रामदेवबाबांच्या निमित्ताने भगव्या सेनेची जमवाजमव

योगगुरू रामदेवबाबा यांनी अखेर आपले उपोषण मागे घेतले. दिल्लीतील रामलीला मैदानावरून हनुमानउडी मारून पलायन केले, त्याचवेळी खरेतर त्यांचे उपोषण आणि सत्याग्रहाची ताकद संपली होती. परंतु दिल्लीत मुखभंग झाल्यानंतरही स्वत:च्या ताकदीविषयी फालतू भ्रम बाळगणाऱ्या रामदेवबाबांनी हरिद्वारमध्ये उपोषण सुरू ठेवले. ज्याला कें्रसरकारच्या लेखी काडीचीही किंमत नव्हती. रामलीला मैदानात बाबांच्या नैतिकतेचा फुगा फुटल्यामुळे प्रसारमाध्यमांनीही त्यांच्या या उपोषणाकडे फारसे लक्ष दिले नाही. उपोषणकाळात अखंड बडबड करीत राहिल्यामुळे नियोजित वेळेआधीच त्यांना रुग्णालयात हलवावे लागले. प्रकृती खालावल्यामुळे श्रीश्री रविशंकर, मोरारी बापू वगैरे मंडळींनी आग्रह करून त्यांना उपोषण सोडायला लावले. देशातील जनतेला भ्रष्टाचाराविरोधात लढय़ासाठी सिद्ध करण्याच्या बढाया मारीत सुरू केलेल्या एका धंदेवाईक नाटकबाजाचे ढोंग उघडे पडले. राजहंस डौलदार चालतो म्हणून बदकाने तसा प्रयत्न केला तर त्याला राजहंसाचा डौल येऊ शकत नाही. रामदेवबाबाचेही तसेच झाले. अण्णा हजारे यांना भ्रष्टाचाराविरोधातील उपोषणामुळे मिळालेली प्रसिद्धी पाहून पोटात दुखू लागलेल्या रामदेवबाबांनी उपोषणाचा बेत आखला. कदाचित त्यांना वाटले असावे की, देशभर आपले लाखो योगानुयायी आहेत आणि त्यांच्याद्वारे दबाव आणून आपण सरकारला हवे तसे नमवू शकू. परंतु आंदोलनासाठी केवळ गर्दी पुरेशी नसते तर नैतिक बळ असावे लागते. हे नैतिक बळ केवळ योगासने करून येत नाही. अण्णा हजारे यांनी आतार्पयत अनेकदा सत्ताधाऱ्यांना नमवले आहे, ते केवळ नैतिक बळावर. त्यासाठी त्यांना कधी वातानुकूलित मांडव घालावा लागला नाही. हजारो लोक जमवावे लागले नाहीत. टायर जाळून रस्ते अडवावे लागले नाहीत किंवा गाडय़ांच्या काचा फोडाव्या लागल्या नाहीत. लोकपाल विधेयकासाठी त्यांनी जे आंदोलन केले त्यामागे नैतिक बळ हीच ताकद होती. परंतु अण्णा दिल्लीत पोहोचल्यावर त्यात कुठून कुठून कोण कोण घुसले आणि गांधीवादी आंदोलनाचा झकपक इव्हेंट करून टाकला. काहीही असले तरी अण्णांपुढे सरकारला नमते घ्यावे लागले. आंदोलनाला देशभरातून मिळालेला प्रतिसाद पाहून चक्रावलेल्या रामदेवबाबांना वाटले की, अण्णा हजारेंसारखा फारसे समर्थक नसलेला फाटका माणूस एवढे रान उठवू शकतो, तर आपण सरकारविरोधात देश पेटवू शकतो. अर्थात हे रामदेवबाबांना वाटत होते, की त्यांना घोडय़ावर बसवणाऱ्या संघपरिवाराला वाटत होते कुणासठाऊक. परंतु बाबा घोडय़ावर बसले. सुरुवातीला सरकारमधल्या चार चार मंत्र्यांनी त्या घोडय़ापुढे ढोल-ताशे वाजवले. बाबा ज्या घोडय़ावर बसले आहेत, ते घोडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तबेल्यात वाढलेले आहे, हे लक्षात आल्यावर त्याच मंत्र्यांनी आंदोलनाची ही वरात मध्यरात्री उधळून लावली.
ही सगळी पाश्र्वभूमी विचारात घेतल्यानंतर बाबांचे नंतरचे उपोषण आणि त्यांच्या हेतूची चर्चा करता येते. रामदेवबाबांच्या आंदोलनामागे संघपरिवार आणि भारतीय जनता पक्ष आहे, हे एव्हाना लपून राहिलेले नाही. साध्वी ष्टद्धr(७०)तंभरा यांची बाबांच्या मंचावरील उपस्थिती आणि बाबांनी केलेले त्यांचे समर्थन हे त्याचेच निदर्शक होते. रामलीला मैदानातील आंदोलन उधळल्यानंतर देशभर भारतीय जनता पक्षाने ज्या पद्धतीने भ्रष्टाचारविरोधातील लढाई ही आपलीच असल्याच्या अविर्भावात जी काही प्रदर्शने केली, त्यामुळे तर त्यावर शिक्कामोर्तब झाले. आंदोलन उधळल्यानंतर भाजपच्या नेत्यांनी जी वक्तव्ये केली आणि राजघाटावर जो नृत्याविष्कार घडवला यातून त्यांच्यामध्ये किती वीरश्री संचारली होती, याची कल्पना येते. साध्वी उमा भारती यांचे पक्षात याच सुमारास पुनरागमन व्हावे याला केवळ दैवी योगायोग म्हणता येईल. लालकृष्ण अडवाणी यांनी रथयात्रेच्या आधी जशी जमवाजमव सुरू केली होती, साधारण त्याच्या जवळपास जाणारे चित्र निर्माण झाल्याचे दिसत होते. त्यावेळी मुद्दा राममंदिराचा होता. यावेळी रामदेवबाबांना पुढे करून विदेशातील काळ्या पैशाचा मुद्दा घेतला होता. श्रीश्री रविशंकर यांच्या हस्ते रामदेवबाबांनी उपोषण सोडले तेव्हा तर त्यांच्या अवती-भोवती कुंभमेळ्याच्या ठिकाणी दिसतात तसा भगव्या कपडय़ातील लोकांचा वावर दिसत होता. शब्दांचे अर्थ समजून न घेता प्रसारमाध्यमातली मंडळी त्यांना साधू किंवा संत असे संबोधतात, ही त्यातली आणखी एक गंभीर गोष्ट. अर्थात आजच्या काळात साधूचा वेश घालून लफंगेगिरी करणाऱ्यांचे प्रमाण वाढले असल्यामुळे ते फारसे चुकीचे ठरत नाही. कारण टीव्हीच्या पडद्यावर चमकणारे बहुतांश बुवा हे लफंगेगिरी करणारेच असतात. स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून अशा अनेकांची बिंगे बाहेर काढली गेली आहेत. रामदेवबाबांचे उपोषण मागे घेण्याच्या पुढेमागे एका वृत्तवाहिनीवर नेपाळमधील त्यांच्या गैरव्यवहाराचे प्रकरण दाखवण्यात येत होते. रामदेवबाबांच्या ट्रस्टने तिथल्या जमिनी कवडीमोल दराने घेऊन त्या भरमसाठ किंमतीला विकासकांना विकल्या आहेत. त्यातही गंभीर गोष्ट म्हणजे ज्या गरीब शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या, त्यांना फुटकळ मोबदला धनादेशाच्या स्वरुपात दिला गेला, त्या शेतकऱ्यांनी ते धनादेश वटले नसल्याचे कॅमेऱ्यासमोर येऊन सांगितले. असा हा रामदेवबाबांचा व्यवहार. त्यांचा साथीदार बालकृष्णन ज्यास आचार्य म्हटले जाते, त्याच्या तर अनेक भानगडी बाहेर येत आहेत. रामदेवबाबांशी संबंधित देशांतर्गत व्यवहाराच्या अनेक बाबी अद्याप बाहेर यायच्या असून त्या यथावकाश येतील. अशा माणसाच्या हाती लढाईची सूत्रे देऊन संघपरिवार देशात तिसरी क्रांती घडवण्याची स्वप्ने पाहतो, हे म्हणजे दूरचित्रवाणीवरच्या लाफ्टर शोपेक्षाही भारी मनोरंजक ठरले. रामदेवबाबांचे हसे झालेच परंतु संघपरिवाराचेही हसे झाले.
सगळा घटनाक्रम पाहिल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे संघपरिवाराने लक्ष्य निश्चित केले आहे. कें्रातील संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार बदनाम करून जनतेच्या नजरेतून उतरवायचे. त्यासाठी भ्रष्टाचाराचा मुद्दा निवडण्यात आला. परंतु संघपरिवाराचा मुखभंग झाला. मधल्या काळात पांगापांग झालेल्या, विखुरलेल्या भगव्या कपडय़ातील आपल्या गोतावळ्याची जमवाजमव झाली, एवढीच या साऱ्याची निष्पत्ती. आता कधीही आणखी कुठल्या तरी कथित साधूला पुढे करून राममंदिराच्या प्रश्नावर दिल्लीत गर्दी जमवून शक्तिप्रदर्शन करता येऊ शकते. तसेही येत्या तीन वर्षात अधुनमधून सरकारविरोधात आवाज द्यावाच लागेल. त्यावेळी अशी मंडळी सोबत असली म्हणजे हिंदूबांधवांना बांधून ठेवता येईल, असाही त्यांचा हेतू असावा. साध्वी ष्टद्धr(७०)तंभरांच्यासंदर्भातील प्रश्नावर रामदेवबाबांनी त्यांच्या भगव्या वस्त्रांचा सभ्यता आणि संस्कृतीशी संबंध जोडला होता. संघपरिवाराचीही अद्याप तशीच धारणा असावी. परंतु अलीकडच्या काही वर्षात भगव्या वस्त्रांचा हिंसाचार आणि विध्वंसाशी संबंध अधिक दृढ होत चालला असल्याचे गेल्या काही वर्षात भारतीय जनतेच्या लक्षात आले आहे. म्हणूनच त्यांना पाठिशी घालणाऱ्या किंवा त्यांना पाठिंबा देणाऱ्या भाजप आणि तत्सम पक्षांना सत्तेपासून दूर ठेवले जात आहे. ही गोष्टही लक्षात न घेता संघपरिवार पुन्हा पुन्हा भगव्या सेनेची जमवाजमव करीत आहे आणि सत्तेपासून अधिक लांब जात आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट

एका ‘सुपारी’ची डायरी

फिनिक्सच्या राखेतून उठला मोर