सावित्रीबाईंना दगड मारणारे माफी कधी मागणार ?

जोतिरावांनी आपल्या पातळीवर प्रश्नांची मांडणी केली. काही प्रश्नांसाठी आंदोलनात्मक पावले उचलली, मात्र त्याच्या पुढची कामगिरी केली, ती डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी. भारतीय घटनेचे शिल्पकार या नात्याने डॉ. आंबेडकरांच्या समाजक्रांतीच्या विचारांचा प्रभाव भारतीय घटनेवर असणे अपरिहार्य होते. त्यांनी स्त्रियांच्या हक्कांना, तिच्या समतेला आणि मुक्तीला कायद्याचे रूप दिले. ‘एक व्यक्ती - एक मत’ एवढय़ापुरता त्यांनी स्त्री-पुरूष समानतेचा पुरस्कार केला नाही, तर त्याहीपुढे जाऊन ‘एक व्यक्ती - एक मूल्य’ असे नवे क्रांतिसूत्र देशातील स्त्रियांच्या हाती दिले. जगभरातील स्त्रियांना ज्यासाठी दीर्घकाळ लढे द्यावे लागले, त्या गोष्टी भारतातील स्त्रियांना देशाच्या स्वातंत्र्याबरोबर मिळाल्या. याची जाणीव असायलाच हवी आणि देशातील तमाम स्त्रियांनी जोतिराव, सावित्रीबाई आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रती कृतज्ञ असायला हवे.

काही वर्षापूर्वीची घटना आहे. ममता कुलकर्णी नावाची एक अभिनेत्री हिंदी चित्रपटसृष्टीत होती. तिचे आक्षेपार्ह छायाचित्र एका नियतकालिकाच्या मुखपृष्ठावर प्रसिद्ध झाल्यामुळे बरेच वादंग उठले होते. त्याप्रकरणी तिच्यावर गुन्हाही दाखल झाला होता. त्याची बातमी एका वृत्तपत्रात पहिल्या पानावर ठळकपणे प्रसिद्ध झाली होती. साहित्य-संस्कृतीचे अभ्यासक आणि सामाजिक कार्यकर्ते प्रा. राजें्र कुंभार यांच्या कराड येथील निवासस्थानी आम्ही काही मित्रमंडळी गप्पा मारीत बसलो होतो. त्यावेळी त्यांचा एक शेजारी आमच्या बैठकीत आला. चित्रपटसृष्टीचीही बेताची म्हणजे अमिताभ, हेमा मालिनी, माधुरी दीक्षित एवढय़ापुरतीच माहिती असलेला हा शेजारी. ममता कुलकर्णीवरील गुन्ह्याच्या बातमीचे ठळक शीर्षक त्याच्या नजरेत भरले आणि त्याने निरागसतेने प्रा. कुंभार यांना प्रश्न विचारला, ‘सर ही ममता कुलकर्णी कोण हो ?’ त्यावर प्रा. कुंभार पट्कन म्हणाले, ‘तिच्या पणजोबांनी सावित्रीबाईंना दगड मारले होते.’
या उत्तराने खूप विचार करायला लावला. स्त्रियांना शिक्षण मिळू नये यासाठी इथल्या रुढीवादी समाजाने जोतिराव-सावित्रीबाईंना जो त्रास दिला, त्याची जाणीव स्त्रियांना किंचित तरी आहे का? आकाशभराऱ्या घेणाऱ्या स्त्रियांना माहित आहे का, आज आपण ही उड्डाणे घेतोय, त्यासाठीचे पहिले पाऊल सावित्रीबाईंनी उचलले होते तेव्हा आपल्या पूर्वजांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला होता. माहिती असणे, जाणीव असणे आणि त्याप्रती कृतज्ञ असणे या तीन भिन्न गोष्टी आहेत. माहिती असते, म्हणजे पाठय़पुस्तकात वाचलेल्या एखाद्या धडय़ातून जोतिराव-सावित्रीबाईंनी स्त्रीशिक्षणाचे कार्य केले, एवढय़ापुरती जुजबी माहिती दिलेली असते. नाहीतर आपली शिक्षणव्यवस्था विद्यार्थ्यांना मूलभूत ज्ञानापासून दूर ठेवण्याचेच काम करत असते. खून करायला आलेल्या मारेकऱ्यांना माफ केल्याची जोतिरावांची गोष्ट सांगायची किंवा राजर्षी शाहू महाराज अस्वलाशी कुस्ती खेळले त्याबद्दल सांगायचे. सामाजिक सुधारणेच्या क्षेत्रात त्यांनी कोणते मूलभूत कार्य केले आणि ते ऐतिहासिकदृष्टय़ा कसे महत्त्वाचे आहे, हे कळू नये याची पुरेपूर व्यवस्था केली जाते. आठ मार्चचा महिला दिन हा आंतरराष्ट्रीय महिला दिन आहे. त्यामुळे जोतिराव-सावित्रीबाईंचा संदर्भ येत नाही. असे असले तरी या दिवशी महिलांच्या विकासाची, त्यांच्या वाटचालीतील स्थित्यंतरांची चर्चा होत असताना जोतिराव, सावित्रीबाई आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मरण न करता कसे पुढे जाता येईल ? परंतु दुर्दैवाने तसे होताना दिसते. साऱ्याच घटकांनी महिला दिनाचा इव्हेंट एवढा मोठा करून ठेवलाय की, सेलिब्रेशनच्या पलीकडे त्यातून काहीच साध्य होत नाही.
जाणीव आणि कृतज्ञतेचा उल्लेख एवढय़ासाठीच केला की, यादिवशी किंवा अगदी सावित्रीबाई, जोतिराव आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती महिलांच्या वतीने साजरी केल्याचे फार कमी प्रमाणात दिसते. आंबेडकर जयंती दलितांनी, त्यातही पुन्हा बौद्धांनी साजरी करायची. जोतिराव आणि सावित्रीबाईंची जयंतीही माळी समाजाने साजरी करायची, हेच चित्र व्यापक प्रणाणावर दिसते. खरेतर समस्त महिलांचा त्यामध्ये पुढाकार असायला पाहिजे. तो नसतो याचा अर्थ महिला कृतज्ञ नाहीत असा काढला तर तो एकांगी ठरेल. वस्तुस्थिती अशी आहे की, महिलांच्या विकासात जोतिराव, सावित्रीबाई आणि बाबासाहेबांचे योगदान काय आहे, हे नेमकेपणाने कुणी सांगतच नाही. त्यामुळे उच्चभ्रू समाजातील महिलांना बाबासाहेब हे दलितांचे नेतेच वाटत असतात.
जोतिराव, सावित्रीबाई आणि बाबासाहेबांच्या योगदानासंदर्भात आज पुन्हा काही सांगणे अगदीच प्राथमिक स्तरावरचे होऊ शकेल. परंतु जी गोष्ट माहित नसते किंवा माहित करून दिली जात नाही ती वारंवार सांगितलीच पाहिजे. नवे काही नसले तरी कृतज्ञतेने जुन्याची उजळणी केल्याने काही बिघडत नाही.
जोतिराव फुले यांनी दीडशे वर्षापूर्वी स्त्री-पुरुष समतेचा आणि सामाजिक न्यायाचा विचार मांडला. केवळ मांडून थांबले नाहीत तर तो कृतीत आणला. त्यांच्या या कार्यात सावित्रीबाई खांद्याला खांदा लावून सहभागी झाल्या. माणसाच्या आयुष्यात प्रगतीची पहाट होण्यासाठी शिक्षणाला पर्याय नाही हे त्यांनी जाणले होते. स्त्री शिक्षणाचे महत्त्व त्यांना पटले होते, म्हणूनच जोतिरावांनी आधी सावित्रीबाईंना शिकवले आणि त्यांच्या मदतीने स्त्री शिक्षणाची सुरुवात केली. मध्ये त्यांनी पुण्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. ही शाळा वर्षअखेरीस बंद पडली. त्यानंतर अनेक अडचणींचा सामना करीत त्यांनी मध्ये पुन्हा स्त्री शिक्षणाचे कार्य सुरू केले. जोतिराव-सावित्रीबाईंनी सुरू केलेले स्त्री-शिक्षणाचे काम तत्कालीन रुढीवादी समाजाला पटणारे नव्हते. खालच्या जातीतील मुलींनी शिकणे हे तर सहन होण्याचय पलीकडचे होते, त्याचा फुले दाम्पत्याला खूप त्रास झाला, मात्र त्याची पर्वा न करता त्यांनी काम सुरू ठेवले. सावित्रीबाईंना तर खूप सोसावे लागले. शाळेत जाता-येताना लोक शिव्या देत, दगड-धोंडे मारीत, अंगावर चिखल, शेण फेकीत. तरीही न डगमगता त्यांनी आपले शिक्षणाचे व्रत सुरू ठेवले, त्यात खंड पडू दिला नाही. सावित्रीबाईंनी जे दगडधोंडे, चिखल, शेण अंगावर झेलले त्याचीच फुले होऊन पुढच्या काळात समस्त स्त्रियांच्या आयुष्याचे उद्यान बहरले. स्त्री सुधारणेची पहाट झाली, त्याची जाणीव ठेवली नाही, तर तो कृतघ्नपणाच ठरेल.
जोतिरावांनी आपल्या पातळीवर प्रश्नांची मांडणी केली. काही प्रश्नांसाठी आंदोलनात्मक पावले उचलली, मात्र त्याच्या पुढची कामगिरी केली, ती डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी. समस्त भारतातील स्त्रियांसाठी त्यांनी केलेली कामगिरी ऐतिहासिक आहे. देशाला मिळालेल्या स्वातंत्र्याबरोबर देशातील स्त्रियांच्या आयुष्यातही पहाट उगवली, ती केवळ बाबासाहेबांमुळे. भारतीय घटनेचे शिल्पकार या नात्याने डॉ. आंबेडकरांच्या समाजक्रांतीच्या विचारांचा प्रभाव भारतीय घटनेवर असणे अपरिहार्य होते. त्यांनी स्त्रियांच्या हक्कांना, तिच्या समतेला आणि मुक्तीला कायद्याचे रूप दिले. ‘एक व्यक्ती - एक मत’ एवढय़ापुरता त्यांनी स्त्री-पुरूष समानतेचा पुरस्कार केला नाही, तर त्याहीपुढे जाऊन ‘एक व्यक्ती - एक मूल्य’ असे नवे क्रांतिसूत्र देशातील स्त्रियांच्या हाती दिले. स्वातंत्र्याबरोबर इथल्या समस्त स्त्रियानाही स्वातंत्र्य मिळाले. जगभरातील स्त्रियांना ज्यासाठी दीर्घकाळ लढे द्यावे लागले, त्या गोष्टी भारतातील स्त्रियांना देशाच्या स्वातंत्र्याबरोबर मिळाल्या आणि त्याचे श्रेय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनाच जाते. याची जाणीव असायलाच हवी आणि देशातील तमाम स्त्रियांनी जोतिराव, सावित्रीबाई आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रती कृतज्ञ असायला हवे.
भूतकाळात झालेल्या प्रमादांबद्दल माफी मागण्याची एक प्रथा आपल्याकडे आहे. अशा अनेक ऐतिहासिक चुकांबद्दल संबंधितांनी नंतरच्या काळात दिलगिरी व्यक्त केली आहे. कुणी प्रायश्चित्तही घेतले आहे. परंतु स्त्री शिक्षणाचे व्रत घेऊन घराबाहेर पडलेल्या सावित्रीबरईना दडग-धोंडे मारल्याबद्दल नंतरच्या काळात कुणी खेदही व्यक्त केलेला नाही, या वस्तुस्थितीकडेही डोळेझाक करता येत नाही. स्त्री शिक्षणाच्या कामात अडथळे आणले त्यांच्याच लेकी-बाळी आज दूरचित्रवाणी आणि चित्रपटांच्या पडद्यापासून फॅशनच्या रॅम्पर्पयत सगळीकडे लीलया वावरताना दिसतात, यासारखा काव्यगत न्याय दुसरा कुठला असू शकतो ?

टिप्पण्या

  1. samajamadhe krantijyoti savitrimaai vishayeechi asaleli udashinata aapan prakharpane pratyayas aanun dili aahe...hi janiv karun denn aani savitrimaiche karya jatine pudhe nenyasathi pravrutt karann nitant garjeche aahe...te ashach prayatnane falas yeil...jari theva aapale abhinandan!!

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट

एका ‘सुपारी’ची डायरी

फिनिक्सच्या राखेतून उठला मोर