भीमसेनजींचं जाणं, महाराष्ट्र आणि कर्नाटक
कुणाचंही निधन झालं की, आदरांजली वाहताना त्यांच्या जाण्यामुळं पोकळी निर्माण झाली, असं म्हणण्याची आपल्याकडं एक पद्धत आहे. अशी पोकळी निर्माण होणं म्हणजे काय, याचा अर्थ भीमसेनजींसारखा एखादा कलावंत किंवा कुसुमाग्रजांसारखा कवीश्रेष्ठ आपल्यातून निघून जातो तेव्हाच उमगतो. मराठी माणसांच्या नसांनसांतून वाहणाऱ्या संतवाणीला आपल्या पहाडी आवाजाचे कोंदण देणारे पंडित भीमसेन जोशी कृतार्थ जीवन जगले. अवघे गर्जे पंढरपूर..या ओळी पंडितजींच्या आवाजातून येतात तेव्हा पंढरपूरच्या वाळवंटाचं चित्र डोळ्यासमोर उभं राहतं आणि तिथला विठूनामाचा गजर मस्तकात घुमायला लागतो, एवढी ताकद त्यांच्या आवाजात होती. अशा कलावंताचं जाणं म्हणजे नेमकं काय असतं, याचा विचार करायला लागतो, तेव्हा त्या जाण्यानं निर्माण झालेल्या पोकळीची जाणीव अस्वस्थ करायला लागते. खरंतर भीमसेन जोशी यांचं गाणं ही रोज ऐकण्याची गोष्ट नाही किंवा त्यांच्या मैफिलीला दर महिन्याला हजेरी लावावी असंही काही नसतं कधी. म्हणजे आपल्या रोजच्या ऐकण्यात आणि गुणगुणण्यात नसलेल्या कलावंताचं जाणं अस्वस्थ करतं, कारण त्यांचं गाणं आपलं जगणं समृद्ध करणारं होतं. पंडितजींनी आयुष्यातल्या...