देवाची चोरी आणि सामूहिक दिवाळखोरी



 
 चित्रपट सृष्टीत सध्या सीक्वेलचा जमाना आहे. मराठीत मूळ सिनेमाच्या कर्जानेच निर्माता एवढा घाईला येतो, की सीक्वेलच्या भानगडीत पडण्याचा प्रश्नच येत नाही. हिंदीच्या अनुकरणाची मोठी परंपरा असूनही मराठीने अद्याप तो रस्ता धरलेला नाही. परंतु प्रयोग म्हणून राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या देऊळचित्रपटाचा सीक्वेल काढायला हरकत नाही.  कथेसाठी फार कष्ट घ्यावे लागणार नाहीत. दिवेआगर येथील सतरा नोव्हेंबर एकोणिसशे सत्त्याण्णव ते तेवीस मार्च दोन हजार बारा या काळाशी साधम्र्य असणारे चित्रण आताच्या चित्रपटात आले आहे. तेवीस मार्च दोन हजार बारा नंतरच्या घटना जशाच्या तशा घेतल्या तरी पहिल्यापेक्षा सरस चित्रपट होईल. मग त्यात उद्धव ठाकरे यांच्यापासून विनोद तावडे यांच्यार्पयतची अनेक पात्रे घेता येतील. देऊळ सिनेमाला विरोध करणाऱ्या आणि राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर तो परत घेण्याची मागणी करणाऱ्या हिंदू जनजागृती समितीच्या धर्मरक्षकांनाही संधी देता येईल. विधिमंडळात मूर्ती नेऊन आरती करणाऱ्या आमदारांच्या कर्तृत्वावर प्रकाश टाकता येईल. हे सगळे ऑस्करच्या तोडीचे आहे, हे कुणाच्याही लक्षात येईल.
सारेच अस्वस्थ करणारे आहे. महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचा पुरोगामी महाराष्ट्र म्हणून आपणच आपली पाठ थोपटून घेतो, आणि मिळून सगळेजण व्यवहार मात्र उलटा करतो. काळाचे चक्र उलटे फिरवण्याची, सद्सद्विवेकबुद्धी गहाण टाकून व्यवहार करण्याची अहमहिका दिसते सगळीकडे. दिवेआगरच्या सुवर्णगणेशाच्या चोरीनंतर ज्या घटना घडताहेत त्या सगळ्या, महाराष्ट्र हे वैचारिकदृष्टय़ा किती गोंधळलेले राज्य आहे, यावर शिक्कामोर्तब करणाऱ्या आहेत. सगळेच तुकडय़ा-तुकडय़ांमध्ये विखुरले आहे. प्रत्येक तुकडय़ाचा आशय वेगळा आहे. तरीही हे सगळे तुकडे जोडण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्राच्या सामाजिक-सांस्कृतिक जीवनावर भाष्य करणारा एक उत्तम चित्रपट डोळ्यासमोरून सरकतो. दिवेआगरच्या घटनेनंतर सरकारपासून सामान्य लोकांर्पयत सगळ्याच पातळीवरचे व्यवहार किती बेजबाबदार आणि सवंगपणाचे आहेत, हे नव्याने समोर येऊ लागते. दिवेआगरच्या ्रौपदीबाई धर्मा पाटील यांच्या नारळ-सुपारीच्या वाडीत  नोव्हेंबर  रोजी दीड किलो वजनाचा सुवर्णगणेश सापडला. कायद्यानुसार हा सोन्याचा मुखवटा पुरातत्त्व खात्याच्या मालकीचा होता, परंतु गावकऱ्यांनी तो गावातच ठेवण्याचा आग्रह धरला आणि नांदवीभूषण मनोहर जोशी यांच्या सरकारने अनेक सवंग निर्णयांप्रमाणे इथेही लोकाग्रह मान्य केला. एरव्ही छोटय़ा छोटय़ा कारणांसाठी नडणाऱ्या पुरातत्त्व विभागाने कच खाल्ली आणि दिवेआगरमध्ये सुवर्णगणेशाची प्रतिष्ठापना झाली. एवढय़ा अनमोल ठेव्याची जपणूक आणि सुरक्षा करण्याबाबत गावकऱ्यांनी ढिलाई दाखवली, हे नजरेआड करून सारे खापर राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर फोडले जात आहे. महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्था अलीकडच्या काळात चिंताजनक बनली आहे, हे खरे असले तरी सगळे खापर पोलिसांवर फोडून आपल्याला नामानिराळे राहता येणार नाही. म्हणजे आपण सुरक्षेत गलथानपणा करायचा आणि चोरी झाली, की जबाबदारी पोलिसांवर ढकलायची. आपण आपल्या पोरीबाळींना शिस्त लावायची नाही आणि त्यांनी मद्यपान करून अपघात केले की, खापर पोलिस आणि वाहतूक व्यवस्थेवर फोडायचे, हे किती दिवस चालणार ? दीड किलो सोन्याचा मुखवटा म्हटले तर गावकऱ्यांनी देवाच्या भरवशावरच ठेवला आणि शेवटी घडू नये ते घडले. सोन्याचा मुखवटा कधीतरी सापडेल, किंवा कुणीही भक्त त्यापेक्षा अधिक सोने देऊन तसलाच मुखवटा बनवून घेता येईल आणि दिवेआगरचे भाग्य पुन्हा फळफळेल. पण या सगळ्यामध्ये ज्या दोन सुरक्षारक्षकांचे जीव गेले, ते परत येणार नाहीत, याबद्दल कुणीच बोलताना बोलताना दिसत नाही. देवस्थान एवढे जागृत होते, तर मग चोरी झालीच कशी आणि देव आपल्याच रक्षकांच्या प्राणाचे रक्षण का करू शकला नाही? श्रद्धा आणि भावनेच्या पलीकडे जाऊन असे प्रश्न उपस्थित करण्याचे धारिष्टय़ आपण दाखवणार आहोत की नाही ?
सुवर्ण गणेशाने दिवेआगरचे भाग्य पालटले, ते सारेच देऊळसिनेमाशी मिळते जुळते आहे. फक्त देव वेगळा आहे. सिनेमात देवाच्या नावावरचा बाजार दाखवताना देवाला मात्र सुरक्षित ठेवले आहेत. त्याअर्थाने सिनेमा रुढीवादीच म्हणता येईल. याच अनुषंगाने गेल्या आठवडय़ात एक एसएमएस फिरत होता, त्यात म्हटले होते, ‘चोरी सोन्याची झाली आहे. देव चोरीला जात नाहीत..पण सगळ्यांनी देवच चोरीला गेल्याचा गहजब चालवला आहे. याच अनुषंगाने फेसबुकवर संत गाडगेबाबांच्या एका कीर्तनाचा किस्सा प्रसिद्ध करण्यात आला आहे. तो किस्सा असा आहे :
एका गावात एक नवीन मंदिर बांधण्यात आले. त्यानिमित्त गाडगेबाबांना कीर्तनासाठी बोलावण्यात आले. कीर्तन असे झाले :
गाडगेबाबा - गावात मंदिर बांधलं वाटतं, नाही रे ?
लोक - हो जी.
गाडगेबाबा - आता काय करान?
लोक - देव आणून बसवू जी.
गाडगेबाबा - देव आनान कुठून?
लोक - बाजारातून.
गाडगेबाबा - बाप्पाए, बाजारातून? इकत का फुकट ?
लोक - इकत.
गाडगेबाबा - बाप्पा, देव इकत भेटते? थो का मेथीची भाजी हाये का, कांदे-बटाटे होये बाजारात इकत भेटाले ? बरं आणला इकत, मग काय करान ?
लोक - देवाची आंघोय करून देऊ जी.
गाडगेबाबा - बाप्पा तुमच्या देवाले सोताची आंघोय नाही घालता येत? वा रे तुमचा देव ! बरं, मग काय करान ?
लोक - त्याच्यासमोर निवद ठेवू आन् काठी घेऊन बसू दरवाज्यात
गाडगेबाबा - काहून?
लोक - एकादं कुत्रं येऊ नये आन् देवाच्या निवदाला खावू नये म्हणून जी.
गाडगेबाबा - बाप्पा तुमच्या देवाले सोताच्या निवदावरलं कुत्रं नाही हाकलता येत, थो तुमच्यावर आलेलं गंडांतर कसं दूर करंन रे? म्हणून म्हनते, देव देवळात नसते. देवळात पुजाऱ्याचं पोट असते.

-        दिवेआगरच्या घटनेच्या पाश्र्वभूमीवर गाडगेबाबांच्या या कीर्तनाचा विचार केला तर त्यावर अधिक भाष्य करण्याची आवश्यकता नाही. आज गाडगेबाबा असते तर हिंदूंच्या भावना दुखावल्या म्हणून शिवसेना, भाजपपासून हिंदू जनजागृती समितीर्पयतच्या धर्मरक्षकांनी त्यांच्यापुढे निदर्शने केली असती, त्यांची कीर्तने बंद पाडण्यासाठी राज्यभर आंदोलने झाली असती. भाग्य थोर म्हणून गाडगेबाबांच्या काळात या संघटना नव्हत्या. श्री गणेशाला बुद्धीची देवता आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत मानले जाते. परंतु या बुद्धीच्या देवतेचा उत्सव साजरा करताना होणारे सगळे व्यवहार बुद्धी गहाण ठेवूनच करण्याची परंपरा आपल्याकडे रूढ झाली आहे. दिवेआगरचा श्री गणेशाचा मुखवटा चोरीला गेला म्हणून सिद्धीविनायकाला साकडे घातले जाते. उद्या सिद्धीविनायक मंदिरात चोरी झाली तर कुणाला साकडे घालायचे, याचाही विचार आताच करून ठेवला पाहिजे. एकूणच गणरायाच्या चरणी महाराष्ट्राला बुद्धी दे !अशी विनवणी करण्याची वेळ आली आहे.

टिप्पण्या

  1. ह्या सर्व मुखंडांना ,आपण काहीतरी वेड्यासारखे, किंवा जनतेला आपण बनवण्याचा प्रयत्न करतो आहोत हे काळात नाही असे नाही.पण राजकारणापुढे यांना काहीही सुचत नाही.डोळ्यावर झापडे लावून घेतल्यावर दुसरे काय होणार?बाकी देव चोरीला जातो हे तर अत्यंत भयानक आहे.तरीपण आमचे डोळे उघडणार नाहीत.हि देवाचीच काहीतरी लीला आहे असे समजायला आम्ही मोकळे.बरे झाले.देवालाच देवाची काळजी.एक देवाचे दुकान बंद तरी होईल.तेव्हढेच समाधान.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट

एका ‘सुपारी’ची डायरी

फिनिक्सच्या राखेतून उठला मोर