मुली मारण्याचा अडीचशे कोटींचा धंदा
स्त्री भ्रूणहत्या ही राज्यापुढची सध्याची गंभीर समस्या आहे , म्हणूनच अनेक घटकांनी त्याप्रश्नी लक्ष घालून विविध पातळ्यांवर जाणीव जागृतीचे प्रयत्न सुरू केले आहेत. मुलींचे घटते प्रमाण आणि सोनोग्राफी सेंटर्स यांचा थेट संबंध एव्हाना चव्हाटय़ावर आला आहे. गर्भलिंग निदानाचा धंदा करणारे डॉक्टर्स ‘ गंदा है पर धंदा है.. ’ या धोरणानुसार भ्रूणहत्येची दुकानेच चालवीत आहेत. राज्यभरात साडेपाच हजारांहून अधिक सोनोग्राफी सेंटर्स असून मुंबई-ठाण्यातील त्यांची संख्या अडीच हजारांच्या घरात आहे. महाराष्ट्रातला संपन्न प्रदेश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पश्चिम महाराष्ट्राच्या संपन्नतेच्या भाळावर स्त्री भ्रूणहत्येचा कलंक ठळकपणे गोंदला गेला आहे. गरीबांना मुलीचे ओझे वाटते म्हणून मुलगी नको असते तर श्रीमंतांन इस्टेटीला वारस म्हणून मुलगा हवा असतो. इस्टेटीच्या वारसासाठी हपापलेल्या संपन्न प्रदेशात मुलगी नकोशी वाटते. या साऱ्या मानसिकतेचा लाभ उठवत सोनोग्राफी सेटर्स चालवणारे डॉक्टर आणि काही स्त्रीरोग तज्ज्ञांनी उखळ पांढरे करून घेतले. कोणतेही तंत्रज्ञान हे माणसाला उपयुक्त असते , परंतु सोनोग्राफीसारख्या तंत्रज्ञानाचा वापर विकृत म...