डीसिकाची ‘सायकल’ आणि पिंजानीचा ‘बँडबाजा’
बायसिकल थीव्जहा व्हिट्टोरिओ डीसिका या दिग्दर्शकाचा एकोणिसशे अठ्ठेचाळीसमध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट. जागतिक सिनेमामधला मैलाचा दगड मानल्या जाणाऱ्या या चित्रपटाची आठवण राजेश पिंजानी दिग्दर्शित बाबू बँडबाजाहा मराठी चित्रपट पाहिल्यानंतर येते. दुसऱ्या महायुद्धानंतर इटलीमध्ये आलेल्या आर्थिक मंदीच्या पाश्र्वभूमीवर सामान्य माणसाचे जगणे किती कठिण बनले, याचे चित्रण बायसिकल थीव्जमध्ये आहे. तर जागतिकीकरणाच्या आक्रमणामुळं इथले छोटे व्यावसायिक, पारंपारिक कलावंत यांचे जगणे मुश्किल करून टाकल्याचे बाबू बँडबाजामधून दिसते. राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित झालेल्या या चित्रपटाच्या वाटय़ाला म्हणावे तसे कौतुक आलेले नाही. त्याच्या पुढेमागे प्रदर्शित झालेल्या अन्य चित्रपटांबद्दल सगळीकडे धोधो प्रसिद्धीचे पाट वाहताहेत. परंतु त्यापेक्षा गुणवत्तेच्या पातळीवर अनेक पटींनी सरस असलेल्या बाबू बँडबाजासिनेमाला पुन्हा बाजारीकरणानेच मारल्याचे दिसून येते.
दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात इटलीत आलेल्या आर्थिक मंदीच्या काळातील अस्तित्वासाठी झगडणाऱ्या सामान्य माणसाची कथा बायसिकल थीव्जमध्ये आहे. बेरोजगार लोकांच्या झुंडीच्या झुंडी रोजगाराच्या शोधात असतात. अँटोनिओ रिच्ची हा पत्नी आणि दोन मुलांसह राहणारा मनुष्य बेरोजगारीमुळे नाउमेद झालेला असतो. सुदैवानं त्याला पोस्टर चिकटवण्याचे काम मिळते, परंतु त्यासाठी हवी असते सायकल. सायकल असेल तरच काम मिळणार होते. त्याच्याकडे असलेली सायकल गहाण पडलेली असते. परंतु तुझ्याकडं सायकल आहे का?’, असा प्रश्न विचारल्यावर अँटोनिओ गोंधळतो. नाही म्हटलं तर हातातोंडाशी आलेला रोजगार जाईल, या भीतीने सायकल असल्याचे सांगून ते काम मिळवतो. घरी येऊन बायकोला, मारियाला अडचण सांगतो. ती त्याला धीर देते आणि घरातल्या चादरी गहाण ठेवून सायकल सोडवून घ्यायला पैसे देते.
सायकल हाती आल्यावर अँटोनिओचे काम सुरू होते. पण दुर्दैव त्याची पाठ सोडत नाही. कामाच्या पहिल्याच दिवशी तो पोस्टर चिकटवत असतानाच त्याची सायकल चोरीला जाते. ज्या सायकलमुळे रोजगार मिळालेला असतो, तीच चोरीला गेल्यामुळं अँटोनिओच्या पायाखालची वाळू सरकते. तो आणि त्याचा मुलगा ब्रुनो दोघेजण सायकल शोधण्यासाठी शहराचा कोपरा न कोपरा पालथा घालतात. आशा-निराशेच्या हिंदोळ्यावर शोधमोहिम सुरू असते, परंतु सायकल काही मिळत नाही. एका फुटबॉल स्टेडियमच्या बाहेर उभ्या केलेल्या सायकली अँटोनिओ पाहतो आणि त्याचा मनावरचा ताबा सुटतो. तो तिथली एक सायकल चोरण्याचा प्रयत्न करतो आणि चोरी करताना पकडला जातो. मुलासमोर अँटोनिओला मारहाण होते, त्याला अपमानित केलं जाते. शेवटी मुलाकडे पाहून त्याला सोडून देण्यात येते. अँटोनिओ आणि त्याचा मुलगा तिथून उदासवाणे चालायला लागतात, तेव्हा ब्रुनो आपल्या वडिलांचा हात घट्ट धरून त्यांना आधार देऊ लागतो..
रॉबटरे रोझेलिनीच्या रोम द ओपन सिटीया चित्रपटाने जागतिक सिनेमामध्ये नववास्तववादाचा प्रवाह आणला, त्या प्रवाहातला पहिला महत्त्वाचा चित्रपट म्हणून डीसिकाच्या बायसिकल थीव्जला ओळखले जाते. या चित्रपटाने जगभरातल्या संवेदनशील दिग्दर्शकांना प्रेरणा दिली. आपल्याकडे बिमल रॉय यांचा दो बिघा जमीन’, सत्यजित रे यांचा पथेर पांचालीयांची प्रेरणा बायसिकल थीव्जमध्येच होती. अलीकडे अनुराग कश्यपनेही हा चित्रपट आपल्याला दिग्दर्शक म्हणून प्रेरणादायी असल्याचं सांगितलेय.
राजेश पिंजानी या दिग्दर्शकाचा बाबू बँडबाजाहा चित्रपट थेट बायसिकल थीव्जच्या कथेची आठवण करून देतो. कुणाला अतिशयोक्ति वाटली तरी हरकत नाही, परंतु बायसिकल थीव्जमधील सायकल चोरीला गेल्यानंतरची वणवण आणि बाबू बँडबाजामधील दप्तर चोरीला गेल्यानंतरची बाबूची आणि त्याच्या आईची शिरमीची होणारी काहिली याची जातकुळी वेगळी नाही. दोन्ही चित्रपटांचा काळ वेगळा असला, प्रदेश वेगळा असला, सामाजिक-सांस्कृतिक पाश्र्वभूमी वेगळी असली तरी माणसाची जगण्यासाठीची, अस्तित्वासाठीची धडपड; या सगळ्याची जातकुळी एकच आहे.
बाबू बँडबाजाकेवळ दु:ख, दार्रिय़ आणि वेदनेचं दर्शन घडवत नाही. दार्रिय़ात जगणारी माणसे आपल्या आयुष्यातील अनेक करुण घटनांकडे सहजतेने पाहतात आणि जिवाला चटका बसायला पाहिजे, असे प्रसंगही हसून साजरे करतात, याचे विलक्षण अस्वस्थ करणारे दर्शन घडते. शाळेचा गणवेश नसतो, म्हणून बाबूला मास्तर सारखे शाळेतून हाकलत असतात. जुनी पुराणी कपडे घेऊन भांडी विकणारी बाबूच्या आईला एके ठिकाणी खाकी चड्डी मिळते, तेव्हा तिचे डोळे चमकतात आणि न पटणारा सौदाही ती पटवून घेते. ती चड्डी एवढी ढिली असते, की त्यात दोन बाबू बसतील. तेव्हा शिरमी दोरीवर वाळत घातलेल्या आपल्या परकराची नाडी खसकन ओढते आणि बाबूची चड्डी बांधते. तेव्हा बाबू म्हणतो, ‘हागायला आल्यावर काय करायचं ?’ तेव्हा नाडीची गाठ खसकन ओढल्यावर चड्डी कमरेतून खाली पडते आणि मायलेक दोघंही हसायला लागतात. वरवर विनोदनिर्मिती झाली, तरी त्यातलं कारुण्य काळजाला भिडतं. उदाहरणादाखल हा एक प्रसंग घेतला. आतून बाहेरून उदध्वस्ततेचा अनुभव देणारे चित्रपट आपल्याकडं फारसे बनत नाहीत. परंतु राजेश पिंजानी नावाच्या दिग्दर्शकानं आपल्या पहिल्याच सिनेमातून तो अनुभव दिलाय. या बँडबाजाचा दिल्लीर्पयत गाजावाजा झाला, परंतु तो सातासम्रुापार गेला, तर तिथंही त्याचा गाजावाजा झाल्यावाचून राहणार नाही, एवढी प्रचंड ताकद आहे त्यात. शंतनू रोडे या लेखकाच्या या कथेला रोहित नागभिडेचं संगीत आणि प्रकाश होळकर यांच्या गीतांनी खोल आशय प्राप्त करून दिलाय. मिताली जगताप - वराडकर आणि विवेक चाबूकस्वार या दोघांनाही राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. त्यांच्यासह मिलिंद शिंदे, उषा नाईक, नम्रता आवटे, राजेश भोसले या सगळ्यांनीच सिनेमा जिवंत केलाय.
देशातील पहिला कलात्मक चित्रपट सावकारी पाशबाबूराव पेंटर यांनी दिला. तरीही मराठीत हा प्रवाह म्हणावा तेवढा सशक्त बनला नाही. अधुनमधून काही चांगले प्रयोग होत राहिले. बाबू बँडबाजाहा अशा प्रयत्नांमधला केवळ चांगलाच नव्हे तर लक्षणीय प्रयोग म्हणावा लागेल. जागतिक पातळीवरील एखाद्या चित्रपटाशी नाते जोडणारा मराठी चित्रपट आठवण्यासाठी खूप ताण द्यावा लागतो, तरीही आठवत नाही. बाबू बँडबाजाने थेट बायसिकल थीव्जची आठवण करून दिली, यावरूनच त्याचं वेगळेपण लक्षात यावं. राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यामुळं बाबू बँडबाजाप्रदर्शित झाल्यानंतर प्रसारमाध्यमांना त्याची किमान दखल तरी घ्यावी लागली. नाहीतर तो प्रदर्शित कधी झाला आणि गेला कधी हेही कळलं नसतं. चांगल्या सिनेमाला जाहिरातीची गरज असते, हे खरंच आहे. जाहिराती हा सिनेमावाल्यांचा भाग असतो आणि परीक्षण किंवा चांगल्या सिनेमाला प्रसिद्धी देणं ही प्रसारमाध्यमांची जबाबदारी जबाबदारी असते. परंतु गेल्या दोन आठवडय़ांत वृत्तपत्रांतून, वृत्तवाहिन्यांवरून मराठी सिनेमाची जी काही प्रसिद्धी होतेय, त्यात बाबू बँडबाजाला फारशी जागा दिलेली दिसत नाही. गावोगावच्या छोटय़ा बँडवाल्यांना मोठय़ा पाटर्य़ानी मारलं. केवळ मयतीचं वाजवणंच त्यांच्यासाठी उरलं. बँडवाल्यांची उपेक्षा झाली, तशीच उपेक्षा राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित झालेल्या बाबू बँडबाजाच्या नशिबी आली !


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट

फिनिक्सच्या राखेतून उठला मोर

सरोजिनीताईंची चटका लावणारी एक्झिट