मंत्रालय जळाले, प्रवृत्तीही जळाव्या
‘ चंद्रपूर किंवा आणखी कुठल्या तरी लांबच्या जिल्ह्यात झोपडय़ांना आग लागली , पाच-सातशे झोपडय़ा जळून खाक झाल्या , सगळ्या लोकांचे संसार उघडय़ावर आले आणि माणसांच्या जीवन-मरणाचा कितीही निकडीचा प्रश्न असला तरी तो विषय मंत्रालयात आल्यावर ‘ एक फाईल ’ यापलीकडे त्याला फारशी किंमत नसते. तिथं माणसं कितीही टाचा घासत असली तरी मंत्रालय आपल्या गतीनं चाललेलं असतं. इथल्या लोकांना कुणाची काही पडलेली नसते.. ’ मंत्रालयात काम करीत असूनही संवेदनशील असलेले एक अधिकारी मंत्रालयाच्या कामकाजासंदर्भात सांगत होते. सरकारी सेवेतलेच आणखी एक सचोटीने काम करणारे अधिकारी आहेत. अनेक वर्षे मंत्रालयात काम केलेले , परंतु सध्या मंत्रालयाच्या इमारतीत नाहीत , ते म्हणाले , ‘ मंत्रालयात काम करताना मला नेहमी जाणवायचं , की या इमारतीत प्रचंड निगेटिव्हव व्हायब्रेशन्स आहेत. इथं कधीही काहीतरी वाईट घडू शकतं. परवा आग लागल्यावर मला त्याची प्रचिती आली. ’ फेसबुकवर उथळपणे बडबड करणाऱ्या लोकांच्या या प्रतिक्रिया नाहीत किंवा सरकारी यंत्रणेविषयी द्वेषाची पेरणी करणाऱ्या सिव्हिल सोसायटीतल्या कुणा वाचाळवीरांच्याही प्रतिक्रिया नाहीत. मंत...