वाघ, माणूस आणि संशोधक

बेळगावजवळच्या खानापूर परिसरात जवळजवळ सव्वा महिना एका नरभक्षक वाघामुळे हलकल्लोळ माजला होता. वाघाला गोळ्या घालून ठार मारल्यानंतर परिसर भीतीच्या छायेतून मुक्त झाला. खरेतर खानापूर परिसराला वाघाचे तसे अप्रूप नाही. बेळगाव वनविभागांतर्गत असलेल्या खानापूर तालुक्यातील जंगलांत सहा ते सात वाघ आहेत. तालुक्यातील नागरगाळी, लोंढा, भीमगड व कणकुंबी या वनक्षेत्रातच वाघांचे अस्तित्व आहे. सन २०११-१२ मध्ये भीमगडला अभयारण्याचा दर्जा मिळाला. त्यामुळे भीमगड वेगळे वनक्षेत्र बनले. अभयारण्याचे कायदे लागू झाल्याने या वनक्षेत्राला संरक्षण लाभले. परिणामी वाघांची संख्या वाढू लागली. बेळगावपासून ४५ किलोमीटर अंतरावर असलेल्या भीमगडच्या जंगलात १९ नोव्हेंबरला वनखात्याने एक नरभक्षक वाघ सोडला. या वाघाने चिकमंगळूर येथे एका महिलेचा बळी घेतला होता. त्यानंतर त्याला बेशुद्ध करून पकडण्यात आले होते. तिथून दांडेलीच्या जंगलात सोडण्यासाठी नेले, मात्र स्थानिक लोकांनी तीव्र विरोध केल्यामुळे वनखात्याचे लोक वाघाला घेऊन खानापूरच्या भीमगड जंगलात आले. स्थानिक लोकांना कल्पना न देताच वाघ जंगलात सोडण्यात आला. ही वार्ता कळताच पर...