राज ठाकरे पुढे गेले, मागे फक्त गंमत उरली !

पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आहे, असे अलीकडच्या काही वर्षांत सातत्याने बोलले जाते. कोल्हापूर, सांगली, सातारा, सांगली, सोलापूर आणि पुणे या पाच जिल्हयांत ५८ पैकी केवळ १९ आमदार राष्ट्रवादीचे आहेत. काँग्रेसच्या संख्याबळाएवढेच शिवसेना-भाजपचे संख्याबळ आहे, ही वस्तुस्थिती लक्षात घेतली, तर एकेकाळच्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला शिवसेना-भाजप युतीने कसे खिंडार पाडले आहे, हे लक्षात येते. याचाच अर्थ या प्रदेशातील मतदार कुठल्या एका पक्षाशी, विचारांशी किंवा नेत्याशी बांधिलकी मानणारा राहिलेला नाही. वारे बदलेल, तशी मतदारांची दिशा बदलत असते. हीच गोष्ट लक्षात घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या दौऱ्याची सुरुवात इथून केली असावी.

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या या कथित बालेकिल्ल्यातच गेल्या काही महिन्यांत सरकारविरोधात तीव्र असंतोष व्यक्त होतोय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी ऊस दरासाठी केलेल्या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारविरोधातील उद्रेकाचे दर्शन घडले. सांगली, सातारा आणि सोलापूर या तीन जिल्ह्यांतील निम्मी जनता दुष्काळात होरपळतेय. पाण्यासाठी टाचा घासता घासता सरकारविरोधातही त्यांचा असंतोष उफाळून येतोय. कोणत्याही नेत्याला राजकीय मोहीम सुरू करण्यासाठी ही सुपीक जमीनच म्हणावी लागेल. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या संधीचा नेमका फायदा घेत पश्चिम महाराष्ट्रातून राज्याचा दौरा सुरू केला.

त्याची पहिली सभा कोल्हापुरातील गांधी मैदानात घेतली. गांधी मैदानावर यापूर्वी झालेल्या रेकॉर्डब्रेक सभांमध्ये आणीबाणीच्या काळातील पु. ल. देशपांडे यांची सभा आणि अलीकडच्या काळातील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काही सभांचा समावेश होतो. राज ठाकरे यांची कोल्हापुरातील सभा अशाच रेकॉर्डब्रेक सभांमध्ये समाविष्ट होणारी होती. कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात नाव घेण्याजोगा एकही पदाधिकारी नसताना आणि पक्षाला कोणत्याही प्रकारच्या सत्तेत स्थान नसताना अशी सभा घेणे मोठे धाडसाचे होते, ते धाडस राज ठाकरे यांनी केले आणि त्यात ते यशस्वी झाले. यावरून राज ठाकरे यांच्या नावाचा करिश्मा काय आहे, हे दिसून आले. शिवसेनाप्रमुखांच्यानंतर असा करिश्मा असलेले राज ठाकरे हे एकमेव नेते असल्याचे शिक्कामोर्तब या सभेने केले. मुंबईत त्यांच्या सभेला गर्दी जमण्यात विशेष काही नसते. मात्र अजिबात जनाधार नसलेल्या कोल्हापूरसारख्या ठिकाणी गर्दी जमणे कठीण असते.

सभेला जमलेल्या गर्दीमध्ये तरुणांची संख्या मोठी होती. कोणताही राजकीय टिळा नसलेली, केवळ राज ठाकरे यांच्याबद्दल कुतूहल असलेल्यांची ही गर्दी होती. एवढ्या मोठ्या सभेवर स्वार व्हायचे, तर केवळ राज्य आणि राष्ट्रीय हिताचे मुद्दे घेऊन चऱ्हाट वळणे चालणार नव्हते. चित्रपट हिट होण्यासाठी ज्याप्रमाणे सगळा मसाला आवश्यक असतो, तसेच सभा रंगण्यासाठीही अनेक बाबींची गरज असते. ती गरज पूर्ण करण्याची क्षमता राज ठाकरे यांच्याकडे आहे. त्यासाठी त्यांनी थेट शिवसेनाप्रमुखांचाच मार्ग अवलंबला. गर्दीचे मनोरंजन हाच मुख्य उद्देश ठेवला. प्रारंभापासून काही खास मार्मिक 'पंच' मारले आणि अधुनमधून राजकीय नेत्यांच्या नकला केल्या. नेत्यांच्या शैलीची खिल्ली उडवली.

अफजल गुरूची फाशी आणि त्याअनुषंगाने माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचा 'पदर टेरेसा' असा उल्लेख करण्यापासून सुरू झालेली त्यांची महाराष्ट्र नवनिर्माण एक्सप्रेस अनेक वळणे घेत, धक्के देत मत मागण्यापर्यँत पोहोचली. मत मागायला नाही मत मांडायला येतोय, असे म्हणत म्हणत त्यांनी मतांची साथ मागितली. जिथे शिवसेना-भाजपचे बियाणे रुजू शकते, त्या भूमीला मनसेचे वावडे असण्याचे कारण नाही, अशीही राज यांची धारणा असावी. परंतु कोल्हापूर शहराचा अपवाद वगळता शिवसेना-भाजपला जे यश मिळाले, ते त्या पक्षांच्या ताकदीवर नव्हे, तर स्थानिक नेत्यांच्या ताकदीवर हेही लक्षात घ्यावे लागेल. प्रारंभीच्या काळात काँग्रेसमधल्या नाराजांना उमेदवारी देऊन पश्चिम महाराष्ट्रात धनुष्यबाण उभा केला. मूळचे काँग्रेसवाले सगळे पुन्हा काँग्रेसमध्ये परतले, परंतु त्यांच्यानिमित्ताने ठिकठिकाणी शिवसेना-भाजपसाठी जागा झाली. मनसेला राजकीय स्पेस तयार करायची असेल तर याच मार्गाने जावे लागेल, अशी सध्याची स्थिती आहे.

राज ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या दौऱ्यासाठी निवडलेले टायमिंग अचूक होते ते दोन अर्थांनी. पहिले म्हणजे सरकारविरोधात विविध कारणांनी असलेला असंतोष. दुसरे म्हणजे शिवसेनाप्रमुखांच्या निधनानंतर सैरभैर झालेल्या शिवसेना समर्थकांना पर्याय देणे किंवा त्यांची मनोभूमिका तयार करणे. शिवसेनाप्रमुखांच्या निधनानंतर शिवसेना-मनसेमध्ये पॅचअपच्या चर्चा प्रसारमाध्यमातून रंगवण्यात येत होत्या आणि त्याबद्दल उत्कंठा निर्माण केली होती. कशातच काही नसताना राज ठाकरे यांच्या कोणत्याही कृतीबद्दल उत्सुकता निर्माण करण्याची मोहीम प्रसारमाध्यमांतील अनेक मंडळी इमाने-इतबारे चालवत असतात. त्याला फारसा अर्थ नसला तरीही लोकांचे मनोरंजन होत असते.

उद्धव ठाकरे यांनी मागितलेल्या टाळीला अजिबात प्रतिसाद न देता उलट त्याची खिल्ली उडवून राज ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. आपल्याला महाराष्ट्र घडवायचा आहे. स्वबळावर महाराष्ट्र काबीज करण्यासाठीच आताचा दौरा असल्याचे सांगून आपली दिशा स्पष्ट केली. मात्र त्यांनी जी मते मांडली, ती त्यांच्या काफिल्याबरोबर उडून गेली. त्याऐवजी सभेत जेवढी गंमत केली, तेवढीच चर्चा मागे उरली आहे. अशा गंमती जमतीतून पक्ष कसा रुजणार आणि महाराष्ट्राचे नवनिर्माण कसे घडणार, याचे उत्तर काळच देईल.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट

फिनिक्सच्या राखेतून उठला मोर

सरोजिनीताईंची चटका लावणारी एक्झिट