राष्ट्रवादीच्या घडय़ाळाचे काटे ‘बारा’कडे

एक तपाची वाटचाल केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेमक्या कोणत्या टप्प्यावर उभा आहे, याचा विचार केला तर बऱ्याच गोष्टी लक्षात येतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पक्षाचे नेतृत्व शरद पवार यांच्याकडून अजित पवार यांच्याकडे आले आहे. पक्षाध्यक्षपदी शरद पवार असले तरी गेल्या एक वर्षापासून पक्षासंदर्भातील सर्व महत्त्वाचे निर्णय अजित पवार यांच्यामार्फत होत आहेत आणि प्रारंभी खळखळ करणाऱ्या पक्षातील अन्य ज्येष्ठ नेत्यांनीही त्यांचे नेतृत्व मान्य केले आहे किंवा त्यांना जाहीर विरोध करण्याचे धाडस तरी अद्याप केलेले नाही. ही झाली पक्षांतर्गत बाब. दुसरी गोष्ट म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसला टार्गेट करताना आता प्राधान्याने अजित पवार यांनाच टार्गेट केले जात आहे, याचा अर्थ विरोधकांनीही अजित पवार हेच राष्ट्रवादीचे नेते असल्याचे मान्य केले आहे. अशा रितीने अनेक पातळ्यांवर नेतृत्व प्रस्थापित होत असताना अजित पवार अधिकाधिक आक्रमक होऊ लागले आहेत. मूळचाच आक्रमक स्वभाव, परंतु नेतृत्व करताना त्याला प्रगल्भतेची जोड हवी, त्याचा अभाव जाणवल्यावाचून राहात नाही.
अजित पवार यांच्याकडे नेतृत्व आल्यामुळे पक्षाला तरुण चेहरा मिळाला, ही गोष्ट खरी असली तरी पक्षाच्या पातळीवर तिसऱ्या फळीत मात्र जाणत्या कार्यकर्त्यांचा अभाव दिसतो. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतरच्या पहिल्या निवडणुकीनंतर पक्ष काँग्रेससोबत राज्यातील सत्तेत आला तेव्हा शरद पवार यांनी पक्षातील सर्व तरुण तुर्काना मंत्रिपदे देऊन नेतृत्वाची एक फळी उभी करण्याचा प्रयत्न केला होता. आर. आर. पाटील, जयंत पाटील, अजित पवार, दिलीप वळसे-पाटील, अनिल देशमुख, सुनील तटकरे, बबनराव पाचपुते, राजेश टोपे, हसन मुश्रीफ आदींना मंत्रिपदे देऊन मंत्रिमंडळ म्हणजे ज्येष्ठांची भरती हा समज खोडून काढला. त्यानंतर सुमारे बारा वर्षाचा म्हणजे एका तपाचा काळ लोटला आहे, परंतु आजही मंत्रिमंडळात हेच चेहरे कायम आहेत. शरद पवार यांनी तरुण म्हणून आणलेले हे चेहरे सर्वच अर्थानी राजकारणात निबर बनत चालले आहेत. संवेदनशीलतेच्या पातळीवर साऱ्यांनीच जाणीवपूर्वक आपली त्वचा राठ करून घेतली आहे. आर. आर. पाटील यांनी प्रारंभीच्या काळात संवेदनशील राजकारणी म्हणून स्वत:ला सिद्ध केले, परंतु संवेदनशीलतेचा तो पोत त्यांना गृहखात्याची जबाबदारी सांभाळताना जपता आला नाही. याच संवेदनशीलतेतून त्यांनी आव्हान म्हणून गडचिरोलीचे पालकमंत्रिपद स्वीकारले. शरद पवार यांनी बारा वर्षापूर्वी नेतृत्वाची सूत्रे दिलेल्या या फळीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडे नवे नेतृत्व कुठे आहे? नंतरच्या काळात सुप्रिया सुळे, अकलूजचे रणजितसिंह मोहिते-पाटील अशी मोजकी नावेच समोर येतात. परंतु यापैकी कुणालाही अद्याप स्वत:ला पुरेशा क्षमतेने सिद्ध करता आलेले नाही. शरद पवार यांनी बारा वर्षापूर्वी या तरुणांना मंत्रिपदे दिली त्यांनी पहिल्या टर्ममध्ये अशा झपाटय़ाने कामे केली, की त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसला मागे टाकून राज्यात सर्वाधिक जागा मिळवल्या होत्या. मात्र हा जोर पुढे टिकला नाही, कारण वय वाढेल तसा मंत्र्यांचा उत्साह कमी होण्याबरोबरच ते सराईत बनत चालले.
बारा वर्षाच्या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. शरद पवार यांचे कें्रातील राजकारण, बीसीसीआय आणि आयसीसीच्या माध्यमातून क्रिकेट संघटनांमधील राजकारण, देशाच्या पातळीवरील शेती आणि शेतकऱ्यांसंदर्भातील प्रश्न, महागाई अशा अनेक कारणांमुळे शरद पवार सातत्याने टीकेचे लक्ष्य राहिले. विरोधी पक्षांनी तर पवार यांना टार्गेट केलेच परंतु काँग्रेसनेही अनेकदा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या पवारांवर टीका सुरू ठेवली. त्यानिमित्ताने शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सतत टीकेचे लक्ष्य बनत राहिला. या काळात आर. आर. पाटील यांचा अपवाद वगळता पवारांवरील टीकेला उत्तर देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमधील कुणी फारसे पुढे आल्याचे दिसले नाही. हेच चित्र अजित पवार यांच्यावरील टीकेच्यावेळीही दिसून आले. अजित पवार यांच्यावह चहुबाजूंनी टीकेचे मोहोळ उठले असताना, आरोपांच्या फैरी झडत असताना राष्ट्रवादी काँग्रेसमधील कुणी फारसे पुढे आले नाही. अजित पवार यांचे पक्षातील वाढते प्रस्थ त्यांच्या समकालीन आणि ज्येष्ठ नेत्यांना आवडणारे नव्हते. त्यामुळे परस्पर त्यांची जिरवली जातेय, हे पक्षातील अनेकांना सुखावणारे होते. व्यक्तिगत व्यवहारांच्या निमित्ताने होणाऱ्या आरोपांचे समजू शकते, की त्यासंदर्भात त्यांनी स्वत:च खुलासे करायला पाहिजेत. त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर टीका केल्यानंतर राज्यभर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याविरोधात आंदोलने केली. शिवसेनेच्या सर्व फळ्यांमधल्या नेत्यांनी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांनीही अजित पवार यांच्यावर टीकेची झोड उठवली. हा अजित पवार यांचा व्यक्तिगत मामला नव्हता. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यावेळीही त्यांचे समर्थन किंवा शिवसेनेचा सामना करण्यासाठी पुढे आले नाहीत. तीच गोष्ट छगन भुजबळ यांच्यावरील आरोपांबाबतची. शिवशक्ती-भीमशक्ती युती, नामांतराचे राजकारण या पाश्र्वभूमीवर भुजबळ यांच्यावरही हुतात्मा चौकाच्या स्वच्छतेच्या निमित्ताने आरोप झाले. त्यासंदर्भातही पक्षाच्या पातळीवर अळीमिळी गुपचिळीचेच धोरण अवलंबले गेले. आर. आर. पाटील यांनाही गृहखात्याच्या निमित्ताने अधूनमधून लक्ष्य करण्यात आले. प्रत्येकवेळी ज्याच्यावर आरोप झाले, त्याच नेत्याला स्वत:च्या बचावासाठी किंवा खुलाशासाठी पुढे यावे लागले. नेत्यांवरील आरोप हे पक्षावरील आरोप असल्याचे कधीच मानले गेले नाही. राज्य सहकारी बँकेचे संचालक मंडळ बरखास्तीच्या प्रकरणात तर शरद पवार यांच्यापासून यच्चयावत नेते हे काँग्रेसचे राजकीय कारस्थान असल्याचा आरोप करीत असताना ग्रामविकास मंत्री जयंत पाटील मात्र मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या सुरात सूर मिसळून ही कारवाई राजकीय स्वरुपाची नसल्याचे सांगत होते. दुसऱ्या फळीतील नेत्यांमध्ये एकवाक्यता नाही. एकोपा नाही. पक्ष म्हणून एकत्रितपणे काम करण्याची वृत्ती नाही. पक्षांतर्गत शह-काटशहाचे राजकारणच जोरात सुरू आहे. अर्थात हे राजकारण आधीपासून सुरू आहेच, परंतु गेल्या वर्षभरात त्याला जोर आला आहे. पक्षाचे नेतृत्व करणाऱ्या अजित पवार यांना या सगळ्या अंधाधुंदीची जबाबदारी टाळता येणार नाही. नेतृत्व हे केवळ आक्रमकपणामुळे प्रस्थापित होत नसते. सर्वाना बरोबर घेऊन जाण्यात खरे नेतृत्वकौशल्य असते. ज्येष्ठांचा आदर करतानाच त्यांना विश्वास देत, समवयस्कांना बरोबर घेऊन आणि नव्यांना कौतुकाची थाप देत पुढे जायचे असते. परंतु यापैकी काहीही न करता अजित पवार यांची हल्लाबोल एक्सप्रेस सुसाट निघाली आहे. हे करताना राज्यकर्ते म्हणून त्यांच्यातील संवेदनशीलतेचे, निर्णयक्षमतेच्या धडाडीचे दर्शन म्हणावे तर तेही घडलेले नाही. आक्रमकपणा गरजेचा असला तरी राजकारणासाठी तेवढीच गरज नाही. पुणे जिल्ह्याचे राजकारण करताना कदाचित तो गुण फायद्याचा ठरला असेल. परंतु राज्याचे राजकारण करताना अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. अजित पवार यांनी तो तसा केला नाही, तर बाराव्या वर्षानंतर राष्ट्रवादीच्या घडय़ाळाचे काटे बाराच्या आकडय़ाकडे सरकल्याशिवाय राहणार नाहीत.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट

एका ‘सुपारी’ची डायरी

फिनिक्सच्या राखेतून उठला मोर