मृत्युनंतर उमगलेले साईंचे ‘सत्य’

अखेरच्या काळात रुग्णालयात मृत्युशी झुंज देत देत सामान्य माणसाप्रमाणेच सत्य साईबाबांनी जगाचा निरोप घेतला, तेव्हा साक्षात परमेश्वर असल्याचा दावा करणाऱ्याच्याबाबतीतही मृत्यू हेच अंतिम सत्य असल्याचे सिद्ध झाले. मार्चपासून त्यांच्याच ट्रस्टने उभारलेल्या सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्याआधी अनेक दिवस ते आजारी होते, परंतु त्यांच्याच चेल्यांनी या भगवानाला साक्षात कैदेत ठेवल्यासारखे ठेवले होते. त्यांच्यावर काय उपचार सुरू होते किंवा उपचार सुरू होते की नव्हते याचीही कुणाला कल्पना नव्हती. एका भक्ताने न्यायालयाचे दरवाजे ठोठावल्यानंतर सत्यसाईबाबांना वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले. लवकरच महाराज आश्रमात परत येणार असून भक्तांना दर्शन देणार आहेत, अशा वावडय़ा त्यांचे चेले उठवत होते, तेव्हा स्वत:ला साक्षात भगवान म्हणवून घेणारे सत्यसाईबाबा मृत्यूशी झुंज देत होते. ही झुंज अपयशी ठरली आणि रविवारी एप्रिलला रुग्णालयाच्या बंद खोलीत त्यांचे देहावसान झाले. चमत्कार होईल आणि बाबा रुग्णालयातून परत येतील, असे त्यांच्या भक्तांना वाटत होते. कारण स्वत: बाबांनीच आपण वर्षे जगणार असल्याचे भाकित केले होते. दुर्दैव असे की, त्यांचे स्वत:बद्दलचेच भाकित चुकले आणि दहा वर्षे आधीच त्यांना जगाचा निरोप घ्यावा लागला.
त्यांच्या चमत्काराच्या शेकडो कथा ऐकलेल्या आणि त्यांच्या भक्तांचा हायटेक, उच्चविद्याविभूषित गोतावळा पाहून भारावून म्हणा किंवा गोंधळून गेलेल्या मजसारख्या त्यांच्या भक्तांचे भक्त असलेल्या अनेकांना वाटत होते, की वैकुंठाहून, स्वर्गातून किंवा कुठल्यातरी ग्रहावरून एखादे विमान येणार आणि महाराज त्या विमानात बसून गमन करणार. विमानांचा शोध लागण्याच्या आधी सत्यसाईबाबांसारखा भक्तांचा गोतावळा नसतानाही देहूच्या तुकाराम वाल्होबा आंबिले यांच्यासारख्या साध्या विठ्ठलभक्ताला न्यायला विमान आल्याचे आजही सांगितले जाते. आजचा काळ तर प्रगत आहेच आणि ज्यांच्या मालकीचे विमानांचे ताफे आहेत, असे बहुतेक सारे बडे लोक बाबांचे भक्त आहेत. अशा प्रगत काळात बाबांसाठी कुठल्या परक्या ग्रहावरून विमान येणे सहज शक्य होते. राकेश रोशनच्या ‘कोई मिल गया’ चित्रपटात परग्रहावरून यान येते तसले काहीतरी विमानसदृश्य येईल. जगभरातील वृत्तवाहिन्या त्यांच्या गमनाचे लाईव्ह कव्हरेज दाखवतील. पण तसे काही न घडल्यामुळे सामान्य भक्तांचा भ्रमनिरास झाला असण्याची शक्यता आहे. भगवान भगवान म्हणवून घेत होते, ते सत्य साईबाबाही माणूसच होते, असेही काहींना वाटले असण्याची शक्यता आहे. कारण त्यांचा चमत्कार त्यांच्या उपयोगाला आला नाही. अखेरच्या काळात त्यांच्यावर वैद्यकीय उपचार करावे लागले. व्हेंटिलेटरसारख्या उपकरणाचे सहाय्य घ्यावे लागले. बाबांचे देहावसान झाले आणि सारा देश शोकसागरात बुडाला. अर्थात देशाला शोकसागरात बुडवण्याचे काम प्रसारमाध्यमे करीत असतात आणि प्रसारमाध्यमांनी इमाने इतबारे ते पार पाडले. आता बाबांच्या उत्तराधिकाऱ्याला प्रस्थापित करण्यामध्ये, त्याच्या चमत्काराच्या कथा प्रसृत करण्यातही प्रसारमाध्यमे मोलाची भूमिका पार पाडतील, यात शंका वाटत नाही.
सत्य साईबाबांनी स्थापन केलेल्या ट्रस्टच्या माध्यमातून अनेक सामाजिक कामे उभी केली आहेत. या कामांमुळेच त्यांच्या अध्यात्मिक शक्तिबद्दल शंका घेणारे त्यांचे विज्ञाननिष्ठ टीकाकारही त्यांचे स्तुतीपाठक बनतात. परंतु सत्यनारायण राजू नामक गृहस्थांनी काबाडकष्ट करून, स्वत:च्या घामाच्या पैशातून एखादीतरी वीट रचली का, याचा विचार होत नाही. आणि ज्यांच्या देणगीतून सारे साम्राज्य उभे राहिले, तो पैसा कुणाच्यातरी कष्टाचा किती, गैरमार्गाने मिळवलेला किती याची शहानिशा कधी झाली आहे काय? सत्यसाईबाबांच्या निधनानंतर भोळ्या भाबडय़ा लोकांच्या मनात असे अनेक प्रश्न निर्माण झाल्यावाचून राहात नाहीत. ‘भारतरत्न’च्या वेटिंग लिस्टवर असलेले सुनील गावसकर आणि सचिन तेंडुलकर हे बाबांचे भक्त होते. बाबांच्या निधनानंतर त्यांना झालेल्या दु:खाच्या बातम्या आणि अंत्यदर्शन घेतानाची छायाचित्रेही प्रसिद्ध झाली. अध्यात्मिक गुरूच्या जाण्यामुळे दु:ख होणे स्वाभाविक आहे. परंतु गावसकर काय किंवा तेंडुलकर काय यांच्या फलंदाजीमागे सत्यसाईबाबांचा काही चमत्कार असू शकेल काय? गेले वर्षभर धुव्वाधार खेळणाऱ्या सचिनच्या गेल्या दोन सामन्यांतील धावा कमी झाल्या आहेत. बाबा रुग्णालयात असताना म्हणजे त्यांची दैवी शक्ती काम करीत नसल्यामुळे सचिन चेन्नईविरुद्धच्या सामन्यात पाचवर आणि डेक्कनविरुद्धच्या सामन्यात धावांवर बाद झाला म्हणायचे का?. गावसकरने जगभरातील गोलंदाजांची पिसे काढली त्यामागे सत्यसाईबाबांच्या अध्यात्मिक शक्तिची ताकद असू शकेल का? भारताचा सध्याचा सर्वात यशस्वी कर्णधार महें्रसिंग ढोणी हा बाबांचा भक्त असल्याचे ऐकिवात नाही. परंतु त्याने तर देशातील दोन नंबरवाल्यांचे एक नंबरचे देवस्थान असलेल्या तिरुपतीच्या बालाजीलाच वशिला लावला होता. त्यामुळे भारताने वर्ल्डकप जिंकला त्याच दिवशी ढोणीने डोके भादरून नवस फेडला.
बाबांच्या चमत्काराच्या आणि बाबांच्या कृपेमुळे मिळालेल्या प्रसादाच्या कहाण्या जेव्हा सांगितल्या जातात, तेव्हा त्याला छेद देणाऱ्या काही गोष्टी आठवतात. सत्यसाईबाबांच्या कृपाप्रसादामुळेच मुख्यमंत्रिपद मिळाल्याची अशोक चव्हाण यांची भावना होती. त्यांनी आपल्या सरकारी निवासस्थानी बोलावून बाबांची पाद्यपूजा केली. प्रसारमाध्यमांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली. परंतु त्यांनी कोडगेपणाने, ते आपले अध्यात्मिक गुरू असल्याचे समर्थन केले. पुढे आदर्श गृहनिर्माण प्रकरणी घोटाळ्यात त्यांचे मुख्यमंत्रिपद गेले, तेव्हा अध्यात्मिक गुरूंची ताकद का क्षीण पडली हे समजायला साधन नाही. पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांच्यापेक्षा पॉवरफुल बाबांना धरले असेल, अशी शंका घेण्यास जागा होती. परंतु पृथ्वीराजबाबा हे स्वत:च ‘टोपणनावाने’ बाबा असल्यामुळे आणि त्यांचा स्वत:च्या कर्तृत्वावर विश्वास असल्याने ते कुठल्या बाबाच्या भजनी लागत नाहीत. त्यामुळे चारित्र्य ही कुठल्याही बुवाच्या आशीर्वादापेक्षा मौल्यवान गोष्ट असते, हे सिद्ध होते. राज्याच्या राजकारणातले टेक्नोसॅव्ही मंत्री म्हणून ओळखले जाणारे जयंत पाटील हे सत्यसाईबाबांचे दर्शन घेऊन येत असताना त्यांच्या गाडीला अपघात झाला होता, ही फार जुनी घटना नाही. एकीकडे महात्मा जोतिराव फुले यांच्या नावाने राजकारण करणाऱ्या छगन भुजबळ यांनी गुरूवायूरच्या प्रांगणात हत्ती बांधून नवस केला, परंतु प्रत्यक्षात उपमुख्यमंत्रिपदाच्या अंबारीत अजित पवार बसले. अजित पवारही पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखे ‘बुवाघाणे’ (माणूसघाणे म्हणतात तसे) म्हणता येतील. तो वारसा अर्थात त्यांच्या काकांकडून म्हणजे शरद पवार यांच्याकडून आलेला. शरद पवार यांच्या राजकारणाबद्दल अनेकांचे मतभेद असू शकतील. परंतु डाव्या पक्षांचे नेते सोडले तर देशाच्या राजकारणातले शरद पवार हे एकमेव नेते आहेत, जे कधीही कुठल्या बुवा-बाबाच्या भजनी लागले नाहीत. पवार नास्तिक नाहीत, परंतु वैयक्तिक आयुष्यात त्यांनी भोंदूगिरीला कधी थारा दिला नाही. परंतु असे राजकारणी दुर्मीळच. शास्त्रज्ञ म्हटले जाणारे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुलकलाम सत्यसाईबाबांवर स्तुतीसुमने उधळतात तेव्हा अनेकांचा गोंधळ उडतो. पंतप्रधान मनमोहनसिंगही त्यांच्या अंत्यदर्शनासाठी धावले. कुणी काय करावे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. परंतु विज्ञानाधिष्ठित समाजनिर्मितीची शपथ घेतलेले पंतप्रधान, राष्ट्रपतींसारख्या पदांवरचे लोक जेव्हा अशा चमत्कारी पुरुषाला मान्यता देणारा व्यवहार करतात तेव्हा त्यातून जाणारा संदेश सामान्य माणसांना बुचकळ्यात टाकणारा असतो.

टिप्पण्या

  1. चोरमारे सर्, अगदी वास्तवाला धरून आपण मांडणी केलीय...

    उत्तर द्याहटवा
  2. सर, तुमच्या सारख्या निर्भीड व तटस्थ पत्रकारांची आज खूप गरज आहे . वास्तववादी लेख 👌

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट

एका ‘सुपारी’ची डायरी

फिनिक्सच्या राखेतून उठला मोर