‘महिलाराज’ चे नुसतेच ढोल
पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी आणि तमिळनाडूमधील जयललिता यांच्या विजयामुळे देशात महिलाराज प्रबळ झाल्याची चर्चा सुरू झाली. उत्तर प्रदेशात मायावती, दिल्लीमध्ये शीला दीक्षित या आधीपासूनच मुख्यमंत्री आहेत. राष्ट्रपतीपदी प्रतिभा पाटील, लोकसभेच्या सभापतीपदी मीरा कुमार आणि देशातील सर्वोच्च राजकीय ताकद असलेले संयुक्त पुरोगामी आघाडीचे अध्यक्षपद सोनिया गांधी यांच्याकडे आहे. देशाच्या सत्तेच्या चाव्या, घटनात्मक प्रमुखपद, लोकसभेचे सभापतीपद आणि चार महत्त्वाच्या राज्यांची मुख्यमंत्रिपदी महिलांच्याकडे आहेत. ममता बॅनर्जी आणि मायावती यांच्या निमित्ताने महिला सबलीकरणाची चर्चा पुन्हा एकदा रंगू लागली, परंतु त्यामध्ये भाबडेपणाच अधिक असल्याचे दिसते. पुरुषी वर्चस्व असलेल्या क्षेत्रात महिलांनी जम बसवणे आणि सर्वोच्च सत्तास्थान काबीज करणे, ही निश्चितच महत्त्वाची बाब आहे. राजकारणाचे गुन्हेगारीकरण झालेल्या आणि केवळ जातीय समीकरणांवर राजकारण अवलंबून असलेल्या उत्तर प्रदेशासारख्या राज्यात तर ती खूपच कठिण गोष्ट होती. परंतु कांशीराम यांच्या नेतृत्वाखाली राजकारणाचे धडे गिरवलेल्या मायावती यांनी सारी गणिते जुळवून आणली. ज्या...