राजकीय सामना
सुमारे ३८ वर्षांपूर्वी आलेल्या ‘सामना’ चित्रपटात एक सत्ताधीश कारखानदार आणि फाटका स्वातंत्र्यसैनिक यांच्यातील संघर्ष पाहायला मिळाला होता. हिंदुराव धोंडे-पाटलांची सगळी कारस्थाने उघड केल्यानंतरही मास्तर त्यांच्याकडे येऊन म्हणतात, ‘तुमचं पोरकं झालेलं राज्य तुम्हाला परत बोलावतंय...’ धोंडे पाटलांना अटक झाल्यावर मास्तर मुक्काम हलवून पुढच्या प्रवासाला लागतात. त्यांच्याच भाषेत सांगायचे तर स्वातंत्र्यपूर्व काळापासून साक्षात काळाकडे.... काळाबरोबर संघर्ष, संघर्षाची जातकुळी आणि उद्देश बदलत गेले. सगळीच क्षेत्रे एवढी राजकारणग्रस्त झाली, की चळवळी त्यापासून अलिप्त राहू शकत नव्हत्या. परिणामी, नेत्याचे राजकारण सुरू झाले की, चळवळीचा ऱ्हास सुरू होतो. या पार्श्वभूमीवर सध्याच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या चळवळीचा विचार केला, तर अनेक बाबी निदर्शनास येतात. ऊस दरासाठीची पश्चिम महाराष्ट्रातील चळवळ गेल्या दहा-बारा वर्षातील आहे. ( ऊसदर मिळेपर्यंत महिनाभरच ती चालते.) त्याआधी कारखानदार जो दर देतील तोच शेतकरी घेत होते. शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेली चळवळ उसाच्या क्षेत्र...