शरद पवार : खंबीर आणि स्पष्टवक्ते  इंडिया टुडे साप्ताहिकाने अलीकडेच केलेल्या एका सर्वेक्षणात तरुणांच्यादृष्टीने सर्वात तिरस्करणीय राजकीय नेते म्हणून शरद पवार पहिल्या क्रमांकावर असल्याचे आढळून आले. हा सव्‍‌र्हे देशातील पाच महानगरांमध्ये केलेला आहे. महानगरी तरुणांच्या संवेदना, राजकीय समज हा सगळाच मामला गोंधळाचा असल्यामुळे ते देशातील तरुणांच्या भावनांचे प्रातिनिधिक चित्र ठरू शकत नाही. अण्णा हजारे आणि त्यांच्या चांडाळ चौकडीने गेले काही महिने संसदीय व्यवस्था, राजकीय नेते यांच्यासंदर्भात जे द्वेषाचे वातावरण निर्माण केले आहे, त्याचे प्रतिबिंब यातून दिसून येते. म्हणूनच तर मनमोहन सिंग यांच्यासारख्या स्वच्छ प्रतिमेच्या नेत्यालाही तिरस्करणीय नेत्यांच्या यादीत तिसरे स्थान मिळते.
शरद पवार यांचा एकाहत्तरावा वाढदिवस साजरा होत असताना आदल्याच आठवडय़ात आलेल्या या सव्‍‌र्हेची नोंद घेणे क्रमप्राप्त ठरते. राजकारणातील कुणीही व्यक्ति अजातशत्रू किंवा सर्व थरांत लोकप्रिय असू शकत नाही. शरद पवार यांच्या राजकीय प्रवासात तर एखाद्या उत्कंठावर्धक सिनेमाची सामग्री आहे. अष्टय़ाहत्तरमध्ये त्यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून पुलोदचा प्रयोग केला (तोच तो, खंजिराचा प्रयोग म्हणून आजही गाजवला जातो) तेव्हापासून अविश्वासार्ह राजकीय नेते, अशी त्यांची प्रतिमा बनली. सोनिया गांधी यांच्या विदेशी मुद्दय़ावरून निलंबन ओढवून घेतल्यानंतर तर त्यांची ती प्रतिमा अधिक ठळक बनली आणि तीच प्रतिमा सावलीसारखी त्यांच्याबरोबर वावरत राहिली. चव्वेचाळीस वर्षाच्या राजकीय प्रवासात दोन वेळा पक्षत्याग करणाऱ्या शरद पवार यांची अविश्वासार्ह नेते म्हणून प्रतिमा तयार करणाऱ्यांनी पवारांच्या बरोबरीच्या नेत्यांनी किती वेळा पक्षबदल केला, याचा आढावा घेतला तर त्यातून खूप रंजक माहिती पुढे येईल. तरीही पवारांच्या राजकारणाचे दोष आहेत, ते आहेतच. परंतु त्यापलीकडे जाऊन पाहिले तर त्यांचे राजकीय कर्तृत्व आणि त्यातील विधायक भाग अधिक ठळकपणे नजरेत भरल्यावाचून राहात नाही.
एकोणिसशे सदुसष्टमध्ये विधानसभेची निवडणूक बारामतीमधून जिंकल्यानंतर वयाच्या एकोणतिसाव्या वर्षी वसंतराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात त्यांची वर्णी लागली. यशवंतराव चव्हाण यांचे मानसपुत्र म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणात ते ओळखले जायचे. आज वयाच्या एकाहत्तराव्या वर्षी तिरस्करणीय राजकारणी म्हणून त्यांची प्रतिमा निर्माण करणाऱ्यांना कदाचित हे माहित नसेल की महाराष्ट्रातील तरुणांचे पहिलेवहिले नेते म्हणून शरद पवार यांना ओळखले जाते. यशवंतराव चव्हाणांच्यापासूनच्या दिग्गज नेत्यांची परंपरा महाराष्ट्राला असली तरीही तरुणांना राजकारणात आकर्षित करणारे शरद पवार हे पहिले नेते होते. ऐंशीनंतरच्या दशकात महाराष्ट्रातील तरुणांना त्यांच्या रुपाने तरुण नेता गवसला होता. केवळ शरद पवार यांच्या आकर्षणामुळेच राजकारणाशी संबंधित नसलेली शिक्षण,साहित्य-कलेपासून उद्योगार्पयतच्या अनेक क्षेत्रातील मंडळी राजकारणाकडे आकर्षित झाली होती. आजच्या काळात राज ठाकरे यांनी तरुणांवर घातलेली मोहिनी पाहायला मिळते, त्याला वृत्तवाहिन्यांपासून एकूणच प्रसारमाध्यमांचा विस्तार हे कारण आहे. शरद पवार यांच्या उमेदीच्या काळात प्रसारमाध्यमांचा असा डामडौल नव्हता. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे किंवा राज ठाकरे यांच्यासारखे खटकेबाज, शिवराळ बोलणे आणि नकलांची जोड नव्हती. त्यापलीकडे प्रभावी वक्तृत्व आणि संघटन कौशल्याच्या बळावर त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात आपले स्थान निर्माण केले. म्हणूनच तर चांद्यापासून बांद्यार्पयत पसरलेल्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्यांनी जोडलेले कार्यकर्ते आहेत. त्यांच्या पक्षाच्या प्रभावक्षेत्राला मर्यादा असल्या तरी त्यांचे व्यक्तिगत प्रभावक्षेत्र खूप मोठे आहे. ऐंशीच्या दशकातले पवार ज्यांनी पाहिले, ऐकले असतील त्यांना राजकीय नेत्याची लोकप्रियता काय असते, याची कल्पना येऊ शकते आणि प्रसारमाध्यमांनी मोठे केलेल्या आजच्या नेत्यांच्या मर्यादाही लक्षात येऊ शकतात.
संयुक्त पुरोगामी आघाडीच्या सरकारच्या दुसऱ्या खेपेला अनेक गोष्टी बिघडत गेल्या, त्यातच महागाई हा गेल्या तीन वर्षातील प्रमुख मुद्दा राहिला. यापूर्वी महागाईसाठी कधी कोणा मंत्र्याला जबाबदार धरले जात नव्हते, परंतु यावेळी मात्र महागाईचे खापर शरद पवार यांच्यावर फोडण्यात आले. काँग्रेस-राष्ट्रवादीतील अंतर्गत संघर्षासह अनेक कारणे त्यामागे होती. अन्न व नागरी पुरवठा,ग्राहक संरक्षण आणि कृषी अशा परस्परविरोधी खात्यांचा कारभार एकाच मंत्र्याकडे असल्याचा विरोधाभासही याच काळात ठळकपणे पुढे आला. नंतर पवारांनी फक्त कृषी खाते ठेवून इतर खाती सोडून दिली, परंतु तोर्पयत बरेच काही घडून गेले होते. लोकांना न रुचणारी भूमिका राजकारणी सहसा घेत नाहीत, परंतु शरद पवार त्याला अपवाद आहेत. परिणामांची तमा न बाळगता ते आपली भूमिका मांडतात आणि निर्णय घेतात. म्हणूनच मधल्या महागाईच्या गदारोळात त्यांनी जाहीरपणे महागाईचे समर्थन केले होते आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी मंत्रिपद गेले तरी त्याची पर्वा करणार नाही, असे सांगितले. राजकारणात एवढे स्पष्ट बोलायचे नसते, परंतु पवार यांनी ते बोलून दाखवले. अन्न सुरक्षा कायदा हा सोनिया गांधी यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे, परंतु प्रस्तावित कायदा कसा अव्यवहार्य आहे, हे त्यांनी स्पष्टपणे सांगितले आणि खरेतर अन्न व नागरी पुरवठा खात्यांचा त्याग करण्यामागे तेही एक कारण होते.
पवार अनेक क्षेत्रात रस घेऊन काम करतात, त्यामध्ये गेल्या काही वर्षातील क्रिकेटच्या मैदानावरील त्यांची कारकीर्द विशेष गाजली. आयसीसीच्या अध्यक्षपदाचा बहुमान त्यांना मिळाला आणि त्यांनी विश्वचषक स्पर्धेचे यशस्वी संयोजन केले, तरी एखादा कौतुकाचा शब्द त्यांच्या वाटय़ाला आला नाही. उलट क्रिकेटचा संदर्भ देऊन त्यांच्या कृषीखात्याच्या कारभाराला सतत टीकेचे लक्ष्य केले गेले.
पवारांचा आज जो ठळकपणे प्रवास दिसतो, तो गेल्या सात-आठ वर्षातला आहे. याच काळात दूरचित्रवाणीने अनेक नेत्यांच्या प्रतिमा तयार केल्या आणि अनेकांच्या बिघडवल्या. राजकीय नेते प्रसिद्धीवर आणि माध्यमांच्या उर्जेवर जगत असताना पवार नव्या प्रसारमाध्यमांपासून फटकूनच राहिले. मी तुमच्यामुळे मोठा झालेला नेता नाहीअसे इलेक्ट्रॉनिक माध्यमांना फटकारण्यापासून इलेक्ट्रॉनिक मीडिया नाही, फक्त प्रिंटवाल्यांशी बोलणारअसे स्पष्टपणे सांगण्याचे धाडस फक्त पवारच करू शकतात. राजकीय गणिते वेळ-काळानुसार बदलत असतात, हे खरे असले तरी पवारांनी व्यक्तिगत संबंध आणि राजकारण यात कधी गल्लत केली नाही. शिवसेना-भाजपच्या नेत्यांशी मैत्रीपूर्ण संबंध असले तरी त्यांनी त्यांच्याशी राजकीय पातळीवर कधी सहकार्य केले नाही. ते भाजपबरोबर जाणार किंवा राष्ट्रवादी राज्यात शिवसेनेबरोबर आघाडी करणार अशा वावडय़ा अनेकांनी अनेकदा उडवल्या, परंतु त्या वावडय़ाच राहिल्या. धर्मनिरपेक्षता हा पवारांच्या एकूण राजकारणाचा पाया आहे, हे विचारात न घेतल्यामुळेच त्यांच्यासंदर्भात असे चुकीचे आडाखे बांधले जातात. इथे एक गोष्ट लक्षात घेण्याजोगी आहे, ती म्हणजे देशाच्या राजकारणात फक्त लालूप्रसाद यादव आणि शरद पवार हे काँग्रेसबाहेरचे दोनच नेते आहेत, ज्यांनी कधीही जातीयवादी शक्तिंशी तडजोड केलेली नाही. तळागाळातल्या घटकांसाठी आणि पुरोगामी पावलांसाठी राजकारणात किंमत द्यावी लागते, आणि पवारांनी ती दिली आहे. मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याचा निर्णय घेतला त्यासाठी त्यांनी सत्ता पणाला लावली. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना तेहतीस टक्के आरक्षणाचा निर्णय कें्रीय पातळीवर लटकला असताना राज्यातील नेत्यांचा विरोध असतानाही पवार यांनी महाराष्ट्रात महिलांना तीस टक्के आरक्षण दिले. क्रांतिकारी महिला धोरण आणणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले. पवार संरक्षणमंत्री असताना महिलांसाठी संरक्षणदलाचे दरवाजे खुले झाले. राजकारणात बुवा-बाबांचे प्रस्थ असताना डावे नेते वगळता शरद पवार हे राष्ट्रीय पातळीवरील असे नेते आहेत, ज्यांनी कधी असल्या भंपकपणाला थारा दिला नाही. सार्वजनिक समारंभांतील कर्मकांडांनाही त्यांनी सतत विरोध केला. भटक्या विमुक्तांपासून दलित, आदिवासींर्पयत तळागाळातील घटकांप्रती आस्था असलेला पवारांसारखा दुसरा नेता दिसत नाही. गावपातळीवरच्या कार्यकर्त्यांला नावाने ओळखणारे वसंतदादांच्यानंतरचे पवार हे एकमेव नेते आहेत.
शरद पवार यांच्या राजकीय प्रवासात टीका करण्यासारखे खूप असले तरी त्याच्या वर उरणारे असे बरेच काही आहे. त्याचबरोबर सभ्यता आणि सुसंस्कृतपणा आहे. दिल्लीतील हल्ल्यानंतर ज्या संयमाने त्यांनी परिस्थितीचा सामना केला आणि रिटेलमधील एफडीआयवरून गोंधळाचे वातावरण असतानाही संसद एकमुखाने त्यांच्या समर्थनार्थ उभी राहिली यावरून त्याची कल्पना येते. प्रत्येक संकटानंतर पवार अधिक खंबीरपणे उभे राहतात, त्यांनी सत्तरी पार केल्यानंतरही तेच दिसून आले !

टिप्पण्या

  1. ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.

    उत्तर द्याहटवा
  2. खरे तर पवार साहेबांचे अजून एक वैशिष्ट्य आहे,ते म्हणजे त्यांच्या ज्येष्ठते बरोबरच,त्यांच्या नेतृत्वाला नि कर्तुत्वाला दाद देणारा नि ते मान्य करणाऱ्या वर्गात होत गेलेली वाढ.असा वर्ग कि जो "पक्षीय" राजकारणाशी तसा निगडीत नाही,जो सर्वसामान्य नागरिक असतो.वाढत्या वया बरोबरच त्यांचे नेतृत्व हि खूप चांगल्या पद्धतीने मॅच्युअर होत गेले हि वास्तवता आहे,जी राजकारणात सक्रीय असलेल्या त्यांच्या वयाच्या जवळपासच्या वयाच्या इतर कोणत्याही पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना न जमलेली गोष्ट आहे.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट

फिनिक्सच्या राखेतून उठला मोर

सरोजिनीताईंची चटका लावणारी एक्झिट