशन सुरजित यांच्यासारखे समन्वयवादी आणि उदारमतवादी नेतेही त्याला कारणीभूत होते. परंतु या दोघांच्या पश्चात कम्युनिस्टांची अनेक पातळ्यांवर घसरण सुरू आहे. राजकीय यशापयश किंवा राजकारणातील चढउतारांचा सामना सगळ्यांनाच करावा लागतो. परंतु डाव्यांची घसरण तेवढय़ा एकाच पातळीवरची नाही. वैचारिकदृष्टय़ाही ते दुबळे बनत चालल्याचे चित्र दिसत आहे. पाठोपाठच्या राजकीय पराभवानंतरही वस्तुस्थितीकडे केले जाणारे दुर्लक्ष, पक्षनेतृत्वाकडून वेळोवेळी प्रकट होणारा तत्त्वांचा अनाठायी अहंकार, एका ज्येष्ठ नेत्याने खुलेआम दिलेली हत्यांची कबुली आणि अलीकडच्या काळात घडलेल्या राजकीय हत्या, हे सगळे त्याचेच निदर्शक आहे.
मुंबईत कम्युनिस्ट नेते कृष्णा देसाई यांच्या हत्येनंतर शिवसेनेची वेगाने वाढ झाली. शिवसेनेची दहशत तेव्हापासून सुरू झाली आणि त्यानंतरच्या काळातही हा रक्तरंजित प्रवास सुरूच राहिला. मुंबईत धर्मनिरपेक्षतेच्या गप्पा मारणारे डावे नेते कृष्णा देसाई यांच्या हत्येचा वारंवार उल्लेख करून शिवसेनेचा इतिहास रक्तरंजित असल्याचे सांगत असतात. परंतु केरळमध्ये एम. एम. मणी यांनी जी मुक्ताफळे उधळली आहेत, त्यामुळे डाव्यांनी राजकीय हिंसाचारावर बोलण्याचा अधिकारच गमावला आहे. कारण या ताज्या प्रकरणांमुळे धर्मनिरपेक्ष आणि पुरोगामी राजकारणाचा झेंडा मिरवणाऱ्या कम्युनिस्टांचा हिंस्त्र चेहरा देशासमोर आला आहे. हिंसाचार घडवून राजकीय पोळी भाजणाऱ्या भाजप-शिवसेनेच्या पंगतीला जाऊन बसले आहेत.
पश्चिम बंगाल आणि केरळचा अपवाद वगळता डाव्यांना सत्तेर्पयत पोहोचण्याएवढे संख्याबळ कधीच मिळाले नाही. ते मिळणार नाही, हे माहीत असूनही सर्वसामान्य आणि कष्टकरी माणसांसाठी रस्त्यावरच्या लढाया करण्यात डावे पक्षच सतत आघाडीवर राहिले. आजही देशाच्या अनेक भागात त्यांचे आस्तित्व नगण्य असले तरी लोकांच्या जगण्या-मरण्याशी संबंधित प्रश्नांवर लढे आणि चळवळी फक्त डावे पक्षच करीत असतात आणि त्याबद्दल उजव्यांच्या मनातही त्यांच्याबद्दल छुपी आस्था असते. स्वातंत्र्योत्तर काळात देशात अनेक प्रकारचे आर्थिक घोटाळे झाले. सगळ्या पक्षांचे नेते भ्रष्टाचाराच्या गटारगंगेत न्हाऊन निघाले. काही काळ डावेही सत्तेच्या परिघात होते. त्या काळातही भ्रष्टाचाराची प्रकरणे घडली. परंतु डाव्या नेत्यावर कधी भ्रष्टाचाराचा शिंतोडा उडाला नाही. एकूणच भारतीय राजकारणाचे अध:पतन होत असताना डावे आपल्या परीने आपल्या जागी काही गोष्टी टिकवून ठेवण्यासाठी किंमत देत होते. डाव्यांच्या अनेक भूमिकांबद्दल मतभेद असतानाही एकुण वर्तन व्यवहारामुळे डाव्या नेत्यांच्याबद्दल भारतीय राजकारणात आदराचे स्थान होते. परंतु नव्याने समोर आलेले डाव्यांचे रक्तचरित्र या सगळ्या गोष्टींवर मात करणारे आहे. कोणतेही डिर्टजट वापरले तरी हे डाग सहजासहजी पुसले जाणार नाहीत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट

एका ‘सुपारी’ची डायरी

फिनिक्सच्या राखेतून उठला मोर