सुप्रिया आणि पंकजा


 


    महाराष्ट्राला राजकारणातील स्त्रियांची सशक्त परंपरा असली तरी गेल्या चोपन्न वर्षांत स्त्री मुख्यमंत्री लाभली नाही, हे पुरोगामी महाराष्ट्राचे शल्य आहे. अलीकडच्या काही वर्षांत त्याचा वारंवार उच्चार होतोय आणि त्यासाठी काही नावेही घेतली जात आहेत. त्यातले पहिले नाव आहे Supriya Sule यांचे. शरद पवार यांच्या कन्या असलेल्या सुप्रिया यांचे नाव गेल्या सहा-सात वर्षांपासून महाराष्ट्राच्या संभाव्य मुख्यमंत्री म्हणून घेतले जात आहे. परंतु ते घेताना घेणाऱ्यांचे त्यामागचे छुपे हेतूही लक्षात आल्यावाचून राहात नाहीत. मुख्यमंत्रिपदाची महत्त्वाकांक्षा बाळगून असलेले अजित पवार यांच्या मार्गात विघ्न आणण्याच्या उद्देशाने सुप्रिया यांचे नाव पुढे केले जाते. त्याआधारे टीव्हीच्या पडद्यावर पवार कुटुंबातला राजकीय संघर्ष काल्पनिकरित्या रंगवता येतो. राजकारणात नवख्या असताना केवळ शरद पवार यांच्या कन्या म्हणून त्यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी घेतले जात होते, हेही लक्षात घेतले पाहिजे. सुप्रिया सुळे यांच्याबरोबरच दुसरे एक नाव अलीकडेच पुढे येत आहे, ते Pankaja Palve यांचे. गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या असलेल्या पंकजा पालवे या मुंडे यांच्या निधनानंतर त्यांच्या राजकीय वारसदार म्हणून भाजपमध्ये पहिल्या फळीतील नेत्यांमध्ये पोहोचल्या आहेत. भाजपांतर्गत शह-काटशहाचे राजकारण म्हणूनही त्यांचे नाव पुढे करण्याचे प्रयत्न होत आहेत. सुप्रिया सुळे असोत किंवा पंकजा पालवे – त्यांची नावे घेण्यामागे कुणाचे काहीही हेतू असोत, परंतु यानिमित्ताने मुख्यमंत्रिपदासाठी दोन स्त्रियांना सक्षम मानले जाते आहे, ही यातली सकारात्मक बाजूही लक्षात घेण्याजोगी आहे.
      सुप्रिया सुळे यांची राज्यसभेवर निवड 2006 मध्ये झाली. त्यानंतर 2009 मध्ये त्यांनी बारामतीमधून लोकसभेची निवडणूक लढवली. म्हणजे प्रत्यक्ष राजकारणात येऊन त्यांना आठ वर्षे झाली आहेत. परंतु शरद पवार यांनी त्यांना एकदम राजकारणात आणलेले नाही. महाराष्ट्राचे विशेषत: तळागाळातल्या घटकांचे प्रश्न त्यांनी समजून घ्यावेत यासाठी राजकारणाआधी त्यांना समाजकार्याचे धडे दिले. भटक्या विमुक्तांच्या मुलांच्या शैक्षणिक विकासासाठी त्या काही वर्षे कार्यरत होत्या. जेणेकरून गावकुसाबाहेरच्या गरिबातल्या गरीब माणसांच्या प्रश्नांची जाणीव व्हावी. बचत गटांच्या चळवळीच्या माध्यमातून महिलांशी संबंधित क्षेत्रात सक्रीय आहेत. जोडीने शिक्षण क्षेत्र आहे. काही प्रमाणात सामाजिक धडे गिरवायला लावूनच शरद पवारांनी आपल्या लेकीला राजकारणात आणले. आठ वर्षापासून त्या खासदार आहेत, परंतु त्यांच्या आतार्पयतच्या वाटचालीवरून त्यांची राजकीय प्रगल्भता दिवसेंदिवस वाढत चालल्याचे दिसते. २०१४च्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने आठ वर्षांनंतर पहिल्यांदाच त्या राजकारणाच्या व्यापक पटावर सक्रीय झाल्याचे पाहायला मिळाले. शरद पवार, अजित पवार यांच्याप्रमाणेच त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर दौरा करून प्रचारसभा घेतल्या. त्यांच्या प्रचारसभांना सगळीकडे प्रतिसादही चांगला मिळाला. आतापर्यंत साहेबांची मुलगी एवढीच ओळख असलेल्या सु्प्रिया सुळे यांनी पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या म्हणून ओळख मिळवली. कारण शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याशिवाय संपूर्ण राज्याच्या प्रचारात राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही नेता नव्हता. राष्ट्रवादी काँग्रेस हा खरेतर नेत्यांचा पक्ष आहे. दुसऱ्या फळीतील दमदार नेत्यांची फळी पक्षाकडे आहे. छगन भुजबळ, सुनील तटकरे, आर. आर. पाटील, जयंत पाटील असे नेते असले तरी बहुतेक आपल्या मतदारसंघातच अडकून पडले. फारतर जवळपासच्या मतदारसंघात काहींनी सभा घेतल्या. परंतु राज्यभर प्रचाराचे रान उठवले, ते पवार कुटुंबीयांनीच.
निवडणुकीआधीपर्यंत सुप्रिया सक्रीय होत्या त्या बचत गटांच्या चळवळीमध्ये. स्त्री-भ्रूण हत्या रोखण्यासाठी त्यांनी राज्यव्यापी अभियान राबवले. महाराष्ट्र राज्याचे युवा धोरण घडवून आणण्यासाठी आणि त्याच्या अंमलबजावणीसाठी पुढाकार घेतला. राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या माध्यमातून युवतींचे संघटन केले. तरुणींना राजकारणात सक्रीय होण्यासाठी आशादायक चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
    पक्षातल्या निर्णय प्रक्रियेत सुप्रिया सुळे यांचा सहभाग किती आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. किंबहुना त्यांनी अद्याप त्यात तेवढे लक्ष घातलेले दिसत नाही. परंतु विधानसभा निवडणुकीच्या प्रचारयंत्रणेची सूत्रे मात्र त्यांच्याकडे होती आणि पक्षात स्वतःचे नेतृत्व प्रस्थापित करण्यासाठीचा एक महत्त्वाचा प्रयोग म्हणूनही त्याकडे पाहावे लागेल. याआधी पक्षातला कुणीही नेता त्यांना प्रश्न विचारू शकला असता किंवा त्यांच्या योगदानाबद्दल शंका उपस्थित करू लागला असता. परंतु विधानसभा निवडणुकीत त्यांनी पायाला भिंगरी बांधून ज्या तऱ्हेने महाराष्ट्र पिंजून काढला, त्यामुळे त्यांच्या योगदानाबद्दल प्रश्न विचारण्याची कुणाची हिंमत होणार नाही.
विधानसभा निवडणुकीच्या आधीपर्यंतच्या त्यांच्या वाटचालीकडे पाहिले तर काही शंका वाटत होत्या. शरद पवारांची मुलगी म्हणून जी संवेदनशीलता आणि झपाटा दिसायला हवा होता, तो त्यांच्या कामातून दिसत नव्हता. मधल्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांपासून आदिवासी भागातील बालमृत्यूर्पयत अनेक प्रश्न तीव्रतेने समोर आले. त्याठिकाणी त्या कुठेच दिसल्या नाहीत. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, नेहरू सेंटर यासारख्या संस्थांच्या कारभारात त्या सक्रीय आहेत. ते आवश्यक आहेच परंतु त्याचबरोबर तळागाळातील लोकांच्या प्रश्नांशी जोडून घेऊन काम करणेही आवश्यक आहे. पहिल्यांदा लोकसभेवर निवडून आल्यानंतर बारामती मतदार संघाशी त्यांनी ठेवलेला संपर्क, लोकांची कामे करून देण्याचा झपाटा हे सगळे मतदारसंघाच्या बांधणीसाठी पूरक ठरणारे आहे. कारण त्यांना माहीत आहे, की Sharad Pawar यांची लेक किंवा बारामतीची माहेरवाशीण म्हणून पहिल्यांदा लोकांनी कौतुकाने निवडून दिले. हे कौतुक फारतर आणखी एका निवडणुकीर्पयत टिकेल. अर्थात दुसऱ्याच निवडणुकीत जे मताधिक्क्य घटले, तो धक्का त्यांना वास्तवाची जाणीव करून देण्यासाठी पुरेसा होता. राजकारणात दीर्घकाळ टिकायचे असेल तर त्यांना स्वत: आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून सिद्ध करावे लागेल. अजित पवार यांनी ते सिद्ध केले आहे. आणि ते त्यांनी केले नसते तर शरद पवारांच्या या पुतण्याला बारामतीच्या लोकांनी कधीच फेकून दिले असते. बारामतीच्या लोकांशी जोडून घेण्यासाठी सुप्रिया सुळे यांची नियोजनबद्ध वाटचाल सुरू आहे, मात्र शरद पवार यांच्या लेकीकडून आणि शारदाबाई पवार यांच्या नातीकडून एवढ्या माफक अपेक्षा नाहीत. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होण्याची क्षमता असलेले नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहणारा घराणेशाहीचा पुरस्कर्ता असलेला मोठा गट आहे. त्यामागील भाबडेपणा त्यांना समजून घ्यायला हवा, परंतु त्यादृष्टिने वाटचाल करायची असेल तर खूप मोठा पल्ला गाठावा लागेल. बारामतीमधला पाया मजबूत करण्याबरोबरच राज्यातील जनतेच्या प्रश्नांशी जोडून घेऊन काम करावे लागेल. बारामतीच्या पलीकडे विदर्भापासून कोकणार्पयत आणि मुंबईपासून खानदेशार्पयत Maharashtra उभा-आडवा-तिडवा पसरला आहे. प्रदेशनिहाय तळागाळातल्या लोकांचे शेकडो प्रश्न आहेत. प्रश्न समजून घेत लोकांशी जोडून घेऊन काम सुरू केले तरच नेतृत्व प्रस्थापित करता येईल. प्रारंभीची त्यांची कार्यपद्धती एनजीओसारखी होती. आता ती अधिक व्यापक आणि राजकारणासाठी आवश्यक अशी बनली आहे.
  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व आजतरी शरद पवार यांच्याकडे आहे आणि त्यानंतरची सगळी सूत्रे अजित पवार यांच्याकडे आहेत. Ajit Pawar यांची पक्षावरही मजबूत पकड आहे. त्यांच्या नेतृत्वाखालीच सुप्रिया सुळे यांना आणखी काही वर्षे वाटचाल करावी लागेल. दोघांमध्ये ईर्षा निर्माण करणारे खुशमस्करे आणि वादाचे चित्र रंगवणारी प्रसारमाध्यमे यांच्या प्रभावापासून सावध राहावे लागेल. अजित पवार यांना मुख्यमंत्रिपद जसे सुप्रिया सुळे यांच्या सहकार्यानेच मिळेल, त्याचप्रमाणे अजित पवार यांच्या विरोधात जाऊन काही साध्य करणे सुप्रिया सुळे यांच्यासाठीही सोपे नसेल.


  Gopinath Munde यांच्या मृत्युनंतर Pankaja Palve ज्या धीरोदात्तपणे परिस्थितीला सामोरे गेल्या, त्यावरून त्यांना भाजपच्या राज्यातील पहिल्या फळीतील नेत्यांमध्ये स्थान मिळाले. जे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी राजकारणातील घराणेशाहीच्या विरोधात आकांडतांडव करीत होते, त्यांनाही पंकजाला सन्मानाचे स्थान द्यावे लागले. त्याचबरोबर बीड लोकसभा मतदारसंघातून पंकजाची धाकटी बहीण प्रीतम यांना उमेदवारी द्यावी लागली.
  गोपीनाथ मुंडे यांचा अकाली मृत्यू हा संपूर्ण महाराष्ट्रासाठी धक्का होता. पंकजा यांच्यासाठी तर आभाळच कोसळण्यासारखे होते. परंतु अगदी प्रारंभापासून त्यांनी जो धीरोदात्तपणा आणि कणखरपणा दाखवला, तो सगळ्या महाराष्ट्राने टीव्हीच्या माध्यमातून पाहिला. अवघ्या पाच वर्षांची राजकीय कारकीर्द असलेल्या पंकजा प्रगल्भपणे वागल्या. त्यातून त्यांची नेतृत्वक्षमता दिसून आली. वडिलांच्या जाण्यानंतर फार दिवस घरात न बसता त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात संघर्ष यात्रा काढली आणि आघाडी सरकारविरोधात रान उठवले. गोपीनाथ मुंडे यांच्या राजकीय कारकीर्दीला उठाव देण्यात संघर्ष यात्रेचा मोठा सहभाग होता, त्याचेच अनुकरण पंकजा यांनी केले. शिस्तप्रिय भाजपमधल्या काहींनी त्यासंदर्भात नाके मुरडली. महाराष्ट्र भाजपमध्ये सामूहिक नेतृत्व असताना एकटीची संघर्षयात्रा कशासाठी, असे प्रश्न विचारण्यात आले. परंतु त्याची जाहीर वाच्यता फारशी झाली नाही. नाहीतर संघर्षयात्रेची दिशा आघाडी सरकारकडून दिल्लीतल्या केंद्रसरकारकडे वळण्याची भीती होती. गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्युच्या चौकशीचा मुद्दा होताच. संघर्षयात्रेच्या निमित्ताने पंकजा यांनी केंद्रीय नेतृत्वालाही आपली ताकद दाखवून दिली. यात्रेच्या दरम्यानच मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतील एक नेते विनोद तावडे यांनी ‘पंकजा या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होऊ शकतील,’ असे जाहीर विधान केले. यात्रेच्या समारोपाला पक्षाध्यक्ष अमित शहा उपस्थित राहिले आणि त्यांनाही पंकजाच्या ताकदीची दखल घ्यावी लागली. अलीकडच्या काळात भाजपच्या जाहिरातींमध्ये मोदींसोबत पंकजाचे फोटोही प्रसिद्ध करावे लागले. नितीन गडकरी, सुधीर मुनगंटीवार, एकनाथ खडसे, देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे यांच्याबरोबरीने पंकजाचे फोटो भाजपला घ्यावे लागले. मुंडे यांच्या निधनानंतरच्या सहानुभूतीचा फायदा घेण्याचा उद्देश त्यामागे आहे. परंतु तसे नसते तर पंकजा बाजूला फेकल्या गेल्या असत्या हेही तेवढेच खरे आहे.
  पंकजा पालवेंच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात २००९ साली झाली. बीड जिल्ह्यातील परळी विधानसभा मतदारसंघातून त्या विजयी झाल्या. बीड लोकसभेच्या अटीतटीच्या निवडणुकीच्या त्या पहिल्यांदा वडिलांच्या निवडणुकीच्या प्रचारात उतरल्या होत्या. त्यांनी ओट्यावर, बाजेवर, चावडीत जाऊन लोकांच्या भेटीगाठी घेतल्या. ३०० गावांमध्ये सभा आणि ४०० गावांना भेटी दिल्या. अनेक ठिकाणी असलेला राजकीय संघर्ष मिटविण्याचा प्रयत्न केला. दुष्काळी परिस्थितीत निर्माण झाली असताना सरकारने दुष्काळी जिल्ह्य़ांत बीडचा समावेश केला नाही. त्याविरोधातील मोर्चाचे संघटन गोपीनाथ मुंडे यांच्यासह आमदार पंकजा पालवे यांनी केले.
बचत गटांच्या चळवळीत पंकजाही अग्रेसर राहिल्या. त्या माधअयमातून त्यांनी महिलांना रोजगार व अर्थसाहाय्य उपलब्ध करून दिले. भटक्या, विमुक्त व इतर मागास समाजातील तसेच आर्थिक दुर्बल घटकातील लोकांना सतत साहाय्य, ऊसतोड कामगारांच्या उन्नतीसाठीही प्रयत्न केले. स्त्री-भ्रूणहत्येस पायबंद बसण्यासाठी लेक वाचवा, राष्ट्र वाचवायोजनेला सुरुवात केली.
  Supriya आणि Pankaja – दोघी वेगवेगळ्या पक्षात आहेत. दोघींची विचारधारा वेगळी आहे. राजकारणात भविष्य वर्तवता येत नाही आणि छातीठोकपणे काही सांगता येत नाही. तरीही महाराष्ट्राच्या भावी मुख्यमंत्री म्हणून दोघींची नावे घेतली जातात. दोघींपैकी कुणी मुख्यमंत्रिपदापर्यंत पोहोचेल किंवा नाहीही. परंतु आपण मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार आहोत, एवढ्या प्रगल्भतेने त्यांना वाटचाल करायला हवी. स्वतः सक्षम होताना राजकारणातल्या अन्य महिलांनाही सक्षम बनवण्यासाठी ताकद द्यायला हवी. महाराष्ट्राच्या मायावती, जयललिता किंवा ममता होण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे किंवा नाही, याचे उत्तर काळच देईल !

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट

फिनिक्सच्या राखेतून उठला मोर

सरोजिनीताईंची चटका लावणारी एक्झिट