गोंधळी नव्हे, गोंधळलेले विरोधक
महाराष्ट्राच्या विधानसभेत अर्थसंकल्प सादर होताना विरोधकांनी घातलेला गोंधळ, त्यावरून आमदारांचे निलंबन, विरोधकांनी कामकाजावर घातलेला बहिष्कार, गोंधळ घालणाऱ्यांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर निलंबन मागे घेण्याचा निर्णय आणि त्यानंतर मागे घेतलेला बहिष्कार असा खेळ सुमारे आठवडाभर रंगला. या काळातील विरोधकांचे वर्तन अत्यंत आक्षेपार्ह असून कोणत्याही पातळीवर त्यांचे समर्थन करता येत नाही. गोंधळ घालण्यामागची त्यांची नेमकी कारणे कोणती होती, त्यांचा विरोध अर्थमंत्री अजित पवार यांना होता की आघाडी सरकारला याबद्दलही स्पष्टता नसल्यामुळे विरोधकांच्या गोंधळापेक्षा त्यांचे गोंधळलेपणच अधिक ठळकपणे दिसून आले. विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांची प्रतिमा अभ्यासू लोकप्रतिनिधी अशी आहे. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली अधिक शहाणपणाची कृती आवश्यक होती. गेल्यावर्षीच्या अधिवेशनात सरकार आणि बिल्डर लॉबीचे संबंध चव्हाटय़ावर आणून खडसे यांनी सरकारला पळता भुई थोडी केली होती आणि विरोधी पक्षनेत्याच्या पदाला एका उंचीवर नेऊन ठेवले होते. खडसे यांनी सुरू केलेली ही मोहीम आदर्श सोसायटीच्या गैरव्यवहारार्पयत आली आणि त्यात अशोक चव्हाण यांच्य...