राज ठाकरे उरले टीआरपीपुरते !

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचा प्रवास पाहिला तर त्यांची धाव सतत एका खड्ड्याकडून दुसऱ्या खड्ड्याकडे सुरू असल्याचे दिसते. आपल्याकडे पुढच्यास ठेच मागचा शहाणा अशी म्हण आहे. राज ठाकरे यांना ती लागू होत नाही, कारण ते स्वतःच नेहमी पुढे असतात. त्यामुळे नेहमी ठेचा त्यांनाच लागतात. शहाणा माणूस दुसऱ्याला ठेच लागली तरी शहाणा होतो, परंतु राज ठाकरे स्वतः ठेचा खाऊनही शहाणे होत नाहीत, असे दिसते. एक-दोन-चार वर्षे हे रांगण्याचे, दुडदुडण्याचे, धडपडण्याचे वय म्हणून लोक बाळलीलांकडे दुर्लक्ष करतात. परंतु दहा वर्षांनंतरही धडपणे उभे राहता येत नसेल तर शंका वाटायला लागते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबद्दल पर्यायाने राज ठाकरे यांच्याबद्दल तसेच वाटायला लागले आहे. वैद्यकीय प्रवेशासाठीच्या ‘नीट’ परीक्षेच्या निमित्ताने राज ठाकरे पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले. ‘नीट’ रद्द करण्याच्या मागणीसाठी पत्रकार परिषद घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. आणि थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही फोन केला. ‘नीट’ परीक्षेचा प्रश्न गंभीर आहे, हे खरेच. परंतु इथे राज ठाकरे यांच्या भूमिकेला फारसा अर्थ नाही...