मोदींसाठी सरसावले राजू शेट्टी... आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप-रिपब्लिकन पक्ष महायुतीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सहभागी करून घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीला रोखण्यासाठी सर्व विरोधकांनी एकत्र यावे, यासाठीच्या प्रयत्नांचा भाग म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेला महायुतीत सहभागी करून घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. महायुतीच्या या प्रयत्नांना राजू शेट्टी यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. दोन्ही काँग्रेसना रोखण्यासाठी सारे एक होत असतील तर मी वेगळी चूल मांडणार नाही, अशा स्पष्ट शब्दात शेट्टी यांनी पुढची दिशा स्पष्ट केली आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटना सोबत आली की, पश्चिम महाराष्ट्रात वाट सुकर होईल, असे महायुतीच्या नेत्यांना वाटते आणि अलीकडच्या काळात ‘स्वाभिमानी’ने केलेली हवा पाहता तसे वाटणे स्वाभाविकही आहे. परंतु वाटणे आणि प्रत्यक्षात असणे यामध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीइतके अंतर असते. आणि हे अंतर नेमके किती असते, हे राजू शेट्टी यांना गेल्या निवडणुकीवेळी समजून आले आहे. महायुतीचे नेते पुण्या-मुंबईत राहून वृत्तपत्रीय आणि वृत्तवाहिन्यांवरच्या प्रसिद्धीवरून बांधत असलेले आडाखे हे केवळ आडाखेच राहिले तरी आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. परंतु इथे विषय महायुतीच्या आडाख्यांचा नाही, तर राजू शेट्टी यांच्या भूमिकेचा आहे.
राजू शेट्टी यांनी २००४ मध्ये शरद जोशी यांच्या शेतकरी संघटनेपासून फारकत घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेची स्थापना केली. शरद जोशी यांच्या स्वतंत्र भारत पक्षाने भाजपशी युती केली म्हणून राजू शेट्टी यांनी वेगळी वाट धरली होती आणि त्याच वाटेवरून त्यांनी आतापर्यंतचा प्रवास केला आहे. देशाच्या राजकारणाची सेक्युलर आणि कम्युनल अशी विभागणी झाल्यानंतर दहा वर्षांनी राजू शेट्टी यांनी सेक्युलर भूमिकेसाठी वेगळी चूल मांडली होती. आणि त्यानंतर दहा वर्षे होत असताना आणि नरेंद्र मोदी यांच्यासारखा भारताच्या इतिहासातला सर्वाधिक कम्युनल नेता भाजपचे नेतृत्व स्वीकारण्यासाठी सरसावला असताना राजू शेट्टी महायुतीबरोबर जात आहेत, हेही लक्षात घेण्याची गरज आहे. राजू शेट्टी यांना आतापर्यंत जे यश किंवा प्रतिष्ठा मिळाली, ती केवळ त्यांनी काँग्रेसच्या मदमस्त सत्तेला आव्हान देऊन आपले स्थान निर्माण केले म्हणून नव्हे, तर ती प्रतिष्ठा त्यांनी घेतलेल्या सेक्युलर भूमिकेसाठीही होती. आणि आता चळवळ दुय्यम बनून खासदारकी हेच प्रमुख ध्येय उरते तेव्हा भूमिका बासनात गुंडाळून राजकीय आस्तित्वासाठी भाजप-शिवसेनेबरोबर जाण्याची तयारी सुरू होते. याचा अर्थ रामदास आठवले यांच्याच पावलावर शेट्टी यांची पावले पडू लागली आहेत.
प्रारंभी जिल्हा परिषदेची आणि नंतर शिरोळमधून विधानसभेची निवडणूक राजू शेट्टी यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जिंकली. तळागाळातल्या घटकांना बरोबर घेऊन नेटाने चळवळ उभारली की, सामान्य कार्यकर्त्यालाही यश मिळते हे त्यांच्या विजयाने दाखवून दिले. लोकसभेवेळी परिस्थिती तशी नव्हती. राजू शेट्टी यांनी ऊस, दूध दरासाठी केलेली आंदोलने यामुळे जनमत त्यांच्यामागे गोळा होत होते. तरीही स्वबळावर निवडून येण्याएवढी ताकद त्यांच्याकडे नव्हती. सांगली मतदार संघात जयंत पाटील यांनी काँग्रेसचे उमेदवार प्रतीक पाटील यांच्याविरोधात अजित घोरपडे यांना बळ पुरवल्यामुळे काँग्रेसने कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही मतदारसंघांमध्ये अखेरच्या टप्प्यात राष्ट्रवादीविरोधात काम केले. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी दोन्ही ठिकाणी जी रसद पुरवली ती गोष्ट आता भूतकाळात जमा झाली आहे. लक्षणीय ताकद असलेल्या महाडिक गटाने हातकणंगले, वाळवा तालुक्यांमध्ये शेट्टी यांना मदत केली. शिराळ्यात शिवाजीराव नाईक गटाने जाहीरपणे मदत केली. शाहूवाडीत काँग्रेसचा एक गट त्यांच्यासोबत होता. या सगळ्यांचा परिणाम म्हणून निवेदिता माने यांचा पराभव आणि राजू शेट्टी यांचा विजय झाला होता. पुण्या-मुंबईतल्या प्रसारमाध्यमांना तो जसा एका शेतकरी नेतृत्वाचा करिश्मा वाटत होता, तेवढे सरळ आणि सोपे काही नव्हते. नंतरच्या काळात राजू शेट्टी यांची ताकद वाढली आहे, ही वस्तुस्थिती आहे. लोकसभा निवडणुकीत राजू शेट्टी यांचे आणि त्यांच्या पाठिंब्यावर सदाशिवराव मंडलिक यांचे यश हे अनेक घटकांच्या एकत्रित येण्यातून साकारले होते. माध्यमांनी तेच उचलले. परंतु त्यानंतर काही महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटना किंवा खासदार मंडलिक यांना विधानसभेची एकही जागा जिंकता आली नाही, ही बाब कुणी लक्षात घेत नाही.
इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्यादृष्टिने राजू शेट्टी यांची सक्सेस स्टोरी किंवा त्यांनी थेट शरद पवारांना आवाज देऊन बारामतीत केलेले आंदोलन या गोष्टी टीआरपीसाठी महत्त्वाच्या होत्या. त्यातूनही थोडी अधिकची प्रसिद्धी मिळत गेली. राजू शेट्टी हे थेट शरद पवार यांच्यावर हल्लाबोल करताहेत म्हटल्यावर प्रसारमाध्यमांपासून राजकीय पक्षांपर्यंत अनेक घटकांचा त्यांना उघड, छुपा पाठिंबा मिळत गेला. त्यामुळे प्रश्न राज्याच्या सहकारमंत्र्यांशी संबंधित असला तरी शेट्टी यांच्या टीकेचे प्रमुख लक्ष्य शरद पवार हेच राहिले. शेट्टी खासदार बनल्यानंतर त्यांच्या आक्रमणाची धार वाढली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांच्यादृष्टिने राजू शेट्टी ही केवळ पश्चिम महाराष्ट्रातच नव्हे तर राज्याच्या पातळीवर डोकेदुखी बनली आहे. त्यांचा उपद्रव दोन्ही काँग्रेसवाल्यांच्या सहकारी संस्थांना होत आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत काहीही करून त्यांची खासदारकीची कवचकुंडले काढून घेण्याची तयारी दोन्ही काँग्रेसच्या पातळीवर सुरू आहे. राजू शेट्टी यांनी केलेले संघटन आणि मतदारसंघात त्यांना सद्यस्थितीत असलेला पाठिंबा पाहता ती तेवढी सोपी गोष्ट नाही. परंतु इथे मुद्दा उपस्थित होतो, तो राजकीय आस्तित्वासाठी राजू शेट्टी भूमिकेला मूठमाती देणार का ? त्यातूनही पुन्हा पक्ष-संघटनांच्या पातळीवर कितीही पाठिंबा असला तरी जिंकण्यासाठी काही गणिते जमावी लागतात. ती गणिते  फिस्कटली तर गाढवही गेले आणि ब्रह्मचर्यही गेले, अशी अवस्था झाल्यावाचून राहणार नाही !

टिप्पण्या

  1. निषेध!
    निषेध!
    निषेध!
    डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा निर्घुण खून करणाऱ्या भ्याड गोडसेवादी, सनातनवादी प्रवृत्तीचा जाहीर निषेध!

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट

फिनिक्सच्या राखेतून उठला मोर

सरोजिनीताईंची चटका लावणारी एक्झिट