जिथे वाघांची हद्द सुरू होते…

गेल्या काही वर्षांत ‘वाघ वाचवा’ ची साद सातत्याने घातली जातेय.  माणसांच्या रोजच्या जगण्याशी संबंधित अनेक प्रश्न रोज सतावत असताना वाघांना जरा जास्तीच महत्त्व दिले जातेय, अशी ओरडही केली जात होती. वाघांनी माणूस मारल्यापेक्षा अनेकांचे बळी घेणारा एखादा नरभक्षक वाघ गावकऱ्यांनी मारला तर त्यासंदर्भातील बातम्यांना अधिक महत्त्व दिले जात असल्याचे अनेकांना पसंत पडत नव्हते. अर्थात त्याचे कारण वेगळे होते. वाघांची संख्या झपाट्याने कमी होत असल्याचे वन्यप्राणी गणनेमध्ये लक्षात येत होते आणि अशाच गतीने वाघांची संख्या कमी होऊ लागली तर पृथ्वीतलावरून वाघ नष्ट होतील, अशी भीती व्यक्त केली जात होती. प्राण्यांची एखादी प्रजाती नष्ट होणे गंभीर असतेच, परंतु त्याहीपलीकडे त्या प्राण्याच्या अस्तित्वाचा आशय पोहोचवण्याची गरज असते. परंतु तो पोहोचवण्यात सर्वसंबंधित घटक कमी पडत होते. वाघ वाचवले आणि वाढवले पाहिजेत, परंतु ते का याचे नीट स्पष्टीकरण दिले जात नव्हते.
आजसुद्धा वाघ वाचवण्याची गरज का आहे, याबाबतही आवश्यक ती जाणीवजागृती करण्याची गरज आहे. वाघांसंदर्भात अभ्यास करणारी मंडळी ही भूमिका मांडत असली तरी ती नीट पोहोचत नाही. वाघ हा जंगलाचा कुटुंबप्रमुख आहे, असे मानले तर या कुटुंबप्रमुखाच्या रक्षणाला प्राधान्य द्यायला पाहिजे. वाघ वाचला तर जंगल वाचेल. जंगल वाचले तर जंगलातील इतर जीव वाचतील. जंगल ही नदीची आई आहे, असे म्हटले जाते. कारण बहुतेक नद्या जंगलातच उगम पावतात. जंगल पाणी देते. म्हणजे जंगले टिकली तर पाणी टिकेल आणि पाणी टिकले तर माणूस टिकेल. अशी ही नैसर्गिक साखळी आहे. वाघ वाचवणे म्हणजे केवळ वाघाला वाचवणे नव्हे, तर त्यात माणूस वाचवणे, असाही संदेश असल्याचे समजून घ्यायला पाहिजे. हे समजून घेतले तर मग ‘वाघ वाचवा’मोहीम का महत्त्वाची ठरते ते लक्षात येईल. जिथे वाघांची हद्द सुरू होते, तिथे माणसाने ढवळाढवळ करू नये, असाही या मोहिमेचा दुसरा अर्थ निघतो.
या सगळ्या पार्श्वभूमीवर वाघांच्या नव्याने पुढे आलेल्या आकडेवारीचा विचार करायला पाहिजे. वर्ल्ड वाइल्ड फंड आणि ग्लोबल टायगर फोरमने जाहीर केलेल्या या आकडेवारीनुसार जगात ३८९० वाघ अस्तित्वात आहेत. २०१० मध्ये ही संख्या ३२०० होती. म्हणजे गेल्या सहा वर्षांत वाघांची संख्या ६९० ने वाढली आहे. यातली दुसरी नोंद घेण्याजोगी बाब म्हणजे वाघांच्या एकूण संख्येतील निम्म्याहून अधिक वाघ भारतामध्ये आहेत. भारतात २२२६, रशियात ४३३, इंडोनेशियात ३७१, मलेशियात २५०, थायलंडमध्ये १९८, नेपाळमध्ये १८९, बांगलादेशात १०६, भूतानमध्ये १०३, चीनमध्ये सात तर व्हिएतनाममध्ये पाच वाघ असल्याचे ही आकडेवारी सांगते. वाघांची संख्या वाढल्याच्या शुभवर्तमानाबरोबर वाघांच्या अधिवास क्षेत्रात वीस हजार चौरस किलोमीटरने घट झाली असल्याची माहिती याचदरम्यान पुढे आली आहे. वाघांची संख्या वाढली असली तरी गेल्या शंभर वर्षांत झालेली घट फार मोठी आहे. शंभर वर्षांपूर्वी फक्त आशियामध्ये एक लाख वाघ असल्याचे सांगण्यात येते. आणि आज ही संख्या चार हजारांच्या आत आली आहे.
भारतात जे वाघ आहेत, त्यात संरक्षित क्षेत्राबाहेर लक्षणीय आहेत. सोप्या भाषेत समजून घ्यायचे म्हणजे, आपले घर हे संरक्षित क्षेत्र असेल तर अंगण हे संरक्षित क्षेत्राबाहेरचे क्षेत्र येते. त्याला बफर क्षेत्र म्हणतात. या बफर क्षेत्रात लोकवस्ती असते. आपल्याकडे जंगलात राहणारे आणि जंगलावर गुजराण असणारे लोक आहेत. मध, लाकूडफाटा गोळा करण्यापासून अनेक प्रकारच्या या लोकांच्या गरजा असू शकतात. या लोकवस्तीच्या गरजांचा सगळा ताण हे बफर क्षेत्र सहन करीत असते. आणि वाघांच्या हत्येच्या बहुतांश घटना अशा बफर क्षेत्रात घडत असतात. वाघाच्या तर अनेक अवयवांना चीन, हाँगकाँगमध्ये मोठी मागणी आहे आणि त्याला किंमतही चांगली मिळते. या शिकारी रोखणे हे सगळीकडचे प्रमुख आव्हान आहे.

वाघांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी माणसांचीच आहे. या सुविधा, त्याच्या मूलभूत गरजा म्हणजे अन्न, पाणी, जंगल (निवारा) आणि संरक्षण. नैसर्गिक साखळी टिकवणे महत्त्वाचे असते. या साखळीत प्रत्येक जिवाचे महत्त्व असते. वाघ नसतील तर हरणे वाढतील. त्यांचा जंगलांवर ताण येईल. ती शेतीचे नुकसान करतील. साखळीतला प्रत्येक दुवा महत्त्वाचा असतो. माणूस हरणे मारून खाऊ लागला आणि वाघासाठी हरणे कमी पडू लागली, तर आपोआप वाघ गाई-गुरांकडे वळेल. माणसाने निसर्गाच्या साखळीत ढवळाढवळ केली, तर त्याचे दुष्परिणाम त्यालाच भोगावे लागतील, हे लक्षात घ्यायला हवे. संख्या वाढल्याचे दिसत असले तरी माणसाच्या हस्तक्षेपामुळे वाघांसाठी परिस्थिती बिकट बनत चालली आहे. खाणी वाढताहेत. त्यांचे जंगलांवर अतिक्रमण होते आहे. ऊर्जा प्रकल्पांसाठीही नैसर्गिक साधनसंपत्तीवर ताण येतोय. वाघांसाठी जंगलांची सलगता महत्त्वाची आहे. एक जंगल दुसऱ्या जंगलाला जोडणारे हवे. असे कॉरिडॉर नसतील, तर वाघांची संख्या वाढणार नाही. वाघ वाचवण्यासाठी प्रचंड राजकीय इच्छाशक्ती हवी आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट

फिनिक्सच्या राखेतून उठला मोर

सरोजिनीताईंची चटका लावणारी एक्झिट