गुजरातमध्ये दलितांचा आत्मभानाचा लढा

गुजरातमधील उना येथे झालेल्या दलितांवरील अत्याचाराच्या घटनेने गुजरातच्या राजकारणाला नवे वळण लागले आहे. आधीच पाटीदार समाजाचे आंदोलन हाताळण्यात अयशस्वी ठरलेल्या आनंदीबेन पटेल यांच्या कारभाराची लक्तरे उनाच्या घटनेने वेशीवर टांगली. त्यांचे मुख्यमंत्रिपद गेले. त्यामागचे अंतर्गत राजकारण हा वेगळा विषय असला तरी नेतृत्वबदल झाला ही वस्तुस्थिती आहे. मुख्यमंत्री बदल झाल्यानंतरही गुजरातमधील वातावरण बदललेले नाही. उनाच्या घटनेच्या निषेधार्थ दलितांनी अहमदाबाद ते उना दलित अस्मिता मार्च काढून आपल्या भावी वाटचालीची दिशा स्पष्ट केली. जिग्नेश मेवाणी या तरुणाने दलितांचे हे आंदोलन संघटित केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांना गलिच्छ कामे करण्यापासून परावृत्त केले होते. त्यांचाच आदर्श मानून जिग्नेश मेवाणीने लोकांना संघटित केले. त्यांचे आत्मभान जागृत करण्याचा प्रयत्न केला. त्याचाच परिणाम म्हणून उनामध्ये दहा हजार दलितांनी एक शपथ घेतली. डोक्यावरून मैला न वाहून नेण्याची आणि मेलेल्या जनावरांची विल्हेवाट न लावण्याची शपथ. गुजरातमधील दलितांनी उनाच्या घटनेनंतर अशी कामे बंद केली आहेत. त्याचा परिणाम म्हणून गुजरातमध्ये ठिकठिकाणी मेलेली जनावरे उघड्यावर पडल्याचे चित्र दिसत आहे. आणि सरकार नाक दाबून बुक्क्यांचा मार खात आहे.

दलितांनी पारंपरिक कामे बंद करण्याची शपथ घेतानाच प्रत्येक कुटुंबाला पाच एकर जमीन देण्याची मागणी केली आहे. सरकारने ही मागणी मान्य केली नाही, तर देशभर रेल्वेरोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. उनाचे आंदोलन गुजरातपुरते असले तरी त्याला राष्ट्रीय परिमाण आहे. जेएनयू विद्यार्थी संघाचा नेता कन्हैय्या कुमार, तसेच हैदराबाद विद्यापीठातील आत्महत्या केलेल्या रोहित वेमुलाची आई राधिका वेमुला यांचीसुद्धा उनाच्या मेळाव्याला उपस्थित होती. गुजरातमधून दलितांनी फुंकलेले रणशिंग देशभरातील  दलितांचे आत्मभान जागृत करू शकेल, असा विश्वास या आंदोलनाने जागवला आहे. दलित नेत्याला मंत्रिपद देऊन दलितांचा प्रतिकात्मक सन्मान करण्याला महत्त्व आहेच. रामदास आठवले यांनी माग माग मागून मिळालेले मंत्रिपद त्याअर्थाने महत्त्वाचे आहेच. परंतु प्रतिकात्मक मंत्रिपदापेक्षाही दलितांच्याप्रती सन्मानाची भावना  महत्त्वाची असते. गुजरातमध्ये सरकार आणि समाजाकडे त्याचाच अभाव आहे. गुजरात सरकार दलितांच्या जमिनीच्या मागणीला कितपत प्रतिसाद देते, हेही पाहावे लागेल.
उनामधील घटनेनंतर २६ दिवसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यासंदर्भात भाष्य केले. आधी गोरक्षकांवर टीका केली. मग दलितांना मारहाण करू नका. मला गोळ्या घाला, असे भावनिक आवाहन केले. त्यांचे हे वक्तव्य म्हणजे नौटंकी असल्याची टीका जिग्नेश मेवाणी याने केली आहे. पंतप्रधानांनी जेव्हा विकास यात्रा काढली तेव्हा तीन दलित युवकांवर पोलिसांनी गोळ्या झाडल्या होत्या. तेव्हा मोदींनी ‘माझ्यावर गोळ्या झाडा’ असे आवाहन का केले नाही, असा प्रश्न जिग्नेश मेवाणीने उनाच्या मेळाव्यात उपस्थित केला.
गोरक्षकांकडून मारहाण झालेल्या दलितांचा मोदींनी उल्लेख केला होता, परंतु मुस्लिमांचा उल्लेख नव्हता केला. परंतु त्यामुळे काही फरक पडला नाही. उनाच्या मेळाव्याला दलितांना पाठिंबा देण्यासाठी गुजरातमधून ठिकठिकाणाहून मुस्लिम लोकही मोठ्या संख्येने आले होते. मेळाव्यात ‘दलित-मुस्लिम भाई भाई’ अशा घोषणाही देण्यात आल्या. गुजरातच्या आगामी राजकारणाच्यादृष्टिने या घोषणेला विशेष महत्त्व आहे. कारण भाजपने धार्मिक ध्रुवीकरणाचे राजकारण करून मुस्लिमांना एकटे पाडले होते. जातीय दंगलीच्यावेळी मुस्लिमांविरोधात दलितांना वापरले. निवडणुकीच्या राजकारणातही दलितांना वापरून घेतले. उनाच्या घटनेमुळे भाजपच्यादृष्टिने मोठी वजाबाकी सुरू झाली आहे. आधीच पाटीदार समाज विरोधात गेला आहे. त्यात दलितांची भर पडली आहे. मुख्यमंत्री बदलूनही परिस्थितीमध्ये फरक पडलेला नाही.
नरेंद्र मोदी यांनी ज्या गुजरातमधील विकासाचे ढोल वाजवून पंतप्रधानपदाचे दावेदार बनले, त्या गुजरातमधील सामाजिक वास्तव किती भीषण आहे, हे उनाच्या घटनेच्या निमित्ताने जगासमोर आले. उनामधील मेळाव्याहून परतणाऱ्या वीस तरूणांना समतर गावात मारहाण झाली. म्हणजे मेळाव्यासाठी गेलेल्या दलितांना गुजरात सरकार संरक्षणही पुरवू शकले नाही. मारहाण झाल्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि नंतर त्यांनी कारवाई केली. एकूण गुजरातमधील उच्चवर्णियांचा सुंभ जळला तरी पीळ जात नाही, हेच खरे.
दलित-मुस्लिम ऐक्यामुळे गुजरातमध्ये नवी समीकरणे अस्तित्वात येऊ शकतात. परंतु हे ऐक्य आणि आंदोलकांचा जोष किती काळ टिकून राहतो हेही पाहावे लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे अध्यक्ष अमित शहा आणि एकूणच भाजप यासंदर्भात कोणते राजकीय डावपेच लढवतात, याचेही औत्सुक्य आहे. ‘दलित-मुस्लिम भाई भाई’ ही गुजरातमधली घोषणा देशभर पोहोचली, तर भारतीय जनता पक्षाला त्यांची गोमाताच शिंगावरून सत्तेबाहेर भिरकावून देईल, हे सांगायला कुणा ज्योतिषाची गरज नाही.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट

एका ‘सुपारी’ची डायरी

फिनिक्सच्या राखेतून उठला मोर