भीमसेनजींचं जाणं, महाराष्ट्र आणि कर्नाटक

कुणाचंही निधन झालं की, आदरांजली वाहताना त्यांच्या जाण्यामुळं पोकळी निर्माण झाली, असं म्हणण्याची आपल्याकडं एक पद्धत आहे. अशी पोकळी निर्माण होणं म्हणजे काय, याचा अर्थ भीमसेनजींसारखा एखादा कलावंत किंवा कुसुमाग्रजांसारखा कवीश्रेष्ठ आपल्यातून निघून जातो तेव्हाच उमगतो. मराठी माणसांच्या नसांनसांतून वाहणाऱ्या संतवाणीला आपल्या पहाडी आवाजाचे कोंदण देणारे पंडित भीमसेन जोशी कृतार्थ जीवन जगले. अवघे गर्जे पंढरपूर..या ओळी पंडितजींच्या आवाजातून येतात तेव्हा पंढरपूरच्या वाळवंटाचं चित्र डोळ्यासमोर उभं राहतं आणि तिथला विठूनामाचा गजर मस्तकात घुमायला लागतो, एवढी ताकद त्यांच्या आवाजात होती.
अशा कलावंताचं जाणं म्हणजे नेमकं काय असतं, याचा विचार करायला लागतो, तेव्हा त्या जाण्यानं निर्माण झालेल्या पोकळीची जाणीव अस्वस्थ करायला लागते. खरंतर भीमसेन जोशी यांचं गाणं ही रोज ऐकण्याची गोष्ट नाही किंवा त्यांच्या मैफिलीला दर महिन्याला हजेरी लावावी असंही काही नसतं कधी. म्हणजे आपल्या रोजच्या ऐकण्यात आणि गुणगुणण्यात नसलेल्या कलावंताचं जाणं अस्वस्थ करतं, कारण त्यांचं गाणं आपलं जगणं समृद्ध करणारं होतं. पंडितजींनी आयुष्यातल्या साऱ्याच भूमिका अतिशय उत्तमपणे पार पाडल्याचं दिसून येतं. उत्तम आणि कृतज्ञ शिष्य, आदर्श गुरू, जबाबदार कुटुंबप्रमुख आणि समाजप्रिय माणूस अशा साऱ्या भूमिका ते समरसून जगले. कर्नाटकात जन्मलेल्या पंडितजींनी महाराष्ट्र हीच कर्मभूमी मानली आणि तिथेच अखेरचा श्वास घेतला. पंडितजी खऱ्या अर्थाने भारतरत्न होते. जाती-धर्म-प्रांतांच्या सीमा पार करून ‘मिले सूर मेरा तुम्हारा.’ म्हणत त्यांनी साऱ्या देशाला एका सुरात बांधण्याचे काम केले. असा मोठा कलावंत कुठल्या प्रांताचा नसतो, हे खरं असलं तरी तो ज्या प्रांताचा असतो तिथल्या लोकांना अभिमान वाटतच असतो. पंडितजींची महाराष्ट्र ही कर्मभूमी असली तरीही कर्नाटकाने त्यांना आपल्याच प्रांताचे सुपुत्र मानले. त्यांना भारतरत्न मिळाले तेव्हा कर्नाटकाने हा आपलाच गौरव मानला. त्यांच्या निधनानंतर कर्नाटक सरकारने लगेच दुखवटा जाहीर केला आणि राजकीय संकटांनी घेरले असतानाही मुख्यमंत्री येडियुरप्पा त्यांच्या अंत्यदर्शनासाठी पुण्यात दाखल झाले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही अंत्यदर्शन घेऊन या महान कलावंताला महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने आदरांजली वाहिली. कर्नाटक सरकारने एक दिवसाचा दुखवटा जाहीर करून पंडितजींच्याप्रती असलेल्या जिव्हाळ्याचे दर्शन घडवले. परंतु महाराष्ट्र सरकारला मात्र दुखवटा जाहीर करण्याचे औचित्य दाखवता आले नाही. महाराष्ट्राचे तडफदार उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार कुठे दिसत नव्हते, म्हणून अनेकांच्या नजरा त्यांना शोधत होत्या. अजितदादा असतील तर कॅमेरे त्यांच्या अवतीभोवती असतील. कार्यकर्त्यांचा, अधिकाऱ्यांचा गराडा असेल असे वाटत होते. परंतु अजितदादा कुठंच दिसत नव्हते. कोल्हापूर जिल्ह्यात त्यांचे पूर्वनियोजित कार्यक्रम होते, त्यामुळे ते तिकडे रवाना झाले होते. त्यामुळे अंत्यसंस्कारांसाठी उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांच्या जनसंपर्क अधिकाऱ्याने प्रसारमाध्यमांच्याकडे शोकसंदेश पाठवून दिला, तिथेच त्यांची जबाबदारी संपली. कोल्हापूर दौऱ्यावर असताना त्यांनी वृत्तवाहिन्यांच्या कॅमेऱ्यापुढे छापील प्रतिक्रिया वाचून दाखवली. भीमसेनजींच्या अंत्यसंस्कारासाठी का उपस्थित राहिला नाहीत, या प्रश्नावर मुख्यमंत्री असताना उपमुख्यमंत्री तिथे असण्याची गरज नाही, असे काहीतरी उत्तर त्यांनी दिले. राज्याला मुख्यमंत्री असताना उपमुख्यमंत्र्यांची गरज काय, असेही याअनुषंगाने म्हणता येऊ शकते. जिथे कर्नाटकाचे मुख्यमंत्री येतात, तिथे महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांना आणि तेही पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री असताना उपस्थित राहावेसे वाटले नाही, यासारखी संवेदनहीनता दुसरी कुठली असू शकते? पंडितची गेलेच आहेत, परंतु कोल्हापूर जिल्ह्यातील लोकांनी महिनाभर तयारी करून कार्यक्रमांचे आयोजन केले आहे आणि तिथे काही प्रश्न मार्गी लावायचे असल्यामुळे त्याला प्राधान्य दिले, असे असते तरीही समजून घेता आले असते. परंतु तसेही काही नव्हते. संपूर्ण देशाने अभिमान बाळगावा असा महाराष्ट्रभूषण कलावंत जगाचा निरोप घेतो, ज्यासाठी कर्नाटक सरकार दुखवटा जाहीर करते, त्यावेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सत्कार समारंभात मश्गूल राहतात आणि तलवार उंचावून अभिवादन करतात, हे संतापजनक आहेच, परंतु आपले राज्यकर्ते किती संवेदनाशून्य आहेत याचे दर्शन घडवणारे आहे. साहित्य-कला-सांस्कृतिक क्षेत्राची मान्यता मिळालेल्या जाणता राजा शरद पवार यांचा हा राजकीय वारसदार असा कसा, हा प्रश्न मनात निर्माण झाल्यावाचून राहात नाही.
महाराष्ट्र सरकारने सांस्कृतिक धोरण तयार केले आहे. परंतु त्या धोरणात राज्यकर्त्यांनी सुसंस्कृत वर्तन कसे करावे याचा समावेश नसावा. आणि असला तरी राज्यकर्त्यांनी ते धोरण वाचण्याची शक्यता नसल्यामुळे त्याचा उपयोग होणार नाही. सरकारी अनास्थेची ही पहिलीच वेळ नाही. कवीवर्य विंदा करंदीकर यांच्या निधनानंतरही काहीसे असेच घडले होते. तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण अंत्यदर्शन घेऊन आले होते, परंतु प्रत्यक्ष अंत्यसंस्कारावेळी कुणाही राजकीय नेत्याला उपस्थित राहावेसे वाटले नाही. छगन भुजबळांपासून साऱ्यांनी शोकसंदेशावरच भागवले होते. त्यात पुन्हा मंत्र्यांचे जनसंपर्क अधिकारी वेगळे असले तरी साऱ्यांचे शोकसंदेश एकाच छापातून काढल्यासारखे नीरस आणि सरकारी भाषेतील असतात. संबंधित अनेक मंत्र्यांना आपल्या नावावर काय संदेश पाठवला आहे, हेही माहीतही होत नसावे. अर्थात सरकारी कामकाजाची हीच पद्धत असली तरी यातून एकूण राज्यकर्त्यांची संवेदनहीनताच दिसते.
मतदारसंघात बारशापासून बाराव्यार्पयत हजेरी लावणाऱ्या राजकीय नेत्यांना आपल्या राज्याचा गौरव वाढवणाऱ्या कलावंतांसाठी वेळ काढता येत नाही. सांस्कृतिक कार्यासाठी सरकारी मंडळे आणि कमिटय़ा स्थापन करून सरकारची जबाबदारी संपते अशीच संबंधितांची धारणा असावी. कर्नाटक आपले शेजारी राष्ट्र आहे. महाराष्ट्राला अनेक प्रश्नांवर उप्रव देणारे राज्य अशी त्यांची आपल्याकडची प्रतिमा आहे, ती खरीही आहे. परंतु कर्नाटकाच्या राज्यकर्त्यांकडून मग ते कोणत्याही राजकीय पक्षाचे असले तरी सांस्कृतिक जाणिवा शिकून घ्याव्यात एवढे दार्रिय़ महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांमध्ये आहे. मराठीची गळचेपी केली जात असली तरीही सीमाभागात मराठी भाषिकांची अनेक साहित्य संमेलने होत असतात. त्याचवेळी बाहेरील काही साहित्य संस्था अधुनमधून मराठी साहित्य संमेलने घेत असतात. नेहमी होणाऱ्या संमेलनांवर सरकारची नजर असतेच असते. परंतु बाहेरच्या संस्थांनी काही उपक्रम राबवले तर कर्नाटक सरकार त्याच परिसरात कन्नड भाषेचे स्वतंत्र संमेलन घेत असते. त्यासाठी सारी सरकारी यंत्रणा कामाला लागलेली असते, हे अनेकदा दिसून आले आहे. एवढी सांस्कृतिक जागरूकता महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांमध्ये यायला काही दशके लोटावी लागतील. केवळ मराठीसाठी स्वतंत्र खाते आणि सांस्कृतिक धोरण तयार करून सरकारची जबाबदारी संपत नाही. सांस्कृतिक क्षेत्राच्या बाबतीत आवश्यक ती संवेदनशीलता राज्यकर्त्यांच्याकडे नसेल तर बाकीच्या सांस्कृतिक बाजारगप्पांना फारसा अर्थ उरत नाही.


ंं

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट

एका ‘सुपारी’ची डायरी

फिनिक्सच्या राखेतून उठला मोर