राज ठाकरे उरले टीआरपीपुरते !

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचा प्रवास पाहिला तर त्यांची धाव सतत एका खड्ड्याकडून दुसऱ्या खड्ड्याकडे सुरू असल्याचे दिसते. आपल्याकडे पुढच्यास ठेच मागचा शहाणा अशी म्हण आहे. राज ठाकरे यांना ती लागू होत नाही, कारण ते स्वतःच नेहमी पुढे असतात. त्यामुळे नेहमी ठेचा त्यांनाच लागतात. शहाणा माणूस दुसऱ्याला ठेच लागली तरी शहाणा होतो, परंतु राज ठाकरे स्वतः ठेचा खाऊनही शहाणे होत नाहीत, असे दिसते. एक-दोन-चार वर्षे हे रांगण्याचे, दुडदुडण्याचे, धडपडण्याचे वय म्हणून लोक बाळलीलांकडे दुर्लक्ष करतात. परंतु दहा वर्षांनंतरही धडपणे उभे राहता येत नसेल तर शंका वाटायला लागते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबद्दल पर्यायाने राज ठाकरे यांच्याबद्दल तसेच वाटायला लागले आहे.
वैद्यकीय प्रवेशासाठीच्या ‘नीट’ परीक्षेच्या निमित्ताने राज ठाकरे पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले. ‘नीट’ रद्द करण्याच्या मागणीसाठी पत्रकार परिषद घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. आणि थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही फोन केला. ‘नीट’ परीक्षेचा प्रश्न गंभीर आहे, हे खरेच. परंतु इथे राज ठाकरे यांच्या भूमिकेला फारसा अर्थ नाही, हेही लक्षात घ्यायला पाहिजे. कारण सुप्रीम कोर्टाने निकाल दिला. त्याविरोधात महाराष्ट्र सरकारने कोर्टात प्रयत्न केले. शिक्षणमंत्री विनोद तावडे व्यक्तिगत लक्ष घालून सगळे प्रकरण हाताळत होते. कोर्टाचा निकाल उलटा गेल्यानंतर केंद्र सरकारच्या पातळीवर प्रयत्न सुरू झाले. सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांनी आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याशी चर्चा करून यंदापुरती सूट देण्याची मागणी केली. ‘नीट’बद्दलची राज ठाकरे यांची भूमिका प्रामाणिक असली तरी राष्ट्रीय पातळीवर एवढे व्यापक प्रयत्न होत असताना त्यांच्या भूमिकेला ‘बाइट’पलीकडे फारसे महत्त्व उरत नाही. परंतु त्यानिमित्ताने का होईना राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा नरेंद्र मोदींपर्यंतचा पूल ‘नीट’ बांधला असल्याचा आभास निर्माण होतो. अर्थात राजप्रेमी माध्यमांनी केलेली ही हवाही असू शकते. राज ठाकरे यांना राष्ट्रीय पातळीवर प्रसिद्धी मिळवून देण्यासाठी ही घटना महत्त्वाची असली तरी त्यांचे राजकारण खड्ड्यात घालणारी आहे, हे इथे लक्षात घेतले जात नाही.
मनसेला दहा वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने गुढीपाडवा मेळावा घेऊन त्यांनी नवी सुरूवात करण्याचे संकेत दिले होते. या मेळाव्यातले त्यांचे भाषणही नेहमीपेक्षा वेगळे होते. गंभीर आणि प्रगल्भ म्हणता येईल असे होते. म्हणजे नकला, शिव्या, व्हाट्सअपवरचे विनोद वगैरे फारसे नव्हते. त्यामुळे समोर उपस्थित असलेल्या त्यांच्या चाहत्यांची निराशा झाली असली तरी फारसे बिघडणारे नव्हते. कारण तत्कालीन हशा-टाळ्यांपेक्षा दीर्घकालीन प्रभाव किंवा पुढची दिशा महत्त्वाची असते. या भाषणात त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या देशभक्तीच्या राजकारणाचा कठोरपणे समाचार घेतला. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार आणि महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस सरकार यांच्यावरही टीकेची झोड उठवली. या भाषणातून त्यांनी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्यादृष्टिनेही काही संकेत दिले नाहीत. निवडणुकीला पुरेसा अवधी असल्यामुळे घाईघाईने काही घोषणा करण्यात अर्थ नाही, असा त्यामागचा उद्देश असू शकतो. परंतु एक शक्यता वाटत होती, की गुढीपाडवा मेळाव्यात थोडे अधिक गांभीर्याने बोलणारे राज ठाकरे पुढच्या काळात बोलण्यापेक्षा कृतीवर भर देतील. महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांना दिलासा देण्यासाठी काही ठोस कृती कार्यक्रम हाती घेतील. परंतु त्याहीबाबतीत त्यांनी हितचिंतकांची निराशा केली. त्यांनी दुष्काळी दौरा काढला. परंतु प्रत्यक्षात तो दुष्काळी दौरा नव्हे, तर कोर्टाच्या तारखांना हजेरी लावण्यासाठी काढलेला दौरा असल्याचे स्पष्ट झाले. प्रसारमाध्यमांतून टीका झाल्यानंतर त्यांना स्वतः सांगावे लागले की, मी कोर्टाच्या तारखांसाठी आलोय म्हणून. दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी त्यांनी एक फोन सुरू केला, आणि दुष्काळग्रस्तांनी संपर्क साधण्याचे आवाहन केले. एवढेच काय ते दृश्य काम. दुष्काळग्रस्त भागात जाऊन काम करण्याचे राहो, मुंबई-ठाण्यात शेकडो दुष्काळग्रस्तांनी स्थलांतर केले आहे, त्यांच्यासाठी पक्ष म्हणून मनसेने काही केले असेल तर, तेही पुढे आलेले नाही. म्हणजे महाराष्ट्राचे नवनिर्माण करण्यासाठी नव्या जोमाने सुरुवात केलेल्या या पक्षाने संकटग्रस्त महाराष्ट्रासाठी काय योगदान दिले, ही बाब गुलदस्त्यातच राहते.
अशा स्थितीत ‘नीट’चा मुद्दा घेऊन राज ठाकरे पुन्हा मैदानात आले असले तरी तत्कालीक प्रसिद्धीपलीकडे त्यातून काही साध्य होणार नाही. महाराष्ट्रासह आठ-नऊ राज्ये आणि सर्व विरोधी पक्षांनी त्यात लक्ष घातले होते. राज ठाकरे यांनी लक्ष घातले म्हणून यंदापुरती नीटमधून सूट देण्याचा निर्णय झाला, असे  म्हणता येत नाही. बारावीच्या मुलांशी संबंधित एका गंभीर मुद्द्यावर आपण प्रवाहाबाहेर नव्हतो, एवढेच त्यांच्यासाठी समाधान. हे खरे असले तरी यानिमित्ताने त्यांच्या मोदींशी जवळिकीच्या ज्या वावड्या उठवल्या जात आहेत, त्या मात्र राज ठाकरे यांचे दीर्घकालीन नुकसान करणाऱ्या आहेत. यदाकदाचित त्यांची आणि मोदींची नजिकच्या काळात भेट झाली तर महिनाभरापूर्वी मोदींच्यावर तुटून पडणारे राज ठाकरे पुन्हा अच्छे दिन आल्याचे पोवाडे म्हणणार आहेत काय ? महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला चिडवण्यासाठी भाजपकडून हे खेळ केले जाताहेत, हे राज ठाकरे यांना कळत नसेल का ? महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष मोठ्या पक्षांनी आपल्या सोयीनुसार वापर करण्यासाठी असल्याचाच समज यातून दृढ होईल. मनसेची उरलीसुरली प्रतिष्ठाही मातीत जाईल आणि राज ठाकरे हा महाराष्ट्राचा अँग्री यंग मॅन वृत्तवाहिन्यांच्या टीआरपी पुरता उरेल
!

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट

एका ‘सुपारी’ची डायरी

फिनिक्सच्या राखेतून उठला मोर